अॅलोपॅथी किंवा आधुनिक वैद्यकीय शास्त्र मुख्यत्वेकरून पाश्चात्य देशांमधे विकसित झाल्यामुळे या शास्त्राबद्दल भारतीयांच्या मनामधे अजूनही अढी आहे. खूप लोक असा आरडाओरडा करत असतात की अॅलोपॅथीचे डॉक्टर्स अनावश्यक तपासण्या करायला सांगतात व अनेक दुष्परिणाम असलेली औषधे देतात. अॅलोपॅथीक व्यावसायिकांनी केलेल्या औषधयोजनेबाबत अनेक रुग्णांच्या मनात अविश्वास असतो. शिवाय, हल्ली बरेच लोक 'गूगल डॉक्टर्स' झालेले असतात. त्यामुळे, अमुक औषध का लिहिले आहे? त्याऐवजी तमुक औषध का नाही दिले? इतकाच डोस का दिला? आम्ही हे औषध पाच दिवसांच्या ऐवजी दोनच दिवस दिले तर काय बिघडेल? असल्या प्रश्नांच्या सरबत्तीलाही आम्हा अॅलोपॅथीच्या डॉक्टरांना तोंड द्यावे लागते.
प्राचीन काळच्या ग्रीक भाषेत 'Allos' म्हणजे 'विरुद्ध' आणि 'पॅथॉस' म्हणजे 'त्रास' किंवा 'आजार' असे शब्द रूढ होते. त्यातूनच, 'रोगाविरुद्ध औषधयोजना करणारी पॅथी' म्हणजे अॅलोपॅथी, असा शब्द वापरात आला. भारतीय समाजात असाही एक गैरसमज प्रचलित आहे की, आजाराचे किंवा रोगाचे मूळ न समजून घेता औषधयोजना करणारी पॅथी म्हणजे अॅलोपॅथी. तो गैरसमज पसरवण्यामधे इतर पॅथीच्या व्यावसायिकांसह अनेक सामान्यजन हिरीरीने पुढे असतात. दुर्दैवाने, तो गैरसमज दूर करण्यासाठी अॅलोपॅथीचे बहुतांश डॉक्टर्स काहीच प्रयत्न करत नाहीत. किंबहुना, 'लोकांच्या मनात काही का समज-गैरसमज असेना, आपल्याला काही देणे घेणे नाही' अशी बेफिकीर वृत्ती त्यांच्यामधे दिसून येते. प्रत्यक्षात, अॅलोपॅथीच्या अभ्यासक्रमात काही विशिष्ट असे टप्पे विद्यार्थ्यांना शिकवले जातात. रोग्याला होणाऱ्या त्रासाचे नेमके तपशील जाणून घेणे (History taking), सखोल तपासणी करणे (examination), चाचण्या करणे (Investigations), अंतिम रोगनिदान (final diagnosis) करणे व त्यावर आधारित औषधयोजना करणे (treatment) असे ते टप्पे आहेत. यापैकी, अंतिम रोगनिदान (final diagnosis) या टप्प्याला सगळ्यात जास्त महत्त्व आहे.
अॅलोपॅथीव्यतिरिक्त, आयुर्वेद, युनानी, होमियोपॅथी, नेचरोपॅथी, सिद्ध, योग, सोवा रिग्पा असे इतर वैद्यकीय अभ्यासक्रमदेखील भारतात अस्तित्वात आहेत. या सर्व प्राचीन वैद्यक पद्धतींचे ज्ञान संशोधनाद्वारे अधिक प्रगत करण्याच्या व त्याचा प्रसार करण्याच्या उद्देशाने, केंद्र सरकारचा एक स्वतंत्र विभाग १९९५पासून कार्यरत होता. २०१४ साली त्याच विभागाचे रूपांतर आयुष मंत्रालयात करण्यात आले. परंतु, प्रत्यक्षांत मात्र 'आयुष' पद्धतींमध्ये मोडणारे बहुतांश वैद्यकीय व्यावसायिक अॅलोपॅथीचीच औषधे सरसकटपणे वापरताना आढळतात.
अॅलोपॅथीमधील औषधयोजनेचे वेगवेगळे प्रकार आहेत. त्यापैकी एक म्हणजे symptomatic medicines, किंवा लक्षणांवर इलाज करणारी औषधे. उदाहरणार्थ, रुग्णाला कोणत्याही कारणाने ताप आल्यास, Antipyretic गटाच्या औषधांपैकी पॅरासिटॅमॉल हे औषध वापरले जाते. तसेच, वेगवेगळ्या रोगप्रतिबंधक लसीदेखील अॅलोपॅथीमधे वापरल्या जातात. त्याशिवाय, प्रतिजैविके, जीवनसत्वे, संप्रेरके, झटका येण्यावरची औषधे, नैराश्यावरची औषधे, रक्तदाब कमी करणारी औषधे, कर्करोगावरील औषधे, क्षयरोगासाठी औषधे, असे औषधांचे असंख्य प्रकार अॅलोपॅथीमध्ये आहेत. औषधांचा सुयोग्य वापर कसा करावा, हे अॅलोपॅथीच्या अभ्यासक्रमामधे फार चांगल्या पद्धतीने शिकवले जाते. प्रत्येक औषधाचा डोस किती द्यायचा, दिवसातून किती वेळा ते औषध द्यायचे, किती दिवस द्यायचे, तोंडावाटे द्यायचे का इंजेक्शनद्वारे द्यायचे, त्या औषधांचे नेमके परिणाम व दुष्परिणाम काय होऊ शकतात, हे सर्व आम्हाला आमच्या अभ्यासक्रमाच्या दुसऱ्या वर्षात शिकवले जाते. अनेक औषधांचे पर्याय उपलब्ध असले तरीही अनावश्यक औषधे वापरू नयेत व आवश्यक औषधेदेखील जरुरीपुरती व माफक प्रमाणातच वापरावीत, हेच आमच्या शिक्षणाचे सार असते. MBBS व इंटर्नशिप संपेपर्यंत पुढील दोन-तीन वर्षे ही शिकवण आमच्याकडून घोटवून घेतली गेल्यामुळे ती पक्की व्हायला मदत होते. माझे गुरु, व सोलापूरच्या वाडिया हॉस्पिटलमधील सुप्रसिद्ध फिजिशियन, कै. डॉ. राम गोडबोले सर, आम्हा विद्यार्थ्यांना नेहमी सांगत, "औषधे लिहिणे कोणत्याही डॉक्टरला सहजी शक्य असते. परंतु, कमीतकमी औषधे वापरून रोग बरा करणे यातच तुमचे खरे कौशल्य आहे." माझ्या गुरूंची शिकवण माझ्या मनावर इतकी बिंबली आहे की, माझ्या बालरुग्णांच्या पालकांसोबतचा माझा पुष्कळसा वेळ, 'औषधे का घ्यायची नाहीत', याबाबतचे समुपदेशन करण्यात जातो.
दुर्दैवाने, आज वैद्यकीय व्यवसायाचे बाजारीकरण झाले आहे, आणि ते होण्यामध्ये औषधकंपन्या, सरकार, वैद्यकीय व्यावसायिक आणि सामान्य जनता या सर्वांचा समान वाटा आहे. औषधकंपन्या भरमसाठ नफेखोरी करतात, डॉक्टर्सना अनेक प्रलोभने देऊन महागडी औषधे लिहायला उद्द्युक्त करतात, व काही औषधांच्या उपयुक्ततेबाबत खोटे संशोधन अहवालदेखील खुशाल प्रसिद्ध करतात. भारत सरकारने शैक्षणिक धोरणात केलेल्या बदलांमुळे वैद्यकीय शिक्षणाचे खाजगीकरण झाले आणि त्यामध्येही नफेखोरी बळावली. लाखो-करोडो रुपये भरून शिक्षण घेतलेले अनेक डॉक्टर्स, त्यांच्या शिक्षणासाठी मोजलेले पैसे वाट्टेल त्या मार्गाने रुग्णांकडून वसूल करायला मागे-पुढे बघत नाहीत. बाजारातल्या जीवघेण्या व्यावसायिक स्पर्धेमुळे जवळपास सर्वच डॉक्टर गैरमार्ग अवलंबू लागतात. अनेक डॉक्टर्स सर्रास 'कट-प्रॅक्टिस' करतात. अशा डॉक्टरांना, औषधविक्रेते, पॅथॉलॉजी लॅब, एक्स रे, सी.टी. स्कॅन, एम.आर.आय., इको, वगैरे तपासण्या करणारी डायग्नोस्टिक सेंटर्स, रुग्ण पाठवल्याबद्दल 'रेफरल फी' देणारी हॉस्पिटल्स, या सर्वांकडून राजरोसपणे ३० ते ४० टक्के 'कट' मिळतो. जनरल प्रॅक्टिशनरपासून ते सुपरस्पेशालिस्टपर्यंत सगळे या 'कट प्रॅक्टिस'च्या साखळीत ओवले जातात. सरकारी वैद्यकीय सेवांवर विश्वास नसल्याने, अनेक सामान्य नागरिक खाजगी डॉक्टर्सकडे जाणे पसंत करतात. त्यापैकी एखाद्या डॉक्टरने जर जेनेरिक औषधे लिहून दिली तर त्या औषधांवर बरेच रुग्ण विश्वास ठेवत नाहीत. कित्येकदा स्वतः रुग्णच डॉक्टरांकडून महागड्या औषधांची मागणी करतात. इतकेच नव्हे तर, जे डॉक्टर्स महागडी औषधे किंवा तपासण्या लिहून देत नाहीत अशा डॉक्टरांच्या दर्जाबाबतच अनेक रुग्ण शंका घेतात. बनावट औषधे, आरोग्यविमा अशा इतरही अनेक गोष्टी वैद्यकीय क्षेत्राच्या बाजारीकरणामधे समाविष्ट आहेत. सर्वच 'पॅथी'चे व्यवसायिक या बाजारीकरणात सामील असले तरी अॅलोपॅथीच्या व्यावसायिकांचेच नाव अधिक प्रमाणात बद्दू केले जाते हेही खरेच.
पाच-सहा वर्षांपूर्वी एका आयुर्वेद डॉक्टरबाईंनी, एका व्यवसायामधे भागीदार होण्याची ऑफर मला दिली होती. त्या बाईंच्या ओळखीतल्या काही आयुर्वेदतज्ज्ञांची एक 'औषधकंपनी' होती. अॅलोपॅथीची जेनेरिक औषधे स्वस्तात विकत घेऊन, त्यावर स्वतःचे लेबल लावून ती कंपनी भरमसाठ दराने बाजारात विकत होती! त्या कंपनीचीच औषधे लिहिण्यासाठी विविध आयुर्वेदतज्ज्ञांना उद्दयुक्त करणे, इतकेच त्या बाईंचे काम होते. त्यांनी गटवलेल्या आयुर्वेदतज्ज्ञांमुळे त्या कंपनीला मिळणाऱ्या नफ्याच्या प्रमाणात या बाईंना दरमहा लाखों रुपयांचे कमिशन मिळत होते. या साखळीतील आयुर्वेदतज्ज्ञांनाही, त्यांनी औषधकंपनीला मिळवून दिलेल्या नफ्याच्या प्रमाणात, सोन्याच्या नाण्यापासून अमेरिकावारीपर्यंत वेगवेगळी बक्षिसे दिली जात होती. त्या बोगस कंपनीला त्यांचा व्यवसाय अॅलोपॅथी व्यावसायिकांपर्यंत पोहोचवायचा असल्याने, 'मार्केटिंग'चे काम करण्यासाठी मी त्या कंपनीची भागीदार व्हावे अशी त्या बाईंची मला ऑफर होती. त्या आयुर्वेदाचार्य बाईंनी दिलेली ती 'लाखमोलाची' संधी मी अर्थातच धुडकावून लावली.
गावोगावी अनेक बनावट वैद्यकीय व्यावसायिक (Quacks) आपापली 'दुकाने' थाटून बसलेले असतात. मनाला वाटेल ती अॅलोपॅथीची औषधे हे लोक लिहीत असतात. काही 'आयुष' डॉक्टर्सबद्दलही अशा धक्कादायक गोष्टी ऐकिवात आहेत. उदाहरणार्थ, अॅलोपॅथीची औषधे लिहिण्याची परवानगी आयुर्वेद डॉक्टर्सना आहे, पण युनानी आणि नेचरोपॅथी डॉक्टर्सना नाही. मग त्यापैकी काहीजण अॅलोपॅथीच्या गोळ्या कुटून आपल्या रुग्णांना पुडीत बांधून देतात. स्वतःला वैद्यकीय व्यावसायिक म्हणणाऱ्या एखाद्या व्यक्तीची नेमकी डिग्री काय आहे, किंबहुना त्याच्याजवळ काही डिग्री आहे की नाही, हेही न बघता, त्याने लिहून दिलेली अॅलोपॅथीची औषधे अनेकजण बिनदिक्कतपणे घेतात. गंमत म्हणजे, त्यातलेच काहीजण अॅलोपॅथीच्या औषधांना नावे ठेवण्यात मात्र पुढे असतात. कोणतेही वैद्यकीय शिक्षण न घेतलेले अनेक लोकदेखील अगदी अधिकारवाणीने अॅलोपॅथीच्या औषधांची माहिती सांगताना किंवा इतरांना औषधे सुचवताना आढळतात. अनेक घरांमधून विविध अॅलोपॅथिक औषधे ठेवलेली असतात, व त्यातली मनाला येईल ती औषधे घेतली जातात (SelfMedication). "पोट दुखण्यावरची गोळी द्या, जुलाबावरचे औषध द्या, झोपेची गोळी हवी आहे," अशा मागण्या केमिस्टच्या दुकानात सर्रास केल्या जातात. फार्मसीच्या अभ्यासक्रमाशी काहीही संबंध नसलेले दुकानातले नोकरदेखील 'मागणी तशी पुरवठा' या तत्वावर, त्यांना योग्य वाटतील ती अॅलोपॅथीची औषधे गिर्हाईकांना देतही असतात.
'रुग्णांना अॅलोपॅथीची औषधे देण्यासाठी होमिओपॅथीच्या डॉक्टरांना परवानगी' या मथळ्याची बातमी कालच्या वर्तमानपत्रामध्ये वाचल्यानंतर मला एक घटना आठवली. पूर्वी एका व्हाट्सएप ग्रुपवर, कुठल्याश्या संदर्भात मी असे लिहिले होते की, "कोणत्याही पॅथीच्या औषधांचे थोडेफार दुष्परिणाम असतातच". ते वाचून होमिओपॅथीच्या एक डॉक्टरबाई माझ्यावर तुटून पडल्या होत्या. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे, अॅलोपॅथीच्या औषधांचे खूप 'साईड इफेक्टस' असतात, पण होमिओपॅथीची औषधे मात्र निर्धोक असतात. त्यांचे म्हणणे खरे असेल, किंवा नसेलही. पण मग, होमिओपॅथीचे व्यावसायिक अॅलोपॅथीची औषधे का लिहितात? होमिओपॅथीच्या डॉक्टर्सना अॅलोपॅथीची औषधे लिहण्याची कायदेशीर मुभा मिळावी यासाठी त्यांची प्रचंड धडपड का चालू आहे? हे प्रश्न माझ्या मनात आलेच. माझ्या प्रश्नांची उत्तरे देण्याचे त्या बाईंनी शिताफीने टाळले आणि इतकेच म्हणाल्या, की 'सर्टिफिकेट कोर्स इन मॉडर्न फार्माकॉलॉजी' (CCMP ) हा महाराष्ट्र शासनमान्य अभ्रासक्रम पूर्ण केलेल्या होमिओपॅथी व्यावसायिकांना अॅलोपॅथीची औषधे लिहिण्याची कायदेशीर परवानगी आहे. म्हणजे, "अॅलोपॅथीच्या औषधांचे दुष्परिणाम होतात" असे एकीकडे म्हणायचे, अॅलोपॅथीची नाचक्की करायची, आणि दुसरीकडे अॅलोपॅथीची औषधे लिहायची कायदेशीर परवानगी मिळवण्यासाठी धडपडायचे, हा दुटप्पीपणा मला खटकला. रोग्यांमध्ये जी लक्षणे दिसत असतील, तीच लक्षणे निर्माण करणारी औषधयोजना करणे, म्हणजेच, “Like cures like” हे होमिओपॅथीचे पायाभूत तत्व आहे. असे असताना, होमिओपॅथीच्या डॉक्टर्सना त्यांच्या शिक्षणाच्या संपूर्णपणे विरुद्ध असलेली औषधयोजना करण्याची कायदेशीर परवानगी देणे, हा एक विनोदच म्हणावा लागेल. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठामार्फत हा कोर्स गेली काही वर्षे शिकवला जात आहे. परंतु, तो कोर्स पूर्ण न केलेले होमिओपॅथीचे अनेक डॉक्टर्सदेखील राजरोसपणे अॅलोपॅथीची औषधे लिहीत आहेत, तो भाग निराळा.
रुग्णांचे यथायोग्य उपचार आणि सामान्यजनांचे परिपूर्ण स्वास्थ्य हेच देशाच्या आरोग्यसेवेचे ध्येय असावे यात दुमत नाही. अमुक 'पॅथी' चांगली किंवा तमुक 'पॅथी' वाईट, या वादात शक्यतो कोणीच पडू नये. परंतु, एक अॅलोपॅथी व्यावसायिक या नात्याने मला प्रकर्षाने असे जाणवते की, सामान्य नागरिकांपासून ते सरकारपर्यंत सर्वच स्तरांवर, आरोग्यविषयक अॅपॅथी (Apathy) किंवा जे औदासीन्य आज दिसते आहे ते अतिशय चिंताजनक आहे.
रुग्णाला गुण यावा औषध कोणते का असेना.माझा चालू अनुभव सांगतो,Orthopedic surgeon, Physiotherapy इ. करुन मी सद्या नजीकच्या खेड्यात जाऊन एका नसा मोकळ्या करणाऱ्या वैद्या कडे रोज अर्धा तास उपचार करुन घेतो आहे गुण आला आहे. सर्व pain killer गोळ्या, मलम बंद केल्या. Effect हा साइड इफेक्ट शिवाय असूच शकत नाही हे एक पेशंट म्हणून सांगतो. जमिनीवर घोंगडीवर डोक्याखाली उशी, लोड इ न घेता झोपणे हे सध्या बंधन आहे.(सवय नसल्याने झोप येतं नाही हा साइड इफेक्ट). मात्र बातमीत आल्याप्रमाणे अशी औषधे देण्यास परवानगी देणे योग्य आहे का हे तुम्ही तज्ज्ञ मंडळीच सांगू शकाल. बाकी कट प्रॅक्टीस आवश्यक आणि अनावश्यक,तपासण्या, या विषयी पेशंट काय बोलू शकतो. नितिन चौधरी
उत्तर द्याहटवापेशंटने फक्त suffer करायचे
उत्तर द्याहटवाMany Allopathy Doctors have been practising Homeopathy for ages, so end justifies the means as long as patients are cured by correctly administering minimum drug it should not matter which pathy one is following. Ultimately it is patient who is the kingmaker and he is owner of his health.
उत्तर द्याहटवा👌
उत्तर द्याहटवाMadam, there are very few doctors like you…one of my friends 8 years son was given augmentin 625 two times for five days…
उत्तर द्याहटवाHmm
हटवा