मधुमेहींनी आंबा खावा की नाही? याबाबत बरेच उलटसुलट मतप्रवाह ऐकायला मिळतात. मधुमेहींनी शक्यतो आंबा खाऊच नये, असा सल्ला काही डॉक्टर्स देतात. तो सल्ला अर्थातच कुठल्याही मधुमेही रुग्णाच्या कानाला गोड वाटत नाही. याउलट, 'मधुमेहींनी रोज एक आंबा खावा', हा कदाचित मधुमेहींच्या कानाला गोड लागेल असा सल्ला अनेक 'सुप्रसिद्ध' (?) आहारतज्ज्ञ देतात. यापैकी कोणाचे सांगणे बरोबर आहे? आपण आंबा खावा की नाही? असा संभ्रम मधुमेहींच्या मनांमध्ये निर्माण होतो.
"मधुमेहींनी आंबा खावा की न खावा? खाल्ला तर एका दिवसात किती खावा? खाताना तो कसा - म्हणजे फोडी करून नुसता आंबाच खावा की आमरस काढून पोळीबरोबर अथवा पुरीबरोबर खावा?" हा संभ्रम दूर करण्यासाठी, आपण या प्रश्नांची उत्तरे शास्त्रीय निकष लावून शोधूया. त्याचप्रमाणे, एक आंबा खाणार असू तर तो किती मोठा अथवा किती वजनाचा असावा याबाबतही जाणून घेऊया.
हे सर्व नीट समजण्यासाठी आधी आपल्याला ग्लायसेमिक इंडेक्स (GI) आणि ग्लायसेमिक लोड (GL), या दोन संकल्पनांची माहिती आवश्यक आहे.
एखादा खाद्यपदार्थ खाल्ल्यानंतर, आपल्या रक्तातील साखर किती वेगाने वाढू शकते हे त्या-त्या पदार्थाच्या ग्लायसेमिक इंडेक्सवर ठरते. त्यामुळे, ग्लायसेमिक इंडेक्स हाच निकष समोर ठेवून खाद्यपदार्थांचे खालीलप्रमाणे वर्गीकरण करण्यात आलेले आहे:-
कमी ग्लायसेमिक इंडेक्स (low GI ) = ५५ पेक्षा कमी
मध्यम ग्लायसेमिक इंडेक्स (medium GI ) = ५५-६९
जास्त ग्लायसेमिक इंडेक्स (high GI ) = ७० पेक्षा जास्त
सर्वसाधारणतः, जास्त ग्लायसेमिक इंडेक्स असलेले पदार्थ मधुमेहींनी टाळावेत व शक्यतो low GI चे पदार्थ खावेत, असे आम्ही सांगतो. पिकलेल्या आंब्याचा ग्लायसेमिक इंडेक्स सुमारे ५५ असतो. त्यामुळे फक्त ग्लायसेमिक इंडेक्स या निकषाचाच विचार केला तर मधुमेहींनी आंबा खावा का? याचे उत्तर 'हो' असेच येऊ शकेल. परंतु, एखाद्या पदार्थामुळे रक्तातली साखर किती वाढेल हे फक्त ग्लायसेमिक इंडेक्सवर ठरत नाही. त्याकरता ग्लायसेमिक लोड (GL)चा विचारदेखील करणे जरुरीचे आहे.
ग्लायसेमिक इंडेक्स बरोबरच, त्या-त्या पदार्थामध्ये असलेल्या कर्बोदकांचे प्रमाण अथवा टक्केवारी आणि तो पदार्थ आपण किती प्रमाणात खात आहोत, यावर त्याचे ग्लायसेमिक लोड (GL) ठरते. म्हणजेच, कमी ग्लायसेमिक इंडेक्स असलेला एखादा पदार्थ तुम्ही खूप जास्त प्रमाणात खाल्ला तर त्या एकाच खाण्यातले ग्लायसेमिक लोड खूप जास्त होणार आहे. म्हणजेच तुमच्या शरीरात एकाच वेळेस खूप जास्त साखर जाणार आहे व त्यामुळे रक्तातल्या साखरेची पातळी अचानक वर जाणार आहे. त्याउलट, खूप जास्त ग्लायसेमिक इंडेक्स असलेला एखादा पदार्थ जर अतिशय अल्प प्रमाणातच खाल्ला, तर त्याचे ग्लायसेमिक लोड मात्र कमी असेल, आणि रक्तातली साखरही अचानक वाढणार नाही.
ग्लायसेमिक लोड किती असावे याबाबतचा तक्ता खालीलप्रमाणे आहे:-
कमी ग्लायसेमिक लोड (low GL) = १० पेक्षा कमी
मध्यम ग्लायसेमिक लोड (medium GI) = १०-२०
जास्त ग्लायसेमिक लोड (high GI) = २० पेक्षा जास्त
मधुमेहींनी एका वेळेच्या (नाश्ता/ जेवण/मधल्या वेळेचे खाणे) आहारात शक्यतो १० किंवा १० पेक्षा कमी ग्लायसेमिक लोड खाणे हे सगळ्यात योग्य होय. तसेच, एका वेळेच्या आहारामध्ये २० पेक्षा जास्त ग्लायसेमिक लोड असू नये, हेही निश्चित. परंतु, दिवसभरात, जरी आपण १०-२० च्या दरम्यान ग्लायसेमिक लोड असलेले खाणे ५ वेळा खाल्ले, (सकाळची न्याहारी, सकाळचे मधल्या वेळेचे खाणे, दुपारचे जेवण, संध्याकाळचे मधल्या वेळेचे खाणे आणि रात्रीचे जेवण) तरी दिवसभराचे ग्लायसेमिक लोड १०० च्या आतच राहील व रक्तातील साखर सुनियंत्रित राहू शकेल. असे सातत्याने केल्यास, मधुमेहींच्या रक्तातील साखर कायम नियंत्रित राहू शकते व ग्लायकोसायलेटेड हेमोग्लोबिन (HbA1C) कमी राहते.
सर्वसाधारणपणे मध्यम आकाराच्या एका आंब्याचे वजन सुमारे २०० ग्रॅम्स असते आणि त्यामधील रसाचे किंवा गराचे वजन सुमारे १२० ग्रॅम्स भरते. जर १०० ग्राम रस किंवा गर घेतला तर त्यात १५ ग्रॅम्स कर्बोदके किंवा साखर असते. म्हणजेच, १२० ग्रॅम रसामध्ये जवळपास १८ ग्रॅम साखर असणार आहे.
एका २०० ग्रॅम वजनाच्या आंब्याचे ग्लायसेमिक लोड आपण काढूया. त्यासाठीचे गणिती सूत्र खालीलप्रमाणे आहे:-
ग्लायसेमिक लोड = ग्लायसेमिक इंडेक्स x कार्बोहायड्रेटचे प्रमाण ÷ १००
आंब्याचा ग्लायसेमिक लोड = ५५ x १८ ÷ १०० = ९.९ असे उत्तर येते.
म्हणजेच एका खाण्याच्या वेळेस मधुमेहींना, मध्यम आकाराचा (२०० ग्राम वजनाचा) एखादा आंबा खायला हरकत नाही.
पण हा आंबा इतर जेवणाबरोबर किंवा पोळी/पुरीबरोबर खाता येईल का? मधुमेहींनी जर आमरस पोळी/पुरी खाल्ली तर काय होईल? याबाबतही कोष्टक मांडून आपण समजून घेऊया.
गव्हाचा ग्लायसेमिक इंडेक्स ७२ असतो. गव्हाच्या पिठाच्या मध्यम आकाराच्या पोळीमधे साधारणतः १८ ग्रॅम कार्बोहायड्रेट असतात. त्यामुळे अशा एका पोळीचे ग्लायसेमिक लोड खालील प्रमाणे होते:-
७२ x १८ ÷ १०० = १२.९६... म्हणजे जवळपास १३.
म्हणजेच एका मध्यम आकाराच्या आंब्याचा रस आणि एक मध्यम आकाराची पोळी मिळून, ९.९ + १३ = २२.९ इतके ग्लायसेमिक लोड होईल. म्हणजेच २० पेक्षा जास्त लोड होईल, आणि त्या मधुमेही रुग्णाच्या रक्तातली साखर प्रमाणाबाहेर वाढेल.
त्यामुळे, जर आमरस-पोळी खायची असेल तर एका मध्यम आकाराच्या आंब्याचा रस आणि मध्यम आकाराची अर्धी पोळी खायला हरकत नाही. पण मग त्या जेवणामध्ये भात आणि कर्बोदके देणारे इतर पदार्थ (भात, भजी, पॅटिस,वडे बटाटा किंवा पिष्टमय भाज्या) अजिबात असायला नकोत. कारण, जर ते पदार्थदेखील असले तर त्या पदार्थांतून मिळणारे ग्लायसेमिक लोड आणि आमरस-पोळीचे ग्लायसेमिक लोड मिळून, एकूण लोड खूपच जास्त होईल आणि त्यानंतर दोन तासांनी रक्तातली साखर तपासली, तर ती खूपच जास्त येईल.
आंब्यामध्ये तंतुमय पदार्थ, जीवनसत्वे, आणि इतर बरेच आरोग्यदायी घटक असतात. शिवाय, आंबा हा फक्त आंब्याच्या दिवसातच मिळणार आहे. म्हणून या दिवसात आंबा खायला हरकत नाही, पण तो खाण्यामागचे सगळे शास्त्र समजून घेऊनच, मधुमेहींनी आंब्याचा रसास्वाद घ्यावा इतकेच.
डॉ. स्वाती बापट [एम.बी.बी.एस., एम. डी. (बालरोग)]
खूप छान माहिती, मधुमेहीना हा लेख वाचून नक्कीच हायसं वाटेल 🙏🙏
उत्तर द्याहटवा