गुरुवार, २७ मे, २०२१

रामदेव?.....जाना देव!

ही  गोष्ट आहे १९८६ सालची. ऍलोपॅथी म्हणजेच मॉडर्न मेडिसिन मधील माझ्या गुरूंच्या, म्हणजेच सोलापूरच्या सुप्रसिद्ध डॉ. राम  गोडबोले सरांच्या हाताखाली, त्यावेळी शिकाऊ डॉक्टर म्हणून मी काम करत होते. 

सोलापूरमधील वाडिया धर्मादाय हॉस्पिटलमध्ये गोडबोले सर मानद फिजिशियन होते. रोज सकाळी ९-९.१५ पर्यंत सर हॉस्पिटलमध्ये पोहोचत असत. सर्वप्रथम, त्यांच्या नावावर भरती झालेले वॉर्डमधील सर्व रुग्ण ते तपासत. त्यानंतर, ओपीडीतले रुग्ण तपासायला सुरुवात करत. त्यांच्या रोजच्या ओपीडीला जवळपास तीस-पस्तीस पेशन्ट्स असायचे. प्रत्येक पेशंटला पुरेसा वेळ देऊन तपासण्याची त्यांची पद्धत होती. त्यांच्या हाताखाली एकावेळी आम्ही तीन चार शिकाऊ डॉक्टर्स काम करत असू. 

एक रुग्ण तपासून झाला की त्याच्या रोगाचे निदान काय व औषधयोजना कशी असावी, हे सर आम्हाला तोंडी सांगत असत. त्यानंतर सर पुढील रुग्णाला तपासायला सुरुवात करत. सरांच्या तोंडी सूचनांप्रमाणे औषधांची चिट्ठी लिहून द्यायचे काम आम्ही शिकाऊ डॉक्टर आळीपाळीने करत असू. लिहून दिलेली औषधे त्या-त्या रुग्णाने विकत आणून सरांना दाखवली पाहिजेत असा सरांचा आग्रह असे. आपल्या सूचनांप्रमाणे योग्य ती औषधे चिट्ठीत लिहिली गेली आहेत आणि केमिस्टनेही त्या चिट्ठीप्रमाणेच औषधे  पेशन्टला दिली आहेत याची खात्री सर करून घेत असत. तसेच, ती औषधे घेण्याबद्दलच्या सूचनाही सर स्वतःच पेशंटला देत असत.  

एके दिवशी एका रुग्णाने केमिस्टकडून आणलेली औषधे पाहताच सर जरा अस्वस्थ झालेले दिसले. सरांनी स्वतः त्या पेशंटकडे दिलगिरी व्यक्त करून सांगितले की एक औषध नजरचुकीने लिहिले गेले आहे. शिकाऊ डॉक्टरांनी लिहून दिलेली चिठ्ठी सरांनी स्वतःकडेच ठेऊन घेतली, आणि चुकीने लिहिलेले ते औषध वगळून, इतर सगळी औषधे स्वतः लिहून रुग्णाला नवीन चिट्ठी दिली. ती औषधे कशी घ्यायची ते समजावून सांगितले आणि त्या पेशंटची बोळवण केली. 

संपूर्ण ओपीडी संपल्यावर, इतर शिकाऊ डॉक्टर्सना जायला सांगून सरांनी मला एकटीलाच ओपीडीत थांबायला सांगितले. त्यानंतर, त्या रुग्णाला आधी दिलेली औषधांची ती चिट्ठी माझ्या हातात देत अगदी शांत आवाजात सरांनी मला विचारले, 

 "हे अक्षर तुझे आहे का?"

 सरानी समोर धरलेल्या कागदाकडे पाहत, ते अक्षर माझेच असल्याची कबुली मी दिली. 

"हे जे शेवटचे औषध लिहिले आहेस ते मी सांगितले नव्हते."

"हो. तुम्ही सांगितले नव्हते सर. पण, तो पेशन्ट म्हणाला की तो रोज ते औषध घेतो. त्याने विनंती केली म्हणून मी ते लिहिले. "

"औषधशास्त्र (Pharmacology) या विषयामध्ये या औषधाबद्दल तू काही शिकली आहेस का? "

"नाही सर. कारण, ते औषध ऍलोपॅथीचे नाहीये." 

"मग ही गोष्ट माहिती असूनदेखील तू ते औषध का लिहिलेस?  एक लक्षात ठेव, ज्या पॅथीचे आपण शिक्षणच घेतलेले नाही त्या पॅथीचे कुठलेही औषध लिहायचा कायदेशीर अधिकार आपल्याला नाही. शिवाय, तसे करणे अनैतिकही आहे. तसेच, एखाद्या ऍलोपॅथीच्या औषधाबद्दलही आपल्याला संपूर्ण आणि निश्चित माहिती नसल्यास, ते औषध कधीही लिहायचे नाही." 


इतर पॅथीचे औषध लिहून देण्यातले संभाव्य धोके सरांनी मला विस्ताराने सांगितले. ऍलोपॅथी शिकताना, फार्माकोलॉजी विषयामध्ये प्रत्येक औषधाचा तपशीलवार अभ्यास केला जातो. ते औषध कसे द्यायचे, कोणकोणत्या व्याधींसाठी वापरायचे, किती प्रमाणात, व किती काळ ते औषध घेतले तर ते उपयुक्त असते, कमी वा जास्त प्रमाणात, किंवा कमी वा जास्त काळ घेतले तर रुग्णाला काय धोका निर्माण होऊ शकतो,  त्या औषधाचे एकंदर परिणाम (effects) व दुष्परिणाम (side-effects) कोणते, त्या औषधांबरोबर इतर काही औषधे घेतल्यास, त्यामुळे त्यांचे होणारे  एकत्रित परिणाम (drug interactions), अशा सर्व बाबींचे सखोल अध्ययन केल्यामुळे, त्यांची पूर्ण जाण ऍलोपॅथी डॉक्टरला होते. मुख्य म्हणजे, ऍलोपॅथीच्या औषधांबाबतची माहिती संकलित स्वरूपात उपलब्ध असल्याने रुग्ण स्वतःदेखील ती वाचून जाणून घेऊ शकतो. त्याबाबत रुग्णाने ऍलोपॅथी डॉक्टरला काही विचारले तर त्याचे शंकानिरसन तो डॉक्टर करू शकतो. परंतु, इतर पॅथीच्या औषधांबाबत ऍलोपॅथी डॉक्टर अनभिज्ञ असतो. त्यामुळे इतर पॅथीचे औषध आपण लिहिणे हे न्यायवैद्यकीय (Medico-Legal) दृष्टीनेही अतिशय अयोग्य व धोकादायक आहे हे सरांनी मला समजावून दिले. 

कायद्याच्या नजरेतून, हाताखालच्या शिकाऊ डॉक्टरच्या चुकीची सर्व जबाबदारीही वरिष्ठ डॉक्टरांचीच असते (vicarious liability ) हेही त्यांनी मला अगदी शांतपणे समजावून सांगितले. ती औषधाची चिठ्ठी मी सरांच्या वतीने लिहिलेली असल्याने, मला संपूर्ण घटनेचे गांभीर्य समजले आणि, "यापुढे कधीही माझ्याकडून अशी चूक होणार नाही" अशी ग्वाही मी सरांना दिली. 

पुढील महिन्यात तोच पेशन्ट परत सरांकडे तपासणीला आला. यावेळीही औषधांची चिठ्ठी मीच लिहून दिली. त्या पेशंटच्या आग्रहाला बळी न पडता, तो नेहमी घेत असलेले ते दुसऱ्या पॅथीचे औषध चिठ्ठीत लिहिण्यास मी नकार दिला. तसेच, ते औषध सरांना विचारल्याशिवाय घेत जाऊ नका असेही मी त्या पेशंटला खडसावले. सरांना औषधे दाखवत असताना त्या पेशंटने विचारले, "डॉक्टर, अमुक-अमुक डॉक्टरांनी लिहिलेले तमुक-तमुक औषध मी नेहमी घेतो. तुम्ही दिलेल्या औषधांसोबतच त्या डॉक्टरांनी दिलेले ते औषध मी घेतले तर चालेल का?"  

या प्रश्नावर वर सर काय उत्तर देतात हे ऐकण्याची मला कमालीची उत्सुकता होती. 

सरानी अगदी शांतपणे सांगितले, "त्या औषधाबाबत मी काहीही बोलणार नाही. मी लिहून दिलेली सगळी औषधे  समजावून सांगितल्याप्रमाणे नियमित घ्या. त्याबरोबर इतर कोणी दिलेले कोणत्याही पॅथीचे औषध घ्यायचे किंवा नाही ते तुमचे तुम्हीच ठरवा."  

माझा अगदीच विरस झाला. मला वाटले होते की सर म्हणतील, "ते इतर पॅथीचे औषध अजिबात घेऊ नका. त्या औषधांचे काहीही दुष्परिणाम असू शकतात. मी दिलेल्या औषधांसोबत इतर पॅथीचे औषध घेतलेत तर तुमच्या नकळत त्या दोन्ही औषधांचा मिळून तुमच्या शरीरावर काहीतरी विपरीत परिणाम होऊ शकतो, हे लक्षात घ्या. तसे काही झालेच तर त्याची जबाबदारी माझी नाही." वगैरे ... 

पण, असे काहीच सरांनी त्या रुग्णाला सुनावले नाही. सरांनी मला जे सांगितले आणि त्या रुग्णाला जे सांगितले या दोन्ही गोष्टींमधील तफावत मला चांगलीच खटकली. 

एक प्रश्न लगेच माझ्या मनात आला. "सर, तुम्ही दिलेल्या औषधांसोबत ते दुसऱ्या पॅथीचे औषध पेशंटने घेऊ नये असे तुम्ही त्याला का सांगितले नाहीत?" पण, सरांना तो प्रश्न विचारायची हिंमत मला तेंव्हा झाली नाही. त्यामुळे हे दोन्ही प्रसंग आणि मला पडलेला तो रास्त प्रश्न माझ्या मनांतच घोळत राहिले.  

गोडबोले सर म्हणजे माझे सख्खे काकाच होते. हॉस्पिटलमध्ये जरी आमचे गुरु-शिष्या असे औपचारिक नाते असले तरी घरामध्ये आम्ही काका-पुतणीच होतो. त्यामुळे, एकदा आम्ही दोघेही घरी असताना मी संधी साधली आणि आप्पांना, म्हणजे डॉ. राम गोडबोले सरांना माझ्या मनातली शंका विचारलीच. 

"आप्पा, आपल्याच पॅथीची, पण आपण नीट न अभ्यासलेली औषधेही आपण कधीही लिहायची नाहीत हे तुम्ही मला सांगितले. तसेच, इतर पॅथीची औषधे लिहून देण्याचा कायदेशीर व नैतिक अधिकार आपल्याला नाही, हेही तुम्ही मला निक्षून सांगितले. वेगवेगळ्या औषधांचा परस्परसंबंध (drug  interactions), आणि त्यांचा रुग्णाच्या शरीरावर होणारा एकत्रित परिणाम (side effects due to drug interactions) कदाचित विपरीतही असू शकतो, हेही मला समजले. पण मग, तुम्ही तसे त्या पेशन्टला, समजावून का नाही सांगितलेत? आपल्या औषधासोबत ते दुसऱ्या पॅथीचे  औषध तो घेत राहिला आणि त्या औषधाचे काही घातक परिणाम झाले तर? किंवा तुम्ही दिलेल्या औषधांचा अपेक्षित परिणाम झालाच नाही, तर त्या गोष्टीला आपण जबाबदार राहणार नाही का? "

आप्पांनी  त्यांच्या नेहमीच्या पद्धतीने स्मितहास्य करत उत्तर दिले,

"स्वाती, फारच चांगला प्रश्न विचारलास. आपण लिहिलेल्या औषधांबरोबर, इतर पॅथीची औषधे पेशंटने चालू ठेवली आणि नेमका काही विपरीत परिणाम झालाच, तर त्याची जबाबदारी आपल्यावर नसते. कायद्याच्या दृष्टीने, केवळ आपण लिहून दिलेल्या चिठ्ठीमधील औषधांच्या परिणामांना आपण जबाबदार असतो. त्यामुळेच, पेशंट्सच्या केसपेपर्सवर, किंवा आपण लिहून दिलेल्या औषधाच्या चिठ्ठीवर, अथवा एखाद्या रिपोर्टवर, किंवा आपण दिलेल्या वैद्यकीय मतामध्ये (medical opinion) आपण जे लिहितो त्यात काही चूक होणार नाही, यासाठी आपल्याला दक्ष राहावे लागते. कारण, या सर्व लिखित गोष्टींचे उत्तरदायित्व सर्वस्वी आपल्यावर असते. इतर पॅथीची औषधे घेतल्यामुळे आपल्या पॅथीच्या औषधांचा अपेक्षित परिणाम पेशंटच्या शरीरावर न होणे असेही क्वचित घडू शकते. परंतु, त्याचीही  जबाबदारी आपल्यावर नसते."

आप्पांचा मुद्दा मला मनापासून पटला. परंतु, "दुसऱ्या पॅथीच्या डॉक्टरने लिहिलेले ते औषध बंद करायला तुम्ही त्या पेशंटला का नाही सांगितले? पेशंटच्या दृष्टीने ते हिताचे नव्हते का?" हा माझ्या मनातला प्रश्न अनुत्तरितच राहिल्यामुळे मी तो परत विचारलाच. 

"मला सांग स्वाती, स्वतःच्या हिताचा विचार स्वतः पेशंटनेच करायला नको का? इतर पॅथीच्या डॉक्टरांनी लिहिलेली औषधे बंद करा, असे सांगण्याचा नैतिक अधिकार आपल्याला नाही. त्याचप्रमाणे, आमची पॅथी व त्यातील तंत्रज्ञान इतर पॅथीपेक्षा सरस आहे,  किंवा इतर पॅथी प्रतिगामी आहेत, असेही बोलण्याचा नैतिक अधिकार आपल्याला नाही. जोपर्यंत, सर्व पॅथींचा तौलनिक अभ्यास होऊन, त्यांची योग्यायोग्यता जगन्मान्य होत नाही, तोपर्यंत आपण त्यावर भाष्य करायचे नाही. ते वैद्यकीय नीतिमत्तेच्या नियमांत (Medical Ethics) बसत नाही."  

"पण अप्पा, इतर अनेक पॅथीज् चे  लोक त्यांची औषधे "साईड इफेक्ट्स विरहित" असल्याचा दावा करतात. त्यांच्या काही औषधांमध्ये वापरलेले घटक व त्यांचे दुष्परिणाम कुठेही लिखित स्वरूपात नसतात. त्यातील काही  डॉक्टर्स बरेचदा स्वतःच औषधे बनवून त्याच्या पुड्या किंवा बाटल्या पेशंटला देतात. त्या औषधांमधील नेमके घटक कोणते, या बाबत पेशंट अनभिज्ञ असल्याने प्रकृतीवर होणारे परिणाम वा दुष्परिणाम काय असू शकतात हे पेशंटला समजत नाही. शिवाय, इतर पॅथीचे काही डॉक्टर्स अगदी कॉलरापासून ते कॅन्सरपर्यंत, प्रत्येक आजारावर त्यांच्याकडे रामबाण इलाज आहे असा दावा करतात. कहर म्हणजे, इतर पॅथीचे कितीतरी डॉक्टर्स  सर्रास ऍलोपॅथीची औषधे लिहून देतात. ऍलोपॅथीची अनेक अनावश्यक औषधे, बरेचदा चुकीच्या प्रमाणात दिली जातात, ऍलोपॅथीच्या औषधांच्या गोळ्याच कुटून चूर्ण म्हणून, किंवा पाण्यात विरघळवून त्याचे पातळ औषध करून पेशंट्सना दिली जातात. त्याउपर, "ऍलोपॅथीच्या औषधांचे अनेक दुष्परिणाम असल्यामुळे ऍलोपॅथीची औषधे घेऊ नका" असा अपप्रचारही सर्रास केला जातो. हे तरी कुठल्या नियमात आणि नीतिमत्तेत बसते?" 

"त्याचा विचार तू का करतेस? आपण स्वतः योग्य त्याच गोष्टी कराव्या. जे लोक कायद्याच्या चौकटीत न बसणारे काहीतरी करीत असतील त्यांनाच त्याची चाड व भीती असायला हवी ना? तीच बाब नीतिमत्तेची. त्याचाही सारासार विचार त्यांनीच करावा. आपण नव्हे."  

आपापल्या पॅथीप्रमाणे व्यवसाय करणाऱ्या प्रत्येक वैद्यकीय व्यावसायिकाची नैतिक आणि कायदेशीर जबाबदारी, दिलेल्या सल्ल्याचे उत्तरदायित्व आणि वैद्यकीय नीतिमत्ता पाळण्याची बुद्धी, याबाबत माझ्या गुरूंनी दिलेले ते धडे माझ्या मनावर ठसले. संस्कारक्षम वयात मिळालेला हा ज्ञानाचा डोस, माझ्या आजपर्यंच्या वैद्यकीय व्यावसायिक आयुष्यात मला पुरून उरला आहे. मला माहिती नसलेले औषध मी आजवर कोणालाही लिहून दिलेले नाही. तसेच इतर कुठल्याही पॅथीचे औषध मी कधीही लिहिले नाही. 

माझ्या एखाद्या पेशंटने, "तुमच्या औषधांबरोबर इतर कुठल्या पॅथीचे औषध घेतले तर चालेल का?" असे विचारले तर माझे उत्तर ठरलेले असते. "त्या पॅथीतील औषधांबाबत मी काहीही जाणत नाही. ते घ्यायचे की नाही हे तुमचे तुम्ही ठरवा" 

करोना महामारीच्या ऐन भरात, मृत्यूचे तांडव रोखण्यासाठी जीवाची बाजी लावून डॉक्टर झटत असताना, ऍलोपॅथीवर जाहीरपणे तोंडसुख घेणाऱ्या एका 'महान' व्यक्तीचे वक्तव्य एकून ऍलोपॅथीचा व्यवसाय करणाऱ्या अनेकांचा तिळपापड होणे स्वाभाविक होते. 

गोडबोले सर आज हयात असते, तर या खोडसाळ अपप्रचारावर त्यांची प्रतिक्रिया काय झाली असती? हा विचार माझ्या मनात आल्याशिवाय राहिला नाही. 

जरा विचार केल्यावर वाटले, की गोडबोले सर कदाचित म्हणाले असते... 

"प्रत्येक वैद्यकीय व्यावसायिकाने आपापल्या पॅथीच्या ज्ञानावर आधारित रुग्णसेवा करावी. ज्या पॅथीबद्दल आपल्याला ज्ञान नाही त्यावर भाष्य करायला जाऊ नये. ज्याने-त्याने आपापली व्यावसायिक नीतिमत्ता सांभाळावी. इतर कोणीही व्यक्ती, अगदी कितीही हीन पातळीवर जाऊन आपल्या पॅथीबाबत काहीही बोलली तरी, त्या वक्तव्यावर भाष्य न करता अशा व्यक्तींना अनुल्लेखाने मारावे."

तरीदेखील, पेशंट्सनी अशा प्रसंगी काय करावे हा प्रश्न उरणारच. त्यांनी एका उपचारपद्धतीवर विसंबून राहावे, की आंधळेपणाने दोन-तीन पॅथीचे उपचार एकत्रित करावे? 

यावरही कदाचित गोडबोले सर म्हणाले असते, "रुग्ण सूज्ञ असेल तर, त्याचा विश्वास असलेल्या एका पॅथीचेच औषधोपचार घेईल आणि कुठल्याच बिनबुडाच्या टीकेवर विश्वास ठेवणार नाही. "  

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा