माझ्या रोज सकाळच्या फेरफटक्याच्या वाटेवर एके ठिकाणी, पोहे, उपमा, साबुदाणा खिचडी, इडली-वडा, ब्रेड पकोडे, मॅगी, आप्पे, भजी आणि चहा-कॉफी वगैरे विकणाऱ्या चार-सहा गाड्या मला दिसतात. त्या विक्रेत्यांकडे केक, बिस्किटे, क्रीमरोल्स, डोनट्स असे पदार्थही विकायला असतात. एके दिवशी माझ्यासमोरच एक सुशिक्षित आणि चांगल्या घरातील वाटणारी बाई दुचाकीवरून आपल्या शाळकरी मुलीला घेऊन त्यातल्या एका गाडीजवळ थांबली. तिने मुलीच्या दप्तरातून दोन रिकामे डबे काढले आणि त्या खाद्यपदार्थ विक्रेत्याकडे दिले. एका डब्यात केक आणि क्रीमरोल व दुसऱ्या डब्यामध्ये साबुदाणा वडा घेऊन, त्या बाईने ते डबे आपल्या मुलीच्या दप्तरात घातले. गाडीवाल्याला पैसे देऊन, ती बाई फर्र्कन मुलीच्या शाळेच्या दिशेने निघून गेली. असे दृश्य मला हल्ली वरचेवर दिसायला लागले आहे. शालेय मुलांना घरचे ताजे आणि सात्विक अन्न न देता बाहेरचे उघड्यावरचे अन्न देणाऱ्या आयांचे प्रमाण हल्ली फारच वाढले आहे.
आमच्या लहानपणी आम्ही छोट्या सुट्टीसाठी एक आणि मोठ्या सुट्टीसाठी दुसरा असे दोन डबे घेऊन शाळेत जायचो. झाडाखाली कोंडाळे करून एकमेकींच्या डब्यातले पदार्थ चाखत, हसत-खेळत आम्ही वर्गमैत्रिणी डबे खायचो. त्याकाळी सर्वसाधारणपणे सगळ्यांच्याच डब्यांमधे घरी केलेली पोळी-भाकरी व भाजी/चटणी/ लोणचे असायचे. जरा लाडावलेल्या मुलांच्या किंवा श्रीमंत घरच्या मुलांच्या डब्यामधे तूप-साखर-पोळी किंवा तूप-गूळ-पोळी असायची. डब्यामधे काय आणायचे याबाबत आमच्या शाळेमधे तरी काही नियम नव्हते. माझा मोठा भाऊ जयंत चौथीपर्यंत सोलापुरातल्या, अवंतिकाबाई केळकरांच्या 'बालविकास' शाळेमधे जायचा. त्या शाळेत मात्र, सर्व विद्यार्थ्यांनी डब्यांमधे पोळी-भाजीच आणली पाहिजे असा कडक नियम होता. एकदा माझ्या आईने जयंताला डब्यामधे 'वरणफळं' दिली होती. "बाई, जयंताने डब्यात पोळी-भाजी आणलेली नाही" अशी तक्रार इतर मुलांनी केळकरबाईंकडे केली. पण 'वरणफळं' म्हणजे पोळी-वरणाचा प्रकार असल्याने बाईंनी ती तक्रार ऐकून घेतली नाही. एकूण काय तर, त्या काळी घरी केलेले साधे, सकस आणि ताजे पदार्थ मुलाच्या डब्यात देण्याचीच पद्धत होती.
गेल्या वर्षी, जुलैचा महिनाभर आम्ही ऑस्ट्रेलियामध्ये आमच्या मुलीच्या घरी गेलो होतो. आमची पाच वर्षाची नात, सोमवार ते शुक्रवार सकाळी नऊ ते दुपारी तीन वाजेपर्यंत शाळेत जाते. नातीचे शाळेचे डबे, पाण्याची बाटली, आणि त्या दोघांचे चे स्वतःचे जेवणाचे डबे भरण्यासाठी मुलीची आणि जावयाची सकाळी लगबग चालू व्हायची. नातीचा डबा भरताना काही मार्गदर्शक तत्वे किंवा Guidelines मात्र पाळल्या जायच्या. घरातल्या फ्रिजवर ऑस्ट्रेलियन सरकारने तयार केलेला एक मार्गदर्शक तक्ता (आकृती क्रमांक-१) लावलेला होता. शाळेच्या डब्यामधे आरोग्यपूर्ण आहार कसा द्यावा, हे त्यामध्ये दाखवलेले होते. तो तक्ता मला फारच आवडला. मी एक बालरोगतज्ज्ञ आहे. बालकांना काय आहार द्यावा याबाबत त्यांच्या पालकांचे समुपदेशन मी नेहमी करते. आहारामधे ताजी फळे-भाज्या, प्रथिने भरपूर असावीत हे मी त्यांना सांगत असते. पण प्रत्यक्षात मुलांना संतुलित आहार कसा द्यावा हे चित्ररूपाने सांगण्याची कल्पना मला खूपच आवडली.
 |
मुलांना संतुलित आहार देण्यासंबंधीचा मार्गदर्शक तक्ता (आकृती क्रमांक-१) |
नातीला शाळेच्या डब्यामधे एकूण तीन प्रकारचे पदार्थ द्यावे लागत - एक फळाचा डबा , एक स्नॅक्सचा किंवा चमचमीत खाण्याचा डबा आणि एक जेवणाचा डबा. डब्यात रोज एक फळ नेणे आवश्यक होते. नातीने न खाल्लेले किंवा अर्धवट खाल्लेले फळ डब्यामधून एकदाही परत आणले नाही, हे बघून मला जरा कुतूहल वाटले. नातीशी झालेल्या गप्पांमधून कळले की पहिल्या छोट्या सुट्टीमधे सगळ्या मुलांना आधी आपापल्या डब्यातले फळ संपवावे लागते. प्रत्येक विद्यार्थ्याने फळ खाऊन संपवले आहे की नाही हे वर्गशिक्षिका बघतात. त्यानंतरच मुलांना स्नॅक्स खायची परवानगी मिळते. शाळेच्या शिस्तीमधे सर्व मुलांना सारखेच नियम लागू असल्यामुळे आपोआपच सगळी मुले ताजी फळे खायला शिकतात, हे विशेष.
शाळांमधल्या कॅन्टीनमध्ये काय विकले जावे आणि काय विकले जाऊ नये याबाबतही ऑस्ट्रेलियन सरकारने काही मार्गदर्शक सूचना शाळांना दिलेल्या आहेत. त्यामध्ये स्वच्छता, सकस आणि ताजे अन्न विक्री अशा अनेक बाबींचा विचार केलेला आहे. लहान मुलांना स्थूलत्व येऊ नये या हेतूने दिल्या गेलेल्या अनेक सूचनांचे शाळांमध्ये काटेकोरपणे पालन होते. स्थूलत्व हा कुपोषणाचा एक प्रकार आहे. आज संपूर्ण जगभरातील अनेक देशांमधे स्थूलत्व ही मोठीच आरोग्य समस्या आहे. प्रौढावस्थेमधे भेडसावणाऱ्या स्थूलत्वाची सुरुवात बालपणीच होत असते. लहानपणापासून आरोग्यपूर्ण आहाराच्या सवयी लावणे, आणि त्यायोगे लहान मुलांमधील स्थूलत्व रोखणे, हे प्रौढपणीच्या स्थूलत्वाला आळा घालण्याच्या दृष्टीने अत्यावश्यक प्रतिबंधात्मक पाऊल आहे. ऑस्ट्रेलियात संपूर्ण देशपातळीवर संतुलित आहाराचे महत्व शालेय मुलांच्या मनावर बिंबवले जाते हे अतिशय कौतुकास्पद आणि अनुकरणीय आहे. Preventive and Social Medicine हा एक विषय वैद्यकीय अभ्यासक्रमात असतो. समाजाचे स्वास्थ्य बिघडू नये यासाठी वेगवेगळ्या पातळ्यांवर (आकृती-क्रमांक-२) रोगप्रतिबंध कसा करावा हे त्यामध्ये शिकवले जाते. त्यापैकी Primordial prevention ही पहिली आणि अत्यंत महत्वाची पातळी आहे. शालेय मुलांना आहारबाबत योग्य शिक्षण देऊन आणि पालकांना आहाराबाबत मार्गदर्शक तक्ते पुरवून, ऑस्ट्रेलियामध्ये Primordial prevention उत्तम प्रकारे साध्य केले जात आहे.
 |
Levels of prevention(आकृती-क्रमांक-२)
|
आमच्या ऑस्ट्रेलियामधल्या वास्तव्याच्या काळात काही दिवस नातीच्या शाळेला सुट्टी होती. माझ्या मुलीला आणि जावयाला मात्र कामावर जावे लागत होते. सुट्टीच्या पहिल्याच दिवशी मी नातीला उसळ आणि गरम पोळी करून वाढली. फ्रिजमधे ठेवलेली, दह्यातली कोशिंबीर काढून मी तिला वाढणारच होते, पण त्याआधीच ती म्हणाली, "आज्जी, या जेवणात ग्लो-फूड (Glow food) नाहीये. मला काहीतरी ग्लो-फूड पण हवेय." मला तिचे बोलणे नीट समजले नाही असे मी म्हणताच तिने माझी शिकवणी घेतली. प्रत्येक जेवणामधे, गो-फूड (Go food) म्हणजे धान्यापासून बनलेले शरीराला ऊर्जा देणारे पदार्थ, ग्रो-फूड (Grow food) म्हणजे हाडा-मासाची वाढ करणारे प्रथिनयुक्त पदार्थ, आणि ग्लो-फूड (glow food) म्हणजे आवश्यक जीवनसत्वे आणि खनिजे देऊन कांती उजळवणारे पदार्थ हवेत (आकृती-क्रमांक-३). शाळेत शिक्षकांकडून मिळालेली ही शिकवण , तिच्या मनात रुजलेली दिसली. तिचे बोलणे ऐकेल्यानंतर मी फ्रिजमधली कोशिंबीर काढून तिला दिली. 'ग्लो फूड' मिळताच नातबाईंच्या चेहऱ्यावर 'ग्लो' आला!
 |
आरोग्ययपूर्ण आहारासंबंधीच्या सूचना (आकृती-क्रमांक-३) |
शाळेत डबा आणताना पर्यावरणाचेही आरोग्य सुरक्षित राहील, अशाप्रकारे खाद्यपदार्थ आणावेत, अशा सूचनाही मुलांना दिलेल्या होत्या. पर्यावरण स्वच्छ आणि सुरक्षित ठेवण्यामुळे आपले आरोग्य चांगले राहते, हा संदेशही कोवळ्या वयामधेच मुलांच्या मनावर तिथे बिंबवला जात आहे. ऑस्ट्रेलियामधून परत आल्यानंतर मी माझ्या बालरुग्णाच्या पालकांना आरोग्यपूर्ण आहाराबाबतचे तक्ते दाखवून, संतुलित, ताजा आणि सकस आहार कसा द्यावा याबाबत प्रबोधन करू लागले.
आज आपला देश दोन मुख्य प्रकारच्या कुपोषणाने ग्रस्त आहे. एक म्हणजे, अस्वास्थ्यकारक, असंतुलित व आवश्यकतेपेक्षा अधिक आहार घेणाऱ्या लोकांमध्ये येणारे स्थूलत्व; आणि दुसरे म्हणजे, पोषक आणि पुरेसा आहार न मिळाल्यामुळे काही लोकांचे होणारे कुपोषण. या दोन्ही समस्यांशी एकाचवेळी झुंजणाऱ्या आपल्या देशामधे, Go food, Grow food आणि Glow food यांचे योग्य महत्त्व मुलांच्या आणि पालकांच्या मनावर बिंबवण्याची गरज आहे. कुपोषण-निवारणासाठी अभिनव मार्गांचा वापर करून सर्व पातळ्यांवर प्रयत्न होऊ शकतात हे माझ्या नातीच्या शाळेतली 'आरोग्याची शिदोरी' मला सांगून गेली.
Go Grow आणि Glow food मुळे healthy पिढी तयार होईल. Fb, Instagram इ सोशल मीडियाचा वापर करून तज्ञ मंडळींनी याचा प्रचार केला पाहिजे.
उत्तर द्याहटवाखरंय
उत्तर द्याहटवाबरोबर आहे !
हटवाVery Beautiful. 🙏👍
हटवाआहाराबद्दल जेवढी उदासीनता आहे तितकीच
हटवाउदासीनता व्यायामाबद्दल आहे.
चांगली कल्पना आहे आपल्याकडे सुद्धा होईल थोडा वेळ लागेल
उत्तर द्याहटवाहो... खरं आहे.
उत्तर द्याहटवाGo-food, Grow-food, Glow-food अशा प्रकारचे नियम आपल्या इथेही शाळांतून लागू व्हायला हवेत. आपल्याकडे कुपोषण निर्मूलनाच्या नावाखाली करप्शन वर्धन होते.
उत्तर द्याहटवाबाल आरोग्य विकासाची ऑस्ट्रेलियातील पद्धत आवडली.
- विठ्ठल कुलकर्णी
Hopefully,it happens in our country as well
उत्तर द्याहटवाखूप माहितीपूर्ण लिखाण!👍
उत्तर द्याहटवाधन्यवाद संपदाताई!
उत्तर द्याहटवाAbsolutely correct
उत्तर द्याहटवानवीनच माहिती मिळाली.
उत्तर द्याहटवाव्वा...किती सविस्तर आणि तपशीलवार लेखन...🥭🌱🫒🥒🥝.
उत्तर द्याहटवाकाळाच्या ओघात गोष्टी बदलत जातात आणि आपण कुठून सुरुवात केली होती हे सुद्धा माणूस विसरतो..
सध्याची कार्य प्रवन जी पिढी आहे की ज्याच्या हातात सध्या अधिकार आणि सत्ता आहे ती पिढी घडत असताना कोणत्या परिस्थितीतून वर आली हे बरेच लोक स्वतःच विसरलेले आहेत...
आरोग्यपूर्ण जीवन मग ते स्वतः चे असो की पर्यावरणाचे हे लहानपणापासून शिकून सुद्धा बेजबाबदार पालक तयार झाले आहेत आणि सहाजिकच मुलांवर सुद्धा तसे संस्कार होत आहेत... भविष्यासाठी हे योग्य नाही.. आपली लोकसंख्या आणि उपलब्ध जागा किंवा आकारमान यांचा विचार केला तर आपण स्वतःहूनच स्वतःला, स्वतःच्या पर्यावरणाला नष्ट करत आहोत असे म्हणावे लागेल..
ऑस्ट्रेलिया सारखा देश ज्याच्याकडे इतकी मोठी जागा आहे..
अडीच पावणेतीन कोटी लोकसंख्येच्या देशाकडे 770 कोटी हेक्टर जमीन आहे.. आणि आपल्या भारताची लोकसंख्या 142 कोटी आणि आपल्याकडे जमीन मात्र 328 कोटी हेक्टर ....
म्हणजे हे प्रमाण किती विषम आहे म्हणजे आपण जो कचरा निर्माण करत आहोत तो आपल्या पर्यावरणावर किती मोठा बोजा निर्माण करत आहे ही विचार करायला लावणारी गोष्ट आहे...
स्वतःच्या आहारातून जो वेस्ट पदार्थ तयार होत आहे त्याचा बोजा पर्यावरणावर पडत असतो. ऑस्ट्रेलिया सारखा देश आरोग्यपूर्ण आहार त्याचबरोबर त्या आहारातून कचरा निर्माण होऊ नये म्हणून अन्नपदार्थ ठेवण्यासाठी कचरा निर्माण करणाऱ्या वस्तू न वापरता पुनर्वापर होणाऱ्या वस्तू जेवणासाठी वापरण्यावर भर देत आहे आणि लहानपणापासूनच मुलांवर तसे संस्कार करत आहे ही गोष्ट निश्चितच आवडणारी आहे,,,
आणि आपण त्यातून बोध घेणे आवश्यक आहे..
आपण सध्या एक तर वेष्टनात बांधलेले पदार्थ खातो आणि ती सगळी रॅपर्स फेकून देतो...
ज्यामध्ये 95 टक्के भाग हा केवळ प्लास्टिक रॅपर्सचा असतो की जो कचरा उपयोगी ठरू शकत नाही ....
साठून राहतो त्याचा पुनर्वापर करणे अशक्य आहे...
आणि या पद्धतीने आपण शेकडो हजारो कोट्यावधी टन कचरा दररोज निर्माण करत आहोत ही किती भयानक गोष्ट आहे...
याचं शिक्षण लहानपणापासून मुलांना देणे गरजेचे आहे.
याची सुरुवात अन्नपदार्थांच्या प्रक्रियेपासून होते..
प्रक्रिया विरहित अन्न खाण्यावर भर देणे यासाठीच आवश्यक आहे
....
माणसाचं आरोग्य आणि पर्यावरणाचं आरोग्य ह्या एकमेकांना अनुकूल परिणाम साधनाऱ्या गोष्टी आहेत ...
याचा वेगवेगळ्या विचार न करता एकत्रित आणि समन्वयाने विचार होणे गरजेचे आहे...
ज्या गोष्टी पर्यावरण पूरक नाहीत त्या मनुष्यासही पूरक नाहीत हे ध्यानात ठेवणे गरजेचे आहे ...
या दृष्टिकोनातून हा लेख खूपच महत्त्वाचा वाटला...
एक वेगळी दृष्टी देऊन गेला....
आपण आपला आहार हा निसर्गातल्या मूळ स्वरूपात तो पदार्थ जसा आहे त्याच्यावर प्रक्रिया कमीत कमी होऊन घेतला पाहिजे..
जेणेकरून आपणही आपले जीवन निसर्गास अनुरूप करून घेऊ...
ही दृष्टी खरोखरच महत्त्वाची वाटली...
जितकी प्रक्रिया जास्त तितका तो पदार्थ आरोग्याला अपायकारक....
आणि साहजिकच तो पर्यावरणासही पूरक नाही....
ही दृष्टि महत्त्वाची आहे..
त्याचबरोबर आहारामधली सर्वसमावेशकता सुद्धा साधता आली पाहिजे ज्याला आपण चौरस आहार म्हणू ...
मग त्यामध्ये कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन, फॅट्स, जीवनसत्व अशा सर्व प्रकारच्या अन्नद्रव्यांचा योग्य प्रमाणात समावेश असणं ही गोष्ट लहानपणापासून मुलांना शिकवली जाणं गरजेचे आहे...
त्यासाठी अगोदर आई-बाबांचे वर्तन सुद्धा तसेच आवश्यक आहे...
मुलं सांगण्यातून जितकी शिकतात तशीच आपल्या सभोवतालच्या लोकांच्या वर्तनातून सुद्धा शिकत असतात ....
आपले आई बाबा कसं वागतात याचे निरीक्षण मुलं करतात आणि त्या निरीक्षणातून स्वतः कसं वागावं ते ठरवत असतात....
त्यासाठी त्यांना लिखित स्वरूपात किंवा शाब्दिक स्वरूपात वेगळे उपदेशाचे डोस पाजण्याचे आवश्यकता नाही.....
निरीक्षणातून आणि अनुभवातून जे शिकलं जातं ते दीर्घकाळ टिकणार असतं.
आपल्या लेखासाठी आपले शतशः आभार....खूप चांगले विचार आणि प्रबोधन...
🥭🌱🥝🥒🫒🍅🌷🥬🍇🍉🫛🥦🍎🫐🍒🍏
धन्यवाद सर!
हटवाखूप माहितीपूर्ण लेख 👍👌
उत्तर द्याहटवामला वाटते, आपल्या घरातच नवी पिढी असा विचार आता करते आहे. इतका detailed नसेल, पण आहे....
उत्तर द्याहटवामेघा
काही घरात निश्चित करतात.. पण अनेक घरामधे नाही...
हटवाखूप छान माहिती मिळाली
उत्तर द्याहटवाKhup chan
उत्तर द्याहटवाखुप माहितीपूर्ण व उपयुक्त लिखाण आहे
उत्तर द्याहटवाअतिशय आवश्यक आणि योग्य मार्गदर्शन!🌷👌
उत्तर द्याहटवाआभारी आहे!
हटवाधन्यवाद!
उत्तर द्याहटवाखुप छान माहिती ,नविन पिढीने याचा उपयोग व अनुकरण केल्यास नक्कीच फायदा होईल.
उत्तर द्याहटवाआजच्या पिढीसाठी उपयुक्त माहिती.
उत्तर द्याहटवाअतिशय प्रबोधन करणारं लेखन!
उत्तर द्याहटवाअप्रतिम! किती जागरूक आहे, Australian सरकार! तू घेतलेली दखल आमच्या पर्यंत पोहचवलीस. अतिशय मनापासून धन्यवाद! 🙏😊
So true, very much useful these days
उत्तर द्याहटवा