सोमवार, २४ डिसेंबर, २०१८

जीवघेणे प्रसंग!

एक डॉक्टर असल्याने, अत्यंत जीवघेण्या प्रसंगांतून बालरुग्णांना वाचवण्याची सवय मला आहेच. ज्यांच्या बाळांची मी डॉक्टर आहे त्या पालकांचेे आणि माझेे एक विश्वासाचे नाते निर्माण झालेले असते. तिथे डॉक्टर म्हणून माझी भूमिका सुस्पष्ट आणि निःसंदिग्ध असते. पण एखादा कौटुंबिक कार्यक्रम चालू असतांना किंवा प्रवास करीत असताना मी डॉक्टरच्या भूमिकेत नसते. अशा वेळी अचानक एखादी व्यक्ती अत्यवस्थ झाल्यास माझ्या आणि इतरांच्याही मनाची तयारी नसताना, मला अचानकच डॉक्टरच्या भूमिकेत शिरावेे लागतेे व ती भूमिका यशस्वी पणे निभावून न्यावी लागते. अशावेळी घडलेले काही प्रसंग... 

खूप वर्षांपूर्वी एका कौटुंबिक प्रसंगात एक वयोवृद्ध नातेवाईक भाषण करत होतेे. बोलता-बोलता भावनावेग अनावर होऊन त्यांच्या छातीत दुखायला लागले आणि घामेघूम होऊन ते अचानकच खाली कोसळले. त्यावेळी माझ्या लहानग्या मुलांना घेऊन मी हॉलच्या कुठल्यातरी कोपऱ्यात उभी होते. कोणीतरी पडलंय हे कळल्यावर मी धावत पुढे गेले. त्या वेळेपर्यंत उपस्थित मंडळी जसे सुचतील तसे काही-बाही उपाय करत होते. मी पटकन पेशंटच्या जवळ जाऊन नाडी तपासली, श्वसनाच्या वेगाचा अंदाज घेतला, आणि एकूण परिस्थिती बघता त्यांना त्वरित आयसीयू मध्ये हलवणे अत्यावश्यक आहे, हे माझ्या लक्षात आले. एक प्रशिक्षित वैद्यकीय व्यावसायिक या नात्याने सूत्रे हातात घेत पेशंटला आयसीयूमध्ये नेेण्याच्या दृष्टीने मी भराभरा हालचाली सुरु केल्या. तितक्यात कोणीतरी मला अशी विनंती केली की, मी निदान आणखी पाच-दहा मिनिटे तरी पेशन्टला तिथेच ठेवावे. झाले असे होते की मी तिथे पोहोचायच्या आधी कोणीतरी त्या रुग्णाला 'रेकी' द्यायला सुरुवात केली होती आणि ती पाच दहा मिनिटात संपणार होती. त्याक्षणी अनेक व्यक्तींचा रोष पत्करून मी ती विंनती अक्षरशः धुडकावत पुढच्या काही मिनिटांत पेशन्टला आयसीयू मध्ये दाखल केले आणि त्यांचा जीव वाचला.  

अलीकडे काही महिन्यांपूर्वी मी रेल्वेच्या एसी चेयर कार मधून प्रवास करत होते. अगदी पेंगाळलेली असताना  अचानकच दोन टीटीई माझ्या नावाचा पुकारा करत माझ्याजवळ आले. मला क्षणभर आश्चर्य आणि जरा भीतीही वाटली. कुठल्यातरी मागच्या डब्यात एक प्रवासी अत्यवस्थ झाला होता. आरक्षण सूची वाचून मी डॉक्टर आहे  हे कळल्यामुळे माझा शोध घेत ते दोघे माझ्यापर्यंत पोहोचले होते. परिस्थितीचे गांभीर्य लक्षांत आल्याबरोबर, धावत्या गाडीमधून, या डब्यातून त्या डब्यात अक्षरशः सुसाट पळत मी त्या अत्यव्यस्थ रुग्णाजवळ पोहोचले. माझ्या अपेक्षेप्रमाणेच रुग्णाभोवती बघ्यांचे कोंडाळे होते. सगळ्यांना खडसावत बाजूला सारून मोठ्या धीराने मी त्या प्रवाश्याला CPR ( हृदय आणि फुफुसांना शास्त्रीय पद्धतीने चलन देणे ) देणे सुरु केले आणि त्या रुग्णाचा जीव वाचला. एखाद्या रुग्णाला सुसज्ज आयसीयू मध्ये CPR देणे आणि भर गर्दीत एकाग्रचित्त होऊन CPR देणे, यात खूप फरक असतो. त्या दहा मिनिटांच्या काळात, तिथल्या काही सहप्रवाशानी सामंजस्य दाखवत मी सांगेन ते ऐकले आणि मी मागेन ती सर्व मदत केली. पण भोवती उभ्या असलेल्या काही बघ्यांनी अनेक अनावश्यक कॉमेंट्स केल्या. एक दोघांनी तर, "आता ही बाई काय दिवे लावणार?" अशाप्रकारची कुचेष्टा करायलाही कमी केले नाही. त्या दणकट शरीरयष्टीच्या पेशंटला CPR देऊन माझे हात चांगलेच भरून आले होते. पण त्याचे मला काहीच वाटले नाही. त्या खवचट कॉमेंट्स मात्र माझ्या जिव्हारी लागल्या.  

तिसरा प्रसंग मागच्या आठवड्यातला. एका कौटुंबिक कार्यक्रमात माझ्या आईला, अगदी माझ्या डोळ्यादेखतच भोवळ आली आणि ती ग्लानीत गेली. गेले वर्षभर माझ्या आईला hyponatremia किंवा रक्तातले सोडियमचे प्रमाण कमी होण्याचा त्रास सुरु आहे. तसे झाले की तिला भोवळ येते आणि  ग्लानीत जाऊन तिचे बोलणे असंबद्ध होते. अशावेेळी नेमकेे काय उपाय केल्याने ती सुधारते हे मला आता चांगलेच माहीत झालेले आहे. तरीही माझ्या आईला तशा अवस्थेत बघून मी चांगलीच धास्तावले होतेे. त्या दिवशीही आवश्यक त्या सर्व उपाययोजना मी त्वरित सुरु केल्या होत्या. पुढचा काही काळ मी आईला उपचार देत असतांना, आसपास उभ्या असलेल्या काही नातेवाईकांनी काढलेल्या भलत्या-सलत्या शंका व केलेल्या अनावश्यक सूचनांमुळे मी कमालीची  वैतागले होते. एक-दोन नातेवाईकांना तर, "बाजूला व्हा" असे अक्षरशः ओरडून सांगावे लागले. त्या क्षणी तसे करणे जरी योग्य असले तरीही आपल्या जवळच्या माणसांना दुखावताना, माझा मानसिक ताण खूपच वाढला. मिठाचे पाणी आईच्या पोटात गेल्या-गेल्या आईला तरतरी आली आणि ती हसून बोलायलाही लागली. 

माझ्यासारखे अनेक डॉक्टर्स अशा प्रसंगातून जात असतील. उपाययोजनेत काही सेकंदाचा उशीर झाला किंवा थोडीशी जरी चूक झाली तरी एखाद्या अत्यवस्थ रुग्णाचा जीव जाऊ शकतो. अर्थात, तसे होऊ नये यासाठी आम्हाला योग्य ते आणि पुरेसे प्रशिक्षण मिळालेले असते. अशा इमर्जन्सीमध्ये रुग्णाचा जीव वाचावा म्हणून आम्ही डॉक्टर्स कमालीची शर्थ करत असतो. आपल्या उपचारामुळे एखाद्या रुग्णाला जीवनदान मिळाले तर एखाद्या डॉक्टरच्या दृष्टीने ते अत्त्युच्च समाधान असते. पण ते उपचार करत असताना आमच्यावर कमालीचा मानसिक ताणही असतो. तो ताण सहन करण्याची ताकद आमच्यात असते. मात्र, आजूबाजूच्या व्यक्तींच्या दिशाहीन आणि अशास्त्रीय कृती, अनावश्यक सूचना आणि क्वचित येणाऱ्या खवचट कॉमेंट्स या सर्व गोष्टींमुळे आमच्या मनावर येणारा वाढीव ताण असह्य होतो. या वाढीव ताणामुळेच, आम्हा डॉक्टरांसाठी असे प्रसंग जणू जीवघेणे ठरतात याची जाणीव इतरांना कधी होईल का?

एखादी प्रशिक्षित डॉक्टर व्यक्ती जर इमर्जन्सीच्या वेळी नेमकी उपस्थित असेल तर उपचाराची संपूर्ण सूत्रे त्या डॉक्टरच्या हातात देणे हेच योग्य आहे. अशावेळी इतरांनी जर काहीही न बोलता समंजसपणे फक्त मदतनिसाची भूमिका पार पाडली, तर पेशंटला वाचवण्याचे आमचे प्रयत्न यशस्वी व्हायला मदत होईलच पण आमच्यावर बेतणारे हे जीवघेणे प्रसंगदेखील टळतील. नाही का?