शुक्रवार, ९ एप्रिल, २०२१

अंजन!

सात वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. त्यावेळी माझ्या दोन्ही हाताना Carpal Tunnel Syndrome या दुखण्याने ग्रासले होते. हाताच्या नसांवर मनगटाच्या भागात दाब पडत असल्याने माझ्या दोन्ही हातांची बोटे कमालीची दुखायची, आणि बोटाना झिणझिण्या यायच्या. पुण्याच्या कमांड हॉस्पिटलमधील डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मनगटाच्या नसेवरचा दाब कमी करण्यासाठी एक छोटीशी शस्त्रक्रिया करण्याचे ठरले. शस्त्रक्रियेसाठी मला कमांड हॉस्पिटलच्या फॅमिली वॉर्डात (स्त्रिया व मुलांसाठीच्या) भरती करण्यात आले. तिथे एका मोठ्या लांबलचक बॅरॅकमध्ये अनेक स्पेशल रूम्स होत्या. प्रत्येक खोलीमध्ये दोन रुग्ण ठेवण्याची सोय होती. माझ्या खोलीत शेजारच्या खाटेवर कोणीही रुग्ण स्त्री नव्हती.

मला जनरल अनेस्थेशिया देऊन शस्त्रक्रिया केली गेली. शुद्ध आली तेंव्हा मी माझ्या खोलीत परत आलेले होते. शस्त्रक्रिया झालेल्या माझ्या डाव्या मनगटावर एक मोठा जड स्प्लिंट बांधलेला होता. हाताला कमालीचा ठणका जाणवत होता. जनरल अनेस्थेशिया देताना माझ्या घशातुन श्वासनलिकेत घातलेली नळी जरी काढली असली तरी माझा घसा खूप दुखत होता. हातपाय जड होऊन सगळे शरीर निष्प्राण वाटत होते. उजव्या हाताला सलाईन लावलेले असल्याने तो हात हालवता येत नव्हता व दुखतही होता. एकुणात काय, शस्त्रक्रिया जरी लहानशीच असली तरीही मला खूपच त्रास जाणवत होता.  

संध्याकाळचे जेवण सातपर्यंत उरकले. तोपर्यंत माझ्या उजव्या हाताला लावलेली सलाईनची नळीही काढली गेली होती. इतक्यातच, फॅमिली वॉर्डात एक नवीन ऍडमिशन आल्याचे कळले. ऍडमिट झालेल्या त्या बाईंना नेमके माझ्याच खोलीत शेजारच्या पलंगावर ठेवण्यात आले. माझ्या दिमतीला आनंद दिवसभर थांबला होता. आर्मी हॉस्पिटलच्या नियमाप्रमाणे रात्रीच्या वेळी त्याला तिथे थांबण्यास मनाई होती. पण खोलीत मी एकटीच रुग्ण असल्यामुळे, विशेष परवानगी घेऊन, रात्री उशिरापर्यंत तो माझ्यासोबत थांबणार होता. त्यामुळे मला जरा आधार वाटत होता. पण, खोलीत दुसरी स्त्री रुग्ण आल्यामुळे त्याला लगेचच घरी परतावे लागले. नेमकी माझ्याच खोलीत ही बाई का उपटली असे वाटून माझी मनोमन खूप चिडचिड झाली.

नवीन आलेल्या बाईचे व तिच्या सैन्याधिकारी नवऱ्याचे, तेथील नर्सिंग ऑफिसर आणि डॉक्टर्सबरोबर चाललेले बोलणे माझ्या कानावर पडल्याने तिच्याबाबत काही माहिती मला आपसूकच कळली. काही दिवसांपूर्वी अचानक त्या बाईंच्या दोन्ही डोळ्यांची दृष्टी गेली होती. पुढील  उपचारासाठी त्यांना गोव्याहून पुण्याला आणले होते. बाईंना मदत करायला  त्यांच्याबरोबर एका आयाही आली होती. पण आर्मी हॉस्पिटलच्या कडक सुरक्षा नियमानुसार, तिलाही या रुग्ण बाईंबरोबर राहता येणार नव्हते. पोलीस व्हेरिफिकेशन झालेल्या व इतर सुरक्षा तपासणी पार पडलेल्या काही ठराविक आयांचे दूरध्वनी क्रमांक नर्सिंग ऑफिसरने त्या अधिकाऱ्याला दिले. "यांच्यापैकी कोणालाही रात्रीच्या वेळी रुग्णसेवेसाठी बोलवून घ्या" असे सांगून नर्सिंग ऑफिसर निघून गेली. 

त्या अधिकाऱ्याने एकेक करून सगळ्या आयांशी संपर्क साधला. पण त्यापैकी एकही आया त्या रात्री येऊ शकत नव्हती. अचानक आलेले अंधत्व, प्रवासाचा शीण, नवीन जागा आणि कोणी मदतनीसही नाही, अशा अवस्थेत बायकोला सोडून जाणे त्या अधिकाऱ्याच्या जीवावर आले होते. नऊ-साडेनऊ होत आले होते. "रुग्णांना काही मदत लागली तर आम्ही ती करतोच" असे सांगून, रात्रपाळीच्या नर्सिंग ऑफिसरने त्या अधिकाऱ्याला  रात्री हॉस्पिटलमध्ये थांबता येणार नाही याची कल्पना दिली. त्यामुळे त्याला आता निघणे भागच होते. सगळी परिस्थिती बघून माझे मन हेलावले. आतून कितीही इच्छा झाली तरी, मला स्वतःलाच  इतका त्रास असताना मी या बाईंना कितपत मदत करू शकेन याबाबत मी साशंकच होते. तरीदेखील, "तुमच्या पत्नीला रात्रीतून काही मदत लागली तर मी करेन" असे आश्वासन मी त्या अधिकाऱ्याला दिले. तो निश्चिन्त होऊन निघून गेला. 

मध्यरात्री मला त्या बाईंची हाक ऐकू आली. त्यांना लघवी करायला जायचे होते. नर्सिंग ऑफिसरला बोलावण्यासाठी एक दोन वेळा बेल वाजवूनही कोणी न आल्याने, नाईलाजास्तव त्या बाईंनी मला हाक मारली होती. मी उठून त्यांना घेऊन गेले. सकाळी त्यांना ब्रश करायला व इतर आन्हिके उरकायलाही मदत केली. चहा दिला. मला वैद्यकीय ज्ञान असल्यामुळे त्या बाईंची दृष्टी  पुन्हा पूर्ववत होणार नाही याची मला कल्पना आलेली होती. त्यांच्या आजारासमोर माझे दुखणे मला अगदीच हलके वाटू लागले. पुढचे दोन दिवस मी त्यांना जमेल तशाप्रकारे मदत केली. 


या घटनेने माझ्या डोळ्यांत जणू अंजनच घातले. आपले दुखणे, आपल्या अडचणी, यांचा आपण फारच बाऊ करत असतो. प्रत्यक्षांत, आपल्यापेक्षाही जास्त कठीण प्रसंगातून अनेकजण जात असतात. त्यांच्याकडे डोळे उघडून पाहिले तरी आपला त्रास कमी होऊ शकतो. स्वतःला वाटते त्यापेक्षा खूप जास्त ताकद आपल्या शरीरात असते. पण मनाने जर खचून गेलो तर आपण शरीरानेही दुबळे बनतो. अशा प्रसंगी मनाने उभारी घेऊन, आपण इतरांना सहजी मदत करू शकतो.  

हीच शिकवण करोना महामारीच्या काळात मला पुन्हा मिळाली. अगदी स्वतः आजारी असतानाही, माझ्यापेक्षा जास्त आजारी असलेल्या काही आप्तांना मी थोडीफार मदत करू शकले. आजही आपल्या आसपास, घरोघरी करोनाचे रुग्ण आहेत. त्यांना जर आपण यथाशक्ति मदत केली तर आपल्या सकारात्मक ऊर्जेची लाट करोनाच्या लाटेवर निःसंशय मात करू शकेल असा मला विश्वास वाटतो.