मी आणि आनंद काही दिवसांपूर्वी कोव्हीड न्यूमोनियातून बाहेर पडलो आहोत. आधी मला लागण झाली त्यामुळे मला दवाखान्यात भरती व्हावे लागले. माझ्यापाठोपाठ बरोबर तीन दिवसानी आनंदला ताप आला आणि दिवसेंदिवस तो ताप वाढत चालला होता. त्याची कोव्हीड टेस्टही पॉझिटिव्ह आली. त्यामुळे आता त्यालाही दवाखान्यात राहून उपचार घेणे आवश्यक झाले होते. पण आमच्या घरी, माझे ८८ वर्षे वयाचे वडीलही होते. आम्हाला लक्षणे सुरु झाल्यावर, माझ्या वडिलांना विलगीकरणाच्या दृष्टीने, आम्ही एका खोलीत बंद करून ठेवले होते. आम्हा दोघांशिवाय वडिलांची काळजी घेणारे, त्यांचे खाणे-पिणे बघणारे इतर कोणीच घरात नसल्याने, मी घरी आल्याशिवाय आनंदला दवाखान्यात दाखल होता येत नव्हते. अशा परिस्थितीत माझा पाच दिवसांचा इंजेक्शन्सचा कोर्स पूर्ण झाल्यावर, डॉक्टरांना माझ्या घरातील अडचण सांगून, मला घरी सोडण्याची विनंती मी केली. सुदैवाने त्या डॉक्टरांनी ती विनंती मान्यही केली. मी घरी आल्यावर आनंद उपचारासाठी दवाखान्यात भरती झाला आणि ७-८ दिवसांच्या उपचारांनंतर तोही घरी परत आला.
लक्षणे दिसू लागल्यापासून पुढील सुमारे १७ दिवस, कोव्हीड पेशंट त्याच्या श्वासातून कोव्हिडचे विषाणू बाहेर फेकत असतो. त्यामुळे, त्याच्या संपर्कात येणाऱ्या इतरांना लागण होऊ शकते. माझ्या वडिलांना लागण होऊ नये म्हणून, आनंदला लक्षणे सुरु झाल्यापासून १७ दिवसांनंतर, आमच्या घराचे निर्जंतुकीकरण करून घेणे आवश्यक झाले होते. पुणे महानगरपालिकेच्या विविध क्षेत्रीय कार्यालयातर्फे घर, जिने, लिफ्ट व आसपासच्या परिसरात निर्जंतुकीकरणासाठी फवारणी केली जाते, हे आम्ही ऐकून होतो. ढोले पाटील रस्ता क्षेत्रीय कार्यालयान्तर्गत, आमच्या प्रभागाचे सॅनिटरी इन्स्पेक्टर,श्री. निखिल शेडगे यांच्याशी संपर्क साधून आम्ही त्यांना तशी विनंती केली. श्री. शेडगे यांनी आम्हाला त्वरित श्री. सावंत यांचा दूरध्वनी क्रमांक दिला व त्यांच्यासोबत वेळ ठरवून घेण्यास सांगितले. श्री. सावंत यांच्याशी संपर्क साधून, दुसऱ्या दिवशी सकाळी घर निर्जंतुकीकरणासाठी माणसे पाठवावीत अशी विनंती आम्ही केली. "निश्चित पाठवतो" असे ते म्हणाले असले तरीही कोणी येईल की नाही, या बाबतीत आम्ही थोडे साशंकच होतो.
दुसऱ्या दिवशी सकाळी, साधारण ९.३०-१० वाजण्याच्या सुमारास, श्री. सावंत यांच्यातर्फे, श्री. मोरे यांचा फोन आला. ते आमच्या घराजवळ पोहोचले होते व घराचा नेमका पत्ता विचारीत होते. दहा मिनिटांतच श्री. मोरे आणि त्यांचे एक सहकारी घरात हजर झाले. योग्य प्रमाणात औषध व पाणी फवारणी यंत्रात घालणे आणि संपूर्ण घरात त्या मिश्रणाची फवारणी करण्याचे काम पुढील पंधरा-वीस मिनिटांत त्यांनी पूर्ण केले. दोघेही कसलीही कुरकुर न करता, शांतपणे ते काम करत होते. मला त्यांचे कौतुक तर वाटलेच, पण कोव्हीड रुग्ण असलेल्या घरात शिरून तिथे फवारणी करताना या लोकांना स्वतःच्या जीवाची भीती वाटत नसेल का? असा प्रश्नही पडला.काम संपवून, श्री. मोरे त्यांच्या सहकाऱ्याबरोबर परत निघाले असता, माझ्या मनातले प्रश्न मी त्यांना विचारले.
श्री. मोरे यांनी दिलेले उत्तर ऐकून मी थक्क झाले.
"मॅडम, आता जवळजवळ वर्ष होत आले. सातत्याने आम्ही हे काम करतो आहोत. मागे एकदा एकाच चाळीत शंभरच्या वर कोव्हीड रुग्ण होते. तिथेही जाऊन आम्ही फवारणी केली होती. नाक आणि तोंड झाकले जाईल असा साधा कापडी मास्क आम्ही वापरतो. सोशल डिस्टंसिंग पाळतो. फवारणी करायला जातो तिथे इकडे-तिकडे कुठेही हात लागणार नाही याची दक्षता घेतो. आजपर्यंत तरी काही झाले नाही"
मला कौतुक वाटले. सहजच ताज हॉटेलवर झालेल्या हल्ल्याची, आणि धडाडीने तिथे घुसून, अतिरेक्यांचा नायनाट करणाऱ्या 'ब्लॅक कॅट' कमांडोजची आठवण झाली. मनात विचार आला, या फवारणी करणाऱ्यांना आपण 'कोव्हीड कमांडोज' असे का म्हणू नये? कोव्हीड पेशंट्सच्या घरात फिरणारे सूक्ष्म विषाणू अतिरेक्यांपेक्षा कमी नाहीत. त्यांच्याविरुद्ध मोहीम उघडून हे 'कोव्हीड कमांडोज' आपल्या जीवावर उदार होत दररोज कारवाई करत आहेत.
आम्हा डॉक्टर्सना आणि सिस्टर्सना 'कोव्हीड वॉरियर्स' म्हटले जाते. आमचे भरपूर कौतुक होते आणि सन्मान केला जातो. या 'कोव्हीड कमांडोज'चेही तसेच कौतुक आणि तसाच सन्मान व्हायला हवा असे वाटून, मी मनोमन त्यांच्या कार्याला सलाम केला.
कोव्हिड कमांडोज एकदम चपखल उपमा.
उत्तर द्याहटवाकोविड कमांडोंना सलाम. ����������
SVK... अभिप्रायाबद्दल धन्यवाद!
उत्तर द्याहटवा✅
उत्तर द्याहटवाधन्यवाद!
हटवाछान ,तपशीलवार पण तरीही थोडक्यात माहिती लिहिली आहेस .तसंच नवीन योजलेला शब्द अतिशय अर्थपूर्ण आहे .माझ्या वतीने पण श्री .मोरे आणि सहकारी ,दोघांनाही सलाम .हे खरे आमचे नायक...
उत्तर द्याहटवाधन्यवाद!
हटवाखरच त्यांचं कौतुक करावे तेव्हडे थोडेच आहे! त्यांना मनःपूर्वक सलाम! तुम्हीही छान माहिती दिलीत, त्याबद्दलही तुम्हाला खूप खूप धन्यवाद!
उत्तर द्याहटवाधन्यवाद!
हटवाछान वाटले वाचून ....विनायक जोशी
उत्तर द्याहटवाधन्यवाद!
उत्तर द्याहटवातुम्ही केलेल्या कौतुकास पात्र आहेत.. कोविड कमांडोस धन्यवाद
उत्तर द्याहटवाधन्यवाद!
हटवाVery nice. Your observations and nomenclature for them is very apt.
उत्तर द्याहटवाThanks!
हटवाखरे कोव्हीड कमांडोज आहेत हे लोक. माणुसकीच्याही पलीकडे जाऊन तू हा मुद्दा मांडलास ते कौतुकास्पद आहे. छान लिहिलंस. अभिनंदन.
उत्तर द्याहटवाधन्यवाद बापू कुलकर्णी!
हटवाUnsung heroes!
उत्तर द्याहटवा🙏🏼
Unsung heroes!
उत्तर द्याहटवा🙏🏼
Unsung heroes!
उत्तर द्याहटवा🙏🏼
True!
हटवा