रविवार, ३० मे, २०२१

Be open!

करोना महामारीमुळे सोशल मीडियावर अनेक वादांना तोंड फुटले. राजकीय, सामाजिक विषयांबरोबर आरोग्यसेवा आणि वेगवेगळ्या उपचारपद्धतीचा प्रश्न तर ऐरणीवरच आला. 

खरेतर, कुठल्याच पॅथीमध्ये करोनावर रामबाण इलाज नाही. हे वास्तव ऍलोपॅथी व्यावसायिकांनी प्रांजळपणे मान्य केले. Modern Medicine च्या Evidence-based practice या तत्वाप्रमाणे, जसजशी काही नवीन औषधे लागू पडण्याची शक्यता असल्याचे पुरावे समोर आले, तसतसे नवनवीन औषधे व उपचारपद्धती वापरण्यास सुरुवात झाली. त्यानंतरही, जेंव्हा-जेंव्हा ऍलोपॅथीची काही औषधे करोना उपचारांसाठी लागू पडत नाहीत हे सिद्ध झाले तेंव्हा त्या औषधांचा वापर बंद करण्याच्या सूचना जागतिक आरोग्य संघटनेने (World Health  Organization) केल्या. त्यानुसार सातत्याने बदल करत, जगभरातील ऍलोपॅथी व्यावसायिकांनी करोना रुग्णांचे जीव वाचवायची शिकस्त केली. 

जगभरात उद्भवलेल्या बिकट परिस्थितीत, इतर देशांमधील जनतेने modern medicine च्या डॉक्टरांच्या प्रयत्नांवर पूर्ण विश्वास ठेऊन, एकजुटीने त्यांना पाठिंबा दिला. भारतात मात्र इतर पॅथीच्या अनेक 'व्यावसायिकांनी' ही संधी साधून ऍलोपॅथीच्या उपचारपद्धतीची खिल्ली उडवणे सुरु केले. अनेक जणांनी, "प्रतिकारशक्ती वाढवणारी", किंवा "करोना न होऊ देणारी", आणि "करोना झालाच तरी त्यातून पूर्ण बरे करणारी", किंवा "करोनावरील एलोपॅथीच्या उपचारांमुळे शरीरावर झालेले दुष्परिणाम घालवणारी", अशी अनेक औषधे बाजारात आणली. एकीकडे ती औषधे खपवून आपली पोळी भाजून घेतलीच. पण, दुसरीकडे, "करोना लसीकरण करू नये, हॉस्पिटलमध्ये भरती झालात तर मृत्युमुखी पडण्याचीच शक्यता जास्त आहे", असे काही संदेश व्हिडीओ आणि लेखी पोस्टद्वारे सोशल मीडियामध्ये पाठवून सामान्य जनतेची दिशाभूल करायलाही मागेपुढे पहिले नाही. अशा पोस्टमधून अत्यंत चतुराईने स्वतःची जाहिरातबाजीही त्यांनी करून घेतली. आणि, या सगळ्या प्रकारात 'मिक्सोपॅथी' किंवा 'इंट्रीग्रेटेड मेडिसिन' वापरात असले पाहिजे अशीही चर्चा पुन्हा सुरु झाली. 

एका ग्रुपवरच्या चर्चेमध्ये, "मिक्सोपॅथीला' माझा विरोध आहे" हे मी स्पष्ट केले. त्यावर, उजव्या विचारसरणीच्या माझ्या एका स्नेह्याने, "Come on Swatee, be open. तुम्ही ऍलोपॅथीवाले ना, अजिबात open minded नसता. एक साधा विचार करून मला सांग, हजारो वर्षांपासून आपल्या देशात वापरामध्ये असलेली आयुर्वेदाची उपचारपद्धती चुकीची असूच कशी शकेल?"

"ती उपचारपद्धती चुकीची आहे असं माझे मत नाही. पण, त्या उपचारपद्धतीला अजूनही जगन्मान्यता लाभलेली नाही. Modern Medicine हे Evidence-based practice वर आधारित आहे. यामध्ये सखोल आणि व्यापक चाचण्या करून, तौलनिक संशोधन प्रकल्प राबवले जातात. चाचण्या आणि संशोधनातून समोर येणाऱ्या निष्कर्षांच्या कसोटीवर एखाद्या औषधामुळे होणारे फायदे आणि तोटे काय आहेत हे जोखले जाते. फायदे आणि तोटे यांचा एकत्रित विचार करून एखाद्या औषधाची उपयुक्तता किती आहे आणि अपाय किती प्रमाणात आहे बघितले जाते.  याच निकषांवर इतर कुठल्याही पॅथीच्या औषधांची उपयुक्तता सिद्ध झाली तर Modern Medicine, त्यातील गुणकारी घटक वापरून, औषधे तयार करून  वापर करते. We are quite open about it! मात्र, त्यातील काही औषधे त्यांच्या 'side effects मुळे, उपयुक्ततेपेक्षाही अधिक हानिकारक आहेत, असे सिद्ध झाले तर त्या औषधांचा समावेश Modern Medicine मध्ये होत नाही." 

"एखादी उपचारपद्धती व त्यातील औषधे भारतात हजारो वर्षांपासून वापरली जात आहेत, आणि नैसर्गिक वनस्पती पासून तयार केली जात असल्यामुळे त्यांचे काहीही 'side effects' नाहीत, हे केवळ बोलून भागणार नाही. व्यापक संशोधन आणि चाचण्यांचे निष्कर्ष दाखवणारे रिसर्च पेपर समोर ठेवून जगभरातील शास्त्रज्ञांना त्यावर विश्वास ठेवायला भाग पाडले पाहिजे. तसे होईपर्यंत सामान्य नागरिकांनीही आंधळेपणाने त्यांवर विश्वास ठेवणे त्यांच्या हिताचे नाही." 

"इतर कुठल्याही पॅथीतील औषधांपेक्षा आमच्या पॅथीत एखादे औषध जास्त चांगले आहे किंवा एखाद्या असाध्य रोगावर आमच्या पॅथीत रामबाण औषध आहे असा दावा करायला काहीच हरकत नाही. पण त्या दाव्याला जगन्मान्यता मिळवण्यासाठी त्या औषधातील घटक निस्संदिघ्नपणे जगासमोर आणायची तयारी हवी. तसेच संशोधनासाठी ते औषध उपलब्ध करून द्यायला हवे. हे करायला इतर पॅथीचे लोक तयार आहेत का?  Are they open for this idea? ते आधी बघ आणि मला सांग." असे मी माझ्या त्या स्नेह्याला सांगितले. 

तो विषय तिथेच थांबला. पण त्या चर्चेमुळे, अनेक वर्षांपूर्वी डॉ.राम गोडबोले सरांच्या हाताखाली मी काम करत असतानाचा एक अनुभव मला आठवला.  

एकदा, जेमतेम तिशीचा एक पेशन्ट गोडबोले सरांकडे तपासणीसाठी आला. त्याच्या अंगातील रक्त खूपच कमी झाल्यामुळे तो पांढराफटक पडला होता. म्हणजेच, त्याला Severe Anaemia झालेला दिसत होता. त्याला कमालीचा थकवाही आला होता. त्याला आणि त्याच्या नातेवाईकांना सरांनी काही प्रश्न विचारले. त्याच्या शरीराच्या एखाद्या भागातून, अंतर्गत अथवा बहिर्गत रक्तस्त्राव तर होत नसेल ना, हे जाणून घेण्याचा प्रयत्न सरांनी केला. त्याला तपासून झाल्यावर, त्याच्या आजाराचे नेमके निदान करण्यासाठी सरांनी काही चाचण्या लिहून दिल्या. 

त्या दिवशीचे सर्व ओपीडी पेशंट्स तपासून झाल्यावर सरांनी आपला मोर्चा हॉस्पिटलच्या प्रयोगशाळेकडे (Pathology Lab) कडे वळवला. त्या तरुणाच्या रक्ताचे बरेचसे रिपोर्ट्स तयार झाले होते. गोडबोले सरांनी स्वतः मायक्रोस्कोपखाली त्याच्या रक्ताची फिल्म बघितली आणि आम्हालाही बघायला सांगितली. त्या तरुणाला, एका प्रकारचा  रक्ताचा कॅन्सर झाला होता. त्यावेळी तरी त्या आजारावर ऍलोपॅथीमध्ये कुठलेही औषध नसल्याने आमच्या दृष्टीने तो असाध्य रोग होता. दोन-चार महिन्यातच त्या तरुणाचा मृत्यू होणे अटळ आहे असे दिसत होते.

दुसऱ्या दिवशी सर्व रिपोर्ट्स घेऊन त्या तरुणाचे नातेवाईक आले. सरांनी त्यांना त्या आजाराचे गंभीर स्वरूप समजावून सांगितले. ऍलोपॅथीमध्ये ते दुखणे बरे करण्यासाठी नेमके औषध त्याकाळी उपलब्ध नसल्याचेही स्पष्ट केले. हे ऐकताच, गळाठून गेलेल्या नातेवाईकांपैकी कोणीतरी विचारले, "आमच्या गावाकडे एक वैद्य आहेत. त्यांच्याकडे असाध्य रोगावर औषधे आहेत असे म्हणतात. त्यांचे औषध आम्ही केले तर चालेल का?"
 
गोडबोले सरांनी त्यांना सांगितले, "मी ऐकून आहे की इतर औषधपद्धतींमध्ये अनेक व्याधींवर गुणकारी औषधे आहेत. पण मला त्याबाबत सखोल ज्ञान नाही. मी मात्र या मुलाचा जीव वाचवायला असमर्थ आहे. या आजारावरचे औषध तुम्हांला इतरत्र कुठेही मिळत असेल तर तुम्ही निश्चित त्याचा विचार करा." त्या नातेवाईकांचे चेहरे पाहून सरांना आणि आम्हा सर्वांनाही खेद वाटला, पण कालांतराने आम्ही सगळेच त्या तरुणाला विसरून गेलो. 

काही महिन्यानंतर तो तरुण परत सरांना दाखवायला आला. तो अगदी व्यवस्थित व सशक्त दिसत होता. आम्ही सगळे आनंदित आणि आश्चर्यचकित झालो. त्या तरुणाच्या रक्ताची तपासणी करून त्याच्या आजाराबाबत शहानिशा करण्याचे सरांनी ठरवले. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, त्याच्या रक्तात त्या असाध्य रोगाचा मागमूसही दिसून आला नाही. आम्हा सर्वांनाच त्या वैद्यांच्या उपचारपद्धतीबद्दल आणि औषधांबद्दल कमालीचा आदर आणि कौतुक वाटले. सरांनी त्या वैद्यांसाठी एक पत्र लिहून त्या तरुणाजवळ दिले. त्या पत्रात सरांनी त्या वैद्यांचे आभार मानले होते. तसेच, त्यांनी कोणती औषधयोजना केली ते सांगावे व औषधांचे नमुने पाठवावे अशी विनंतीही केली होती. त्या औषधांवर संशोधन करून प्रसिद्ध केल्यास अशा प्रकारच्या सर्वच रुग्णांना जीवनदान मिळू शकेल, असेही सरांनी लिहिले होते. 

मोठ्या आतुरतेने आम्ही सगळेच त्या वैद्यबुवांच्या उत्तराची आणि औषधांच्या नमुन्याची वाट बघत होतो. काही दिवसांतच तो तरुण वैद्यबुवांचा निरोप घेऊन आला. वैद्यबुवांनी त्यांची उपचारपद्धती सांगण्यास आणि औषधांचे नमुने पाठवण्यास साफ नकार दिला होता. त्यानंतरही, सरांनी अनेक प्रकारे त्या वैद्यबुवांसोबत संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, पण त्यांना यश आले नाही. वैद्यबुवांनी पाळलेल्या त्या गुप्ततेचे कारण कळू शकले नाही, पण त्याबद्दल हळहळ मात्र आम्हाला वाटत राहिली. 

माझ्या स्नेह्याशी पुन्हा झालेल्या संभाषणात मी त्याला हा प्रसंग सांगितला. 
"आपल्या देशातील पारंपरिक औषधपद्धतीला जगन्मान्यता मिळावी असे मलाही वाटते. पण त्या पद्धतीमधील औषधे गुणकारी आहेत हे निर्विवादपणे सिद्ध झाल्याशिवाय ते शक्य होणार नाही. त्याकरिता, त्या पद्धतीमधील सर्व औषधे संशोधनासाठी उपलब्ध व्हायला हवीत ना? काही पारंपरिक औषधांची उपयुक्तता जगन्मान्य झालेली आहे. उदा: (https://www.ncbi.nlm.nih.gov/pmc/articles/PMC3560124/
तसेच, काही औषधे Modern Medicine च्या औषधांसोबत वापरल्याने रोगावर अधिक चांगला परिणाम होतो असेही संशोधनांती सिद्ध झालेले आहे. उदा: (https://pubmed.ncbi.nlm.nih.gov/23125511/). 
काही औषधे मात्र आरोग्याला हानिकारक आहेत, हे देखील संशोधनाद्वारे कळलेले आहे. उदा: (https://pubmed.ncbi.nlm.nih.gov/31641694/)"
 
एवढे सांगून मी माझ्या त्या स्नेह्याला स्पष्टपणे विचारले, "आम्ही ऍलोपॅथीवाले Open-minded नसतो, हे तुझे म्हणणे खोडून काढण्यासाठी यापेक्षा अधिक सबळ युक्तिवाद काय असू शकेल? We are quite open. But, are  the others open too?"

इतर पॅथीमधील काही व्यावसायिक आजही आपल्या उपचार व औषधांसंबंधी गुप्तता पाळत असल्याचे एक उदाहरण, काही वर्षांपूर्वी माझ्याच एका पेशंटमुळे माझ्यासमोर आले होते. त्याबद्दल मी लवकरच सांगेन. 

तोपर्यंत वाचकांनी अधिक शास्त्रोक्त माहितीसाठी खालील लिंक जरूर वाचावी. 

३ टिप्पण्या:

  1. खूप छान मांडणी आणि पटण्याजोगी सुध्दा.

    तुझी लेखन शैली खूप छान आहे.

    Keep it up.

    उत्तर द्याहटवा
  2. जे लोक हळदीचं ही पेटंट घ्यायचा प्रयत्न करत होते ते कॅन्सर च्या औषधाचे श्रेय एका वैद्याला देतील हे माननं म्हणजे भोळेपणा आहे.
    दिल्ली कोर्टानं IMA च्या प्रमुकानांना, जॉन ऑस्टिन जयलाल याना नोटीस पाठवली आहे. कोविड19 हिंदूं पेशंट के धर्मांतर करून ख्रिश्चन केल्याबद्दल.
    तेलंगणा मध्ये 5 मोठया कोविड हॉस्पिटल चे परवाने ज्यादा बील व चुकिचे उपचार केल्यामुळे रद्द केले आहेत व 50 होस्टपिटल्स ना नोटीस पाठवली आहे. अलोपथी डॉक्टर हे काही धुतल्या तांदळाचे नाहीत.अनेक डॉक्टरांचे काळे धंदे बाहेर आले आहेत.
    आयुर्वेद हजारो वर्षापासून आहे तर एलोपथी फक्त दोन शतका पासून आहे. या आधी मांनवजाती ने कोविड 19 सारख्या किंवा त्यापेक्षा भयंकर साथीचा सामना नक्कीच केला असेल. त्यावेळे एलोपथी नव्हती. मग मानव जगले कसे? अर्थात आयुर्वेदामध्ये नक्कीच प्रभावी उपचार असणार. काळाच्या ओघात व परकीय आक्रमणं यामुळे ते ज्ञान लोप पावलं असेल कदाचित. याचा अर्थ आयुर्वेद कमअस्सल व एलोपथी भारी असा होत नाही. सर्व पॅथी चा उपयोग जनतेला मोकळेपणे करून द्यावा. परदेशातील सोडा भारतातील किती एलोपथी डॉक्टर आयुर्वेदाची प्रशंसा करतात? प्रशंसा सोडा ते आयुर्वेदाला शास्त्रही मानत नाहीत. हे सर्व केवळ व्यावसायिक हेवेदावे यामुळे आहे.
    दोन्ही बाजूने जे गैरफायदा घेणारे लोक आहेत त्यांच्यावर सरकार ने जरूर कारवाही करावी. IMA अथवा बाबा रामदेव यांनी एकमेकांवर चिखल फेक करू नये हे बरे. या वादाच्या आड गरीब हिंदूंना ख्रिश्चन बनवण्याचं षडयंत्र IMA च्या प्रमुखकडून कडून होत असेल तर ते निषेधार्ह आहे.

    उत्तर द्याहटवा