डायबेटिसचे मुख्य दोन प्रकार असतात. साधारण ९५ टक्के लोकांना टाईप-२ डायबेटिस असतो तर साधारण ५ टक्के लोकांना टाईप-१ डायबेटिस असतो.
टाईप-१ डायबेटिसच्या रूग्णांमधे शरीरामधे इन्सुलिन तयार होणे हळूहळू कमी होऊन शेवटी बंद होते. त्यामुळे त्या रूग्णांमधे रक्तातील साखर नियंत्रित करण्यासाठी बाहेरून इन्सुलिन घेणे अत्यावश्यक असते. त्यांच्यामधे डायबेटिस रिव्हर्सल अशक्य असते. अशा रूग्णांना आयुष्यभर इन्सुलिन इंजेक्शन घ्यायलाच लागते.
टाईप-२ डायबेटिसचे मुख्य कारण 'इन्सुलिन रेझिस्टन्स' म्हणजे इंन्सुलीनच्या कार्याला अवरोध निर्माण होणे, हे असते. अशा रुग्णांमधे जीवनशैलीमधे योग्य बदल करून डायबेटिसचे रिव्हर्सल शक्य होते.
पूर्वी Allopathy मधील फिजिशियन्स रुग्णांना वेळ देऊन, जीवनशैलीतील बदल कसे करावेत हे समजावून सांगत व डायबेटिस रिव्हर्सल करत. पण कालांतराने मेडिकलची शिक्षणपद्धतीत घसरण होत गेली. त्यामुळे काही Allopathy डॉक्टर्सनासुद्धा जीवनशैलीचे महत्त्व नीटसे समजेनासे झाले. तसेच हळूहळू अनेक कारणांनी प्रॅक्टिस (मेडिकल शिक्षणाचे खाजगीकरण, पैशाला आलेले अवाजवी महत्व, कट प्रॅक्टिस, वेगवान आयुष्य इत्यादी ) बदलत गेली. बरेचसे डॉक्टर्स रुग्णांना वेळ देईनासे झाले. त्यामुळे रक्तातील साखर कमी करण्यासाठी औषधे देण्यावर आणि तरीही रक्तातील साखर नियंत्रण करणे शक्य न झाल्यास अजून-अजून औषधे वाढवण्यावर भर देणे सुरू झाले. जीवनशैली, आहारशैली यावर बोलण्यासाठी डॉक्टर्स वेळ खर्च करेनासे झाले.
त्याचबरोबर इतर पॅथीतील आणि इतर अर्धशिक्षित लोकांनी डायबेटिसच्या रुग्णांच्या आहाराबद्दल अनेक गैरसमज पसरवणे चालूच ठेवले. (डायबेटिसच्या रूग्णाने साखरेऐवजी गूळ खाल्ला तरी चालतो, पोळीच्या ऐवजी भाकरी खाणे उत्तम, कारले, जांभळे आणि मेथ्यामुळे रक्तातील साखर कमी होते.. असे अनेक गैरसमज )
अशा वातावरणात *_डायबेटिस रिव्हर्सल चा धंदा_* फोफावत गेला. हे करणारे धंदेवाईक सर्व पॅथीतले आहेत.
डायबेटिस रिव्हर्सल मधे कायकाय केले जाते?
१. कित्येक हजाराचे पॅकेज रुग्णांना विकले जाते.
२. डायबेटिसच्या रूग्णांमधे आहारशैली कशी असावी, हे शिकवले जाते.
३. व्यायाम शिकवला जातो
४. स्ट्रेस मॅनेजमेंट शिकवली जाते. मुळात असे डायबेटिस रिव्हर्सल शक्य आहे, हे ऐकून रुग्णांचा निम्माअधिक ताण कमी होऊन त्यांचा डायबेटिस थोड्या प्रमाणात नियंत्रित व्हायला लागतो.
५. झोपेची शिस्त आणि आरोग्य शिकवले जाते. त्यामुळे हार्मोनल इंबॅलन्स कमी होतो.
६. कित्येकदा, डायबेटिसच्या रूग्णांसाठी योग्य अशा वेगवेगळ्या पाककृती शिकवल्या जातात. कित्येकदा काही वंडर फूड्स सांगितली जातात व गिमिक्स शिकवल्या जातात. (दुधाऐवजी आमंड मिल्क/ओट्स मिल्क प्यावे, गहू बंद करावा इत्यादी). या गोष्टी जरी harmless असल्या तरी त्यांना शास्त्रीय आधार नसल्याने, रूग्णांमधे अंधश्रद्धा पसरून संभ्रम निर्माण होतो.
७. भरपूर पैसे उकळून निवासी शिबिरे घेतली जातात. तिथे नाविन्यपूर्ण मार्गांनी सुयोग्य आहारशैली आणि जीवनशैली शिकवली जाते.
८. कित्येकदा पैसे घेऊन त्यांच्या कडचे दिवसभराच्या आहारासाठीची रेडिमेड पाकिटे विकली जातात.
९. Continuous glucose monitoring (CGM) मशीन लावून नेमकी कशामुळे आणि किती खाल्ल्यामुळे तुमची शुगर किती वाढते याचे मोजमापन करून दिले जाते. जे वाईट नाही. पण दर पंधरा दिवसांनी त्या मशीनसाठी काही हजार रूपये भरावे लागतात. जे अनावश्यक आहे.
१०. तुम्हाला डॉक्टर न्यूट्रिशनिस्ट, फिजिओथेरपीस्ट अशी सपोर्ट सिस्टीम दिली जाते. हे जरी खरे असले तरीही रूग्णाला आजाराबद्दल सुशिक्षित व आत्मनिर्भर करून आपापला आजार आटोक्यात ठेवण्यासाठी सक्षम बनवले जात नाही. सतत त्या लोकांवर अवलंबून राहावे यासाठी प्रयत्न असतो. कारण जितका काळ रूग्ण त्यांच्यावर अवलंबून राहील, तितका काळ Diabetes reversal programme वाल्यांना पैसा मिळत राहतो.
डायबेटिस रिव्हर्सल हा धंदा आहे.. पण संपूर्णपणे वाईट धंदा आहे असे मी म्हणणार नाही.
कुठल्याही सुशिक्षित डायबेटिस रुग्णाने, साखर नियंत्रणासाठी योग्य आणि आरोग्यपूर्ण जीवनशैलीबाबत नीट समजून घेतले तर, 'डायबेटिस रिव्हर्सल' वर पैसे खर्च करावे न लागता डायबेटिस रिव्हर्सल करता येऊ शकते. तसेच फिजिशियन्सनाही त्यांच्या रोजच्या प्रॅक्टिसमधे रुग्णांना थोडा वेळ देऊन, त्यांचे समुपदेशन करून हे करणे सहज शक्य आहे.
डॉ स्वाती बापट, MBBS, MD (Pediatrics), पुणे*