रविवार, १२ मे, २०२४

मधुमेहींनो, आंबा खा.. पण जरा जपून!

'मधुमेहींनी आंबा खावा की न खावा?' या विषयावर मी नुकताच एक लेख माझ्या ब्लॉगवर प्रसिद्ध केला आणि  समाजमाध्यमांमध्येही प्रसृत केला होता. त्या लेखावर बऱ्याच उलट सुलट, आणि काही गमतीदार प्रतिक्रिया आल्या. त्या प्रतिक्रिया आणि त्यावरचे माझे विचार वाचकांपर्यत पोहोचवावेत असे मला वाटते. 



मधुमेहींनी दिवसभरात एखादा आंबा खायला हरकत नाही, असे त्या लेखामध्ये मी सांगितले आहे. त्याचबरोबर, शक्यतो तो आमरस-पोळी अशा स्वरूपात न खाता, दोन जेवणांच्या मधल्या वेळेत खावा असे सांगितले. रक्तातली साखर प्रमाणाबाहेर वाढू न देण्यासाठी मधुमेहींनी असे पथ्य पाळणे आवश्यक आहे, असे मी सुचवले होते . 

काही सुज्ञ आणि सजग मधुमेहींनी व इतर वाचकांनी मी लिहिलेली कारणमीमांसा समजून घेतली. 'दिवसभरामधे एखादा आंबा खायला हरकत नाही', हे वाचून काही मधुमेहींनी माझे आभारही मानले. तर, "आंब्याच्या दिवसांमध्ये, दिवसभरात आम्ही काय फक्त एकच आंबा खायचा का? हे असले काही आम्ही काही मानणार नाही", असे काही मधुमेहींनी अगदी स्पष्टपणे सांगितले. एका मित्राला तर माझा लेख वाचून फारच वाईट वाटले. त्याने लिहिलंय,

"मधुमेहींनी दिवसभरामधे एखादा आंबा खायला हरकत नसते, असे आधी कळले असते तर माझ्या दिवंगत वडिलांना आंबा खायला देता आला असता. मधुमेहींनी आंबा खायचाच नाही अशा समजुतीने, मधुमेहाचे निदान झाल्यावर आम्ही त्यांना कधीही आंबा खाऊच दिला नाही"

पुण्यातील सुप्रसिद्ध बालरोगतज्ज्ञ डॉ. राजीव जोशी हे स्वतः मधुमेहग्रस्त आहेत. माझा लेख वाचून त्यांनी मधुमेहींना मार्गदर्शक ठरावी अशी एक प्रतिक्रिया दिली आहे, ती  खालीलप्रमाणे: -

"छान माहितीपूर्ण लेख. डॉ. अभय बंग यांनी, "एक चमचा श्रीखंड खाऊन चव घ्या आणि मग एक चमचा श्रीखंड खाऊन थांबा", असे सांगितले आहे. एका बाजूने अर्धी फोड खाऊन चव घ्या आणि दुसर्‍या बाजूने उरलेली अर्थी फोड घेऊन थांबा...याप्रमाणे, मी एक फोड आंबा खाऊन थांबतो.. ग्लायसेमिक इंडेक्स आणि ग्लायसेमिक लोड यांचा हिशोब करत बसावा लागत नाही आणि दिवसात कितीही वेळा अशा पद्धतीने आंबा खाल्ला तरी रक्तशर्करा वाढत नाही..!!"

डॉक्टर राजीव जोशींचे म्हणणे खरे आहे. सतत ग्लायसेमिक इंडेक्स आणि ग्लायसेमिक लोडचा हिशोब करत जेवणखाण करणे, कोणालाही  शक्य नाही. त्यामुळे मधुमेहींनी आंबा किंवा कोणताही गोड पदार्थ समोर आल्यास, डॉक्टर राजीव जोशींचा सल्ला मानावा, हे योग्य! मधुमेही रुग्णांनी जर योग्य आहार घेतला, नियमित व्यायाम केला, वजन आणि ताणतणावावर नियंत्रण ठेवले तर आजार बळावत जात नाही, असेही  ते स्वानुभवावरून सांगतात.  

"मधुमेहींनी आंबा खाल्लेले चालते, असे असतानाही ऍलोपॅथिक डॉक्टर्स आम्हाला आंबा खायला उगाच का मनाई करतात?" असा रास्त प्रश्न अनेक मधुमेहींना पडला आणि त्यांनी त्याबाबत नाराजीही व्यक्त केली. 

या प्रश्नाचे उत्तर सोलापूरस्थित, प्रसिद्ध फिजिशियन डॉक्टर दिलीप आपटे सरांनी दिलेल्या प्रतिक्रियेमध्ये आहे. आपटे सर गेली तीस वर्षांहून अधिक काळ सोलापुरात वैद्यकीय व्यवसाय करतात. योग्य निदान आणि त्यानुसार कमीतकमी औषधयोजना करणारे डॉक्टर, अशी त्यांची ख्याती आहे. डॉक्टर दिलीप आपटे सरांनी दिलेले उत्तर अतिशय बोलके आणि समर्पक आहे. 

"सोलापुरातील लोकांचा असा युक्तिवाद आहे की आंबा वर्षातून एकदाच येतो म्हणून आपण तो खायलाच हवा. कितीही सांगितले तरी त्यांच्यामधे काहीही फरक पडत नाही. ते वर्षातले दोन महिने दररोज आंबा खातात. त्यातून सोलापुरात आमरसामधे साखर घालायची पद्धतही आहे. माझे अनेक मधुमेही रुग्ण, असा साखरमिश्रित आमरस अगदी मुक्तपणे खातात. भरपूर आमरस खाल्ल्यामुळे त्यांची भूकही वाढते, त्यामुळे त्या आमरसाबरोबर एक-दोन जास्तीच्या पोळ्या खाल्ल्या जातात. अशा रीतीने, त्यांच्या जेवणातल्या एकूण कॅलरीज भरपूर  वाढतात. तसेच उन्हाळ्याच्या काळात सोलापूरमधे तापमान फारच जास्त असल्यामुळे, लोक फारसा व्यायामही करत नाहीत, आणि जास्तीच्या खाण्यामुळे पोटामध्ये गेलेल्या जास्तीच्या कॅलरीज जाळल्याही जात नाहीत. या कारणामुळे, आंब्याच्या दिवसांमधे, माझ्याकडे येणाऱ्या बहुतेक मधुमेही रुग्णांची रक्तातील साखर वाढते. माझा वैयक्तिक अनुभव आहे की जूनमध्ये माझ्या बहुतेक मधुमेही रुग्णांची BSL वाढलेली असते आणि मला पुढील ३ महिन्यांसाठी त्यांची औषधे वाढवावी लागतात. या कारणामुळे मी वैयक्तिकरित्या त्यांना आंबा बंद करण्यास सांगतो किंवा फार-फारतर दिवसभरामध्ये एक-दोन फोडी खा असा सल्ला देतो."

इतर शहरातल्याही वैद्यकीय व्यावसायिकांना थोड्याफार फरकाने असाच अनुभव येत असावा. 

इथे एक मात्र म्हणावेसे वाटते. एखादा आंबा खाल्ल्यानंतर ज्या मधुमेहींना मनावर ताबा ठेवणे शक्य होणार नसेल त्यांनी आंब्यापासून दूरच राहिलेले बरे. प्रत्येक मधुमेही रुग्णाने आपापल्या नेहमीच्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार पथ्य पाळलेले योग्य होईल.  

काही रुग्णांना वाटते, "साखर वाढली तर वाढू दे ना. काय फरक पडतोय? फारतर काय होईल? डॉक्टर अजून एक एक गोळी किंवा फारतर इन्सुलिन वाढवून देतील." पण केलेल्या कुपथ्यामुळे औषध वाढत जाणे, याचा शरीराला दुहेरी त्रास असतो, हे त्यांच्या लक्षांतच येत नाही. 

मधुमेहींची रक्तशर्करा वाढली की, त्यांच्या नकळत त्यांच्या शरीरातील अनेक अवयवांवर घातक परिणाम होत असतो. तसेच गोळ्या किंवा इंजेक्शन वाढले की त्याचेही काही दुष्परिणाम त्यांच्या शरीरावर होत असतात . दुर्दैवाने, अशा दुष्परिणामांची ठोस लक्षणे त्या-त्या वेळी ठळकपणे दिसत नाहीत नाहीत. ती जेंव्हा लक्षात येतात तेंव्हा फार उशीर झालेला असू शकतो. आणि म्हणूनच मधुमेह या रोगाला 'सायलेंट किलर' असे नाव पडलेले आहे

काही मधुमेही रुग्ण तर, ऍलोपॅथीच्या डॉक्टरांनी दिलेला योग्य सल्ला न मानता, आपल्या मनाला येईल तसे वागतात. सांगितलेले पथ्यही पाळत नाहीत, नियमित व्यायाम करत नाहीत. मग त्यांचे औषध वाढवावे लागते. त्याउप्पर, हे रुग्ण असा कांगावाही करतात की, 'ऍलोपॅथीचे डॉक्टर्स उगीचच आमच्या औषधांचा डोस वाढवत नेतात!'  

अशा नाराज झालेल्या रुग्णांना, "डायबेटीस रिव्हर्सल" या नावाखाली केलेल्या आकर्षक जाहिरातबाजीचा मोह न पडला तरच नवल! त्या तथाकथित 'फायदेशीर' व्यवसायाबद्दल पुढे कधीतरी लिहीन!   

                                                                                       डॉ. स्वाती बापट [एम.बी.बी.एस., एम. डी. (बालरोग)] 



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा