रविवार, २ नोव्हेंबर, २०२५
डायबेटिस रिव्हर्सलचा धंदा
गुरुवार, ९ जानेवारी, २०२५
आरोग्याची शिदोरी!
माझ्या रोज सकाळच्या फेरफटक्याच्या वाटेवर एके ठिकाणी, पोहे, उपमा, साबुदाणा खिचडी, इडली-वडा, ब्रेड पकोडे, मॅगी, आप्पे, भजी आणि चहा-कॉफी वगैरे विकणाऱ्या चार-सहा गाड्या मला दिसतात. त्या विक्रेत्यांकडे केक, बिस्किटे, क्रीमरोल्स, डोनट्स असे पदार्थही विकायला असतात. एके दिवशी माझ्यासमोरच एक सुशिक्षित आणि चांगल्या घरातील वाटणारी बाई दुचाकीवरून आपल्या शाळकरी मुलीला घेऊन त्यातल्या एका गाडीजवळ थांबली. तिने मुलीच्या दप्तरातून दोन रिकामे डबे काढले आणि त्या खाद्यपदार्थ विक्रेत्याकडे दिले. एका डब्यात केक आणि क्रीमरोल व दुसऱ्या डब्यामध्ये साबुदाणा वडा घेऊन, त्या बाईने ते डबे आपल्या मुलीच्या दप्तरात घातले. गाडीवाल्याला पैसे देऊन, ती बाई फर्र्कन मुलीच्या शाळेच्या दिशेने निघून गेली. असे दृश्य मला हल्ली वरचेवर दिसायला लागले आहे. शालेय मुलांना घरचे ताजे आणि सात्विक अन्न न देता बाहेरचे उघड्यावरचे अन्न देणाऱ्या आयांचे प्रमाण हल्ली फारच वाढले आहे.
आमच्या लहानपणी आम्ही छोट्या सुट्टीसाठी एक आणि मोठ्या सुट्टीसाठी दुसरा असे दोन डबे घेऊन शाळेत जायचो. झाडाखाली कोंडाळे करून एकमेकींच्या डब्यातले पदार्थ चाखत, हसत-खेळत आम्ही वर्गमैत्रिणी डबे खायचो. त्याकाळी सर्वसाधारणपणे सगळ्यांच्याच डब्यांमधे घरी केलेली पोळी-भाकरी व भाजी/चटणी/ लोणचे असायचे. जरा लाडावलेल्या मुलांच्या किंवा श्रीमंत घरच्या मुलांच्या डब्यामधे तूप-साखर-पोळी किंवा तूप-गूळ-पोळी असायची. डब्यामधे काय आणायचे याबाबत आमच्या शाळेमधे तरी काही नियम नव्हते. माझा मोठा भाऊ जयंत चौथीपर्यंत सोलापुरातल्या, अवंतिकाबाई केळकरांच्या 'बालविकास' शाळेमधे जायचा. त्या शाळेत मात्र, सर्व विद्यार्थ्यांनी डब्यांमधे पोळी-भाजीच आणली पाहिजे असा कडक नियम होता. एकदा माझ्या आईने जयंताला डब्यामधे 'वरणफळं' दिली होती. "बाई, जयंताने डब्यात पोळी-भाजी आणलेली नाही" अशी तक्रार इतर मुलांनी केळकरबाईंकडे केली. पण 'वरणफळं' म्हणजे पोळी-वरणाचा प्रकार असल्याने बाईंनी ती तक्रार ऐकून घेतली नाही. एकूण काय तर, त्या काळी घरी केलेले साधे, सकस आणि ताजे पदार्थ मुलाच्या डब्यात देण्याचीच पद्धत होती.
गेल्या वर्षी, जुलैचा महिनाभर आम्ही ऑस्ट्रेलियामध्ये आमच्या मुलीच्या घरी गेलो होतो. आमची पाच वर्षाची नात, सोमवार ते शुक्रवार सकाळी नऊ ते दुपारी तीन वाजेपर्यंत शाळेत जाते. नातीचे शाळेचे डबे, पाण्याची बाटली, आणि त्या दोघांचे चे स्वतःचे जेवणाचे डबे भरण्यासाठी मुलीची आणि जावयाची सकाळी लगबग चालू व्हायची. नातीचा डबा भरताना काही मार्गदर्शक तत्वे किंवा Guidelines मात्र पाळल्या जायच्या. घरातल्या फ्रिजवर ऑस्ट्रेलियन सरकारने तयार केलेला एक मार्गदर्शक तक्ता (आकृती क्रमांक-१) लावलेला होता. शाळेच्या डब्यामधे आरोग्यपूर्ण आहार कसा द्यावा, हे त्यामध्ये दाखवलेले होते. तो तक्ता मला फारच आवडला. मी एक बालरोगतज्ज्ञ आहे. बालकांना काय आहार द्यावा याबाबत त्यांच्या पालकांचे समुपदेशन मी नेहमी करते. आहारामधे ताजी फळे-भाज्या, प्रथिने भरपूर असावीत हे मी त्यांना सांगत असते. पण प्रत्यक्षात मुलांना संतुलित आहार कसा द्यावा हे चित्ररूपाने सांगण्याची कल्पना मला खूपच आवडली.
![]() |
| मुलांना संतुलित आहार देण्यासंबंधीचा मार्गदर्शक तक्ता (आकृती क्रमांक-१) |
![]() |
| Levels of prevention(आकृती-क्रमांक-२) |


