सोमवार, १३ मे, २०२४

आरोग्यम धनसंपदा- भाग-१

'विज्ञानधारा' या मासिकाच्या मे महिन्याच्या अंकामध्ये प्रसिद्ध झालेला लेख. 

उत्तम आरोग्य ही आपल्या धनाइतकीच महत्वाची संपदा आहे, हे सर्वश्रुत आहे. कुठलेही कष्ट न करता, बसल्या ठिकाणी कोणालाही पैसे मिळत नाहीत. तसेच आरोग्य-संपदाही बसल्या जागी मिळत नाही. ती  मिळवण्यासाठी माणसाला धडपड करावीच लागते. 

समाजातल्या काही व्यक्ती गर्भश्रीमंत असतात. त्यामुळे त्यांना वडिलोपार्जित धनदौलत जन्मापासूनच उपलब्ध असते. असे असूनही, वारसाहक्काने आलेली संपत्ती टिकवण्यासाठी त्यांना काहीतरी काम-धंदा करावाच लागतो. तसे न केल्यास त्या संपत्तीचाही हळूहळू ऱ्हास होत जातो, हे आपल्याला माहीत आहे. तीच गोष्ट आरोग्य-संपदेच्या बाबतीतही लागू आहे. 

काही व्यक्ती जन्मतःच निरोगी, सदृढ जन्मतात. त्यांना ती 'आरोग्य-संपदा' त्यांच्या आई-वडिलांकडून म्हणा किंवा अनुवंशिकतेने मिळालेली असते. एखाद्या व्यक्तीमध्ये जन्मजात प्रबळ असलेल्या  प्रतिकार शक्तीला आधुनिक वैद्यकीय भाषेमधे Innate Immunity असे संबोधले जाते. पण अशा व्यक्तींमधेही  ती आरोग्य-संपदा जन्मभर टिकून राहू शकत नाही. त्या आरोग्यसंपत्तीचा ऱ्हास होऊ नये म्हणून त्या-त्या व्यक्तीला सतत प्रयत्नशील राहावेच लागते. त्याचप्रमाणे, आपल्यापैकी कित्येक जणांना अनुवंशिकतेने काही आजार येतात. त्यामध्ये मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग असे अनेक आजार सामील आहेत. पण अशा व्यक्तींनी योग्य काळजी घेतल्यास ते या आजारांना आपल्यापासून दूर ठेवू शकतात, हेही आपल्याला माहिती असले पाहिजे. 

आपल्या समाजामध्ये आरोग्याबाबत बरीच जागरूकता होणे आवश्यक आहे. एकंदरीत पुष्कळसे गैरसमज जनमानसामध्ये प्रचलित असल्याचे दिसून येते. एक विधान आपण सरसकट ऐकतो, "जुन्या पिढीतल्या लोकांचा आहार उत्तम होता, त्या वेळी भाजी-पाला-धान्य हे सगळे खाद्यपदार्थ रसायनमुक्त किंवा सेंद्रिय होते, आणि त्यामुळेच त्या पिढीतल्या लोकांची तब्येत उत्तम राहायची". मात्र, या विधानाची योग्यायोग्यता आपण शास्त्रीय निकषांवर तपासून पहिली तर समजेल की ते बहुतांशी गैरसमजुतीवर आधारित आहे. केवळ चांगल्या खाण्या-पिण्यावर जर आपले आरोग्य अवलंबून असते तर आपल्या आधीच्या पिढ्यांमधील सर्वच व्यक्ती दीर्घायुषी आणि निरोगी राहिल्या असत्या. पण तसे झालेले नाही. सध्या आपल्याला चांगले, रसायनमुक्त असे अन्नधान्य मिळत नाही, ही बाब खरी आहे. त्यामुळे, आपल्या पिढीतल्या बऱ्याच जणांना काही ठराविक आजार होणे अटळच आहे, असे आपण गृहीत धरून चालतो आणि मनोमन हार मानतो. पण ही समजूतदेखील चुकीची आहे. 

आरोग्याबाबत कोणकोणते समज-गैरसमज प्रचलित आहेत, सध्या आपल्यापुढे असलेल्या आरोग्यविषयक समस्या कोणत्या, आणि निरोगी राहण्यासाठी वैयक्तिक पातळीवर काय-काय करता येईल, या विषयांवर मी या लेखमालेद्वारे प्रकाश टाकणार आहे.

   

गेल्या काही वर्षांत भारतीयांचे सरासरी आयुर्मान किती होते, यावर जर आपण धावती नजर टाकली तर अगदी धक्कादायक आकडेवारी समोर येते. एकोणिसाव्या शतकाच्या सुरुवातीला भारतीयांचे सरासरी आयुर्मान जेमतेम २५ वर्षे होते. भारताला स्वातंत्र्य मिळाले त्या वर्षी, म्हणजे १९४७ साली भारतीयांचे सरासरी आयुर्मान जरासे वाढून ३१ वर्षे झालेले होते. साधारण १९८० च्या आसपास भारतीयांचे सरासरी आयुर्मान हे ५५ वर्षांच्या आसपास होते. तर आज, म्हणजे २०२४ साली भारतीयांचे सरासरी आयुर्मान ७० वर्षांपर्यंत पोहोचलेले आहे. "जुन्या पिढीतल्या लोकांचा आहार उत्तम असल्यामुळे त्या लोकांची तब्येत उत्तम राहायची", किंवा "जुनी माणसे सध्याच्या पिढीतील माणसांपेक्षा जास्त निरोगी जीवन जगत होती", ही विधाने  किती अयोग्य आहेत, हे या आकडेवारीवरून आपल्याला कळून येईल.  

भारताला स्वात्रंत्र्य मिळाले, तेंव्हा देशवासीयांच्या आरोग्याची स्थिती कशी होती? त्यामध्ये काय-काय सुधारणा होत गेल्या?  या अनुषंगाने थोडा अभ्यास केला तर आपल्याला अनेक गोष्टी उमगतील. पूर्वीच्या काळी, पाच वर्षांखालील मुलांचा मृत्युदर आजच्या तुलनेत अधिक होता. त्यातही विशेष करून नवजात शिशूंचा मृत्युदर खूपच जास्त होता. जन्मतः होणारे जंतुसंसर्ग, साथीचे रोग, मलेरिया, अतिसारामुळे शरीरातील पाणी कमी होणे (dehydration), कुपोषण, श्वासनलिका व फुफुसांचे रोग, इत्यादी आजारांमुळे अनेक मुलांना व तरुणांना जीव गमवावा लागे.

त्याकाळी बालविवाह प्रतिबंधक कायदा असूनदेखील बहुतांशी बालविवाहच होत असत. कुटुंब-नियोजनाची संकल्पना समाजामध्ये रुजली नसल्याने, अनेक अल्पवयीन मुली गरोदर राहत. संततिनियमनाबाबत उपाययोजना केल्या जात नसल्यामुळे दोन बाळंतपणामध्ये फारसे अंतर नसे. कोवळ्या वयाच्या मातांना वरचेवर मुले होत. ती अशक्त निपजत आणि माताही कुपोषित होत जात. त्यांना पुरेशा वैद्यकीय सोयीही उपलब्ध नसत. त्यांची वैद्यकीय तपासणी अथवा रक्त-लघवी तपासणी, रक्तदाब मोजणे अशा कुठल्याच तपासण्या सरसकट केल्या जात नसत. गर्भारपणामधे महिलांना धनुर्वाताची इंजेक्शन्स मिळत नसत. अल्ट्रासाउंडची सोय तर त्या काळी उपलब्धच नव्हती.त्यामुळे प्रसुतीपूर्व अचूक रोगनिदानहोत नसे. बरीचशी बाळंतपणे घरच्याघरीच करण्याची पद्धत होती. ती बाळंतपणे करणाऱ्या सुईणी अशिक्षित-किंवा अर्धशिक्षित असत. त्यांना बाळंतपण करण्यासाठी कुठल्याही प्रकारचे प्रशिक्षण दिले गेलेले नसे. त्यामुळे अनेक स्त्रियांचा मृत्यू गर्भारपणात किंवा बाळंतपणामध्ये होई. बरेचदा बाळंतपणाच्या दरम्यान बालके गुदमरून मृत्युमुखी पडत. धनुर्वात, घटसर्प, डांग्या खोकला, गोवर अशा आजारांना प्रतिबंध करण्यासाठी लहान मुलांचे लसीकरण करण्याचा कार्यक्रम राबवला जात नसे. परिणामतः, अशा आजारांमुळेही अनेक बालके मृत्युमुखी पडत.  

गेल्या शंभर वर्षांमधे वैद्यकीय शास्त्रामध्ये अनेक नवनवीन शोध लागले. त्यामुळे वैद्यकीय संकल्पना बदलत गेल्या. एक अगदी गंमतीदार उदाहरण सांगायचे झाले तर मलेरियाचे सांगता येईल. जवळपास १९व्या शतकाच्या शेवटपर्यंत मलेरियाचा आजार दूषित हवेमुळे पसरतो असा समज होता. त्यामुळेच, या आजाराला Mal'aria ( दूषित हवा)  असे नाव पडले होते. अनेक वर्षे मलेरियावर नियंत्रण मिळवणे शक्य होत नव्हते. ब्रिटिश अधिपत्याखाली असलेल्या भारतामध्ये रोनॉल्ड रॉस नावाचा ब्रिटिश आर्मीमधील डॉक्टर एकोणिसाव्या शतकाच्या अखेरच्या वर्षांत कार्यरत होता. मलेरियाचा प्रसार कसा होतो? हे शोधून काढण्याचा त्याने जणू ध्यासच घेतला होता. मलेरियाचा प्रसार हा दूषित हवेमुळे होत नसून तो ऍनॉफिलीस जातीच्या डासांच्या मादीकरवी होतो, असा शोध अथक प्रयत्नांती त्याने लावला. या शोधामुळेच विसाव्या शतकाच्या सुरुवातीला, १९०२ साली Physiology विषयातील नोबेल पुरस्कार देऊन त्याला सन्मानित करण्यात आले. रोनॉल्ड रॉसच्या शोधकार्यामुळे मलेरियाच्या आजारावरची औषधे, इतर उपाय,व आजार नियंत्रित करण्याच्या पद्धती, याबाबतचे संशोधन शक्य झाले. तसेच मलेरियाचा प्रतिबंध करणे आणि मलेरियामुळे मोठ्या प्रमाणावर होत असलेल्या मृत्यूचे प्रमाण कमी करणे शक्य झाले. मलेरियाबाबतचे इतके मोठे संशोधन मुख्यत्वे भारतभूमीवर झाले, ही बाब लक्षणीय आहे.

गेल्या शतकामधे आपल्या देशात अतिसार किंवा उलट्या-जुलाब होऊन मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या कमालीची जास्त होती. पूर्वीच्या काळी उलट्या-जुलाब होत असलेल्या रुग्णांना तोंडावाटे अन्न आणि पाणी न देण्याची अथवा 'लंघन' करवण्याची एक चुकीची पद्धत रूढ होती. त्यामुळे कित्येक रुग्ण शरीरातले पाणी कमी होऊन मृत्यमुखी पडत. काही रुग्ण कुपोषित होऊन अशक्त होत. अशक्तपणामुळे पुन्हा-पुन्हा आजारी पडत. दूषित पाण्यातून किंवा अन्नामधून कॉलरा वा इतर प्रकारच्या गॅस्ट्रोची लागण सरसकटपणे होत असे. अशा संसर्गजन्य रोगांची साथ झपाट्याने आसपासच्या परिसरात पसरून, एकाच वेळी आसपासच्या चार-सहा खेडयांमधल्या सर्व गावकऱ्यांना लागण  होत असे. 

कॉलरावर लागू पडू शकणाऱ्या औषधांचा त्या काळी अभाव होता. तसेच, डॉक्टर्स आणि परिचारिकांची संख्याही कमी होती. सामान्यतः गॅस्ट्रोच्या रुग्णांना दिवसातून अनेकदा मोठमोठया जुलाब-उलट्या होतात. एका वेळेस जवळपास पाव ते अर्धा बादली जुलाब अथवा उलटी होते व दिवसभरात सतत उलट्या-जुलाब होत राहतात. त्यामुळे अशा रुग्णाच्या शरीरामध्ये शुष्कता येते. अशावेळी त्या रुग्णांना सलाईन चढवणे अत्यावश्यक असते. पण अशा अशक्त रुग्णांची शीर सापडणेच दुरापास्त होऊन बसते. 

अशा सर्वच समस्यांमुळे पूर्वीच्या काळी कॉलराच्या साथीत शेकडो लोक पटापट मृत्युमुखी पडत असत. म्हणूनच कॉलरा या रोगाला 'पटकी' असे नाव दिले गेले होते. 

या समस्यांवर उपाय म्हणून तोंडावाटे ग्लुकोजमिश्रित सलाईन देऊन रुग्णाचे जीव वाचवता येतील का? असा विचार शास्त्रज्ञांनी सुरु केला. अमेरिकन आर्मीमधील डॉक्टर फिलिप्स यांनी सर्वप्रथम १९६४ साली, तोंडावाटे जलसंजीवनी देऊन दोन रुग्णाचे प्राण वाचवले. त्यानंतर ढाका येथील कॉलरा संशोधन प्रयोगशाळा आणि कोलकातामधील  संसर्गजन्य रोगांसाठीच्या रुग्णालयामधे महत्वाचे संशोधन झाले. तेथे कार्यरत असलेल्या डॉक्टरांनी जलसंजीवनीतील क्षार आणि साखर या घटकांचे प्रमाण ठरवण्यासाठी मोठे योगदान दिले. १९७१ मध्ये बांगला देशाच्या स्वातंत्र्यासाठी  मुक्तिवाहिनीचा लढा चालू होता. त्यावेळी, प्रसिद्ध बालरोगतज्ज्ञ डॉ. दिलीप महालनोबीस यांनी बंगाली निर्वासितांच्या छावणीमधे पसरलेल्या कॉलरासाथीचे नियंत्रण यशस्वीपणे करून दाखवले. त्यांनी रुग्णांना जलसंजीवनी दिल्यामुळे, त्या साथीत मृत्युमुखी पडणाऱ्या रुग्णाची संख्या बरीचशी आटोक्यात ठेवता आली. त्यांच्या या योगदानासाठी भारत सरकारने डॉ. महालनोबीस यांना मरणोपरांत 'पद्मविभूषण' सन्मानाने गौरवले. जलसंजीवनीचा शोध, हा विसाव्या शतकातील सर्वात महत्त्वाचा शोध मानला जातो. आज जलसंजीवनी घरोघरी पोहोचल्यामुळे, गॅस्ट्रो झाल्यानंतर शरीरात येणारी शुष्कता किंवा dehydration होऊन मृत्यू होण्याचे प्रमाण नगण्य झाले आहे. 

विसाव्या शतकात आधुनिक वैद्यकीय शास्त्रामध्ये लागलेल्या अशा नवनवीन शोधांमुळे अनेक जुन्या वैद्यकीय संकल्पना बदलल्या आणि कित्येक संकल्पना नव्याने मांडल्या गेल्या. स्वच्छ पेयजलाची सोय, अन्नसुरक्षा व अन्नाची स्वच्छता, सार्वत्रिक मोफत लसीकरण, जलसंजीवनीचा योग्य वापर, साथीच्या रोगांचे निवारण, आणि वैद्यकीय सोयी-सुविधांची उपलब्धता, अशा अनेक  गोष्टींमुळे जगभरातल्या माणसांचे आयुर्मान वाढत गेले. गर्भवती माता आणि बालसंगोपनाबाबतच्या वैद्यकीय सोयी आणि सुविधा भारतामध्ये मोठ्या प्रमाणावर आणि मोफत उपलब्ध झाल्या. अशा प्रकारे सुधारत जाणाऱ्या परिस्थितीमुळेच आज २०२४ साली भारतीयांचे सरासरी आयुर्मान ७० वर्षांपर्यंत पोहोचलेले आहे. तरी अजूनही भारतीयांचे सरासरी आयुर्मान इतर अनेक देशांच्या तुलनेत बरेच कमी आहे. जपान, मोनॅको, सिंगापूर, हॉंगकॉंग, इटली, साऊथ कोरिया, स्वित्झर्लंड अशा अनेक देशातील नागरिकांचे सरासरी आयुर्मान जवळपास ८५ वर्षे आहे. पण पुढील काही वर्षांमध्ये आपल्या देशातील जनतेचे सरासरी आयुर्मान ८० वर्षांच्या वर जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 

देशातील नागरिकांचे सरासरी आयुर्मान वाढत असले तरीही त्याबरोबरच वैद्यकीय समस्याही वाढत जातात, हेही आपण लक्षात घेतले पाहिजे. विशेषतः ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्याच्या समस्या खूप मोठ्या प्रमाणामधे वाढत जातात. वैद्यकीय सोयी-सुविधासाठी लागणारा खर्च, औषधांचा खर्च, स्वास्थ्य विमा, जेष्ठ नागरिकांची राहण्याची व्यवस्था, वृद्धाश्रम, वैद्यकीय सहाय्यक, इत्यादी अनेक समस्या आजही आहेत. त्या समस्या कमी असाव्या असे वाटत असेल तर, देशातील नागरिकांचे सरासरी आयुर्मान वाढावे, आणि अधिकांश नागरिक निरोगी राहावेत, यावर विचार आणि त्यासाठी प्रयत्न होणे अत्यावश्यक आहे. सरकारी वैद्यकीय सेवांचा भर या गोष्टीवर काही प्रमाणात असतो. पण खाजगी क्षेत्रामधल्या वैद्यकीय व्यावसायिकांना त्यावर लक्ष द्यायला पुरेसा वेळ असतोच असे नाही. म्हणूनच, 'माझे आरोग्य ही माझी जबाबदारी आहे' असाच विचार आपल्यापैकी प्रत्येकाने केला पाहिजे. 'आयुष्याच्या अंतापर्यंत आपण निरोगी आणि सशक्त कसे राहू' याबाबतचा विचार वैयक्तिक पातळीवर होणे आवश्यक आहे.  

आरोग्य या शब्दाची व्याख्या आणि व्याप्ती आपण पुढील काही लेखांमधे समजावून घेणार आहोत. त्याचप्रमाणे, निरोगी कसे राहता येईल याबाबत चर्चा करणार आहोत. चुकीच्या जीवनशैलीमुळे होणाऱ्या आजारांविषयी तसेच असंसर्गजन्य आजारांविषयी माहिती घेऊन, ते आजार कसे टाळता येतील, हेही आपण पुढील लेखांमधून समजावून घेणार आहोत.   



रविवार, १२ मे, २०२४

मधुमेहींनो, आंबा खा.. पण जरा जपून!

'मधुमेहींनी आंबा खावा की न खावा?' या विषयावर मी नुकताच एक लेख माझ्या ब्लॉगवर प्रसिद्ध केला आणि  समाजमाध्यमांमध्येही प्रसृत केला होता. त्या लेखावर बऱ्याच उलट सुलट, आणि काही गमतीदार प्रतिक्रिया आल्या. त्या प्रतिक्रिया आणि त्यावरचे माझे विचार वाचकांपर्यत पोहोचवावेत असे मला वाटते. 



मधुमेहींनी दिवसभरात एखादा आंबा खायला हरकत नाही, असे त्या लेखामध्ये मी सांगितले आहे. त्याचबरोबर, शक्यतो तो आमरस-पोळी अशा स्वरूपात न खाता, दोन जेवणांच्या मधल्या वेळेत खावा असे सांगितले. रक्तातली साखर प्रमाणाबाहेर वाढू न देण्यासाठी मधुमेहींनी असे पथ्य पाळणे आवश्यक आहे, असे मी सुचवले होते . 

काही सुज्ञ आणि सजग मधुमेहींनी व इतर वाचकांनी मी लिहिलेली कारणमीमांसा समजून घेतली. 'दिवसभरामधे एखादा आंबा खायला हरकत नाही', हे वाचून काही मधुमेहींनी माझे आभारही मानले. तर, "आंब्याच्या दिवसांमध्ये, दिवसभरात आम्ही काय फक्त एकच आंबा खायचा का? हे असले काही आम्ही काही मानणार नाही", असे काही मधुमेहींनी अगदी स्पष्टपणे सांगितले. एका मित्राला तर माझा लेख वाचून फारच वाईट वाटले. त्याने लिहिलंय,

"मधुमेहींनी दिवसभरामधे एखादा आंबा खायला हरकत नसते, असे आधी कळले असते तर माझ्या दिवंगत वडिलांना आंबा खायला देता आला असता. मधुमेहींनी आंबा खायचाच नाही अशा समजुतीने, मधुमेहाचे निदान झाल्यावर आम्ही त्यांना कधीही आंबा खाऊच दिला नाही"

पुण्यातील सुप्रसिद्ध बालरोगतज्ज्ञ डॉ. राजीव जोशी हे स्वतः मधुमेहग्रस्त आहेत. माझा लेख वाचून त्यांनी मधुमेहींना मार्गदर्शक ठरावी अशी एक प्रतिक्रिया दिली आहे, ती  खालीलप्रमाणे: -

"छान माहितीपूर्ण लेख. डॉ. अभय बंग यांनी, "एक चमचा श्रीखंड खाऊन चव घ्या आणि मग एक चमचा श्रीखंड खाऊन थांबा", असे सांगितले आहे. एका बाजूने अर्धी फोड खाऊन चव घ्या आणि दुसर्‍या बाजूने उरलेली अर्थी फोड घेऊन थांबा...याप्रमाणे, मी एक फोड आंबा खाऊन थांबतो.. ग्लायसेमिक इंडेक्स आणि ग्लायसेमिक लोड यांचा हिशोब करत बसावा लागत नाही आणि दिवसात कितीही वेळा अशा पद्धतीने आंबा खाल्ला तरी रक्तशर्करा वाढत नाही..!!"

डॉक्टर राजीव जोशींचे म्हणणे खरे आहे. सतत ग्लायसेमिक इंडेक्स आणि ग्लायसेमिक लोडचा हिशोब करत जेवणखाण करणे, कोणालाही  शक्य नाही. त्यामुळे मधुमेहींनी आंबा किंवा कोणताही गोड पदार्थ समोर आल्यास, डॉक्टर राजीव जोशींचा सल्ला मानावा, हे योग्य! मधुमेही रुग्णांनी जर योग्य आहार घेतला, नियमित व्यायाम केला, वजन आणि ताणतणावावर नियंत्रण ठेवले तर आजार बळावत जात नाही, असेही  ते स्वानुभवावरून सांगतात.  

"मधुमेहींनी आंबा खाल्लेले चालते, असे असतानाही ऍलोपॅथिक डॉक्टर्स आम्हाला आंबा खायला उगाच का मनाई करतात?" असा रास्त प्रश्न अनेक मधुमेहींना पडला आणि त्यांनी त्याबाबत नाराजीही व्यक्त केली. 

या प्रश्नाचे उत्तर सोलापूरस्थित, प्रसिद्ध फिजिशियन डॉक्टर दिलीप आपटे सरांनी दिलेल्या प्रतिक्रियेमध्ये आहे. आपटे सर गेली तीस वर्षांहून अधिक काळ सोलापुरात वैद्यकीय व्यवसाय करतात. योग्य निदान आणि त्यानुसार कमीतकमी औषधयोजना करणारे डॉक्टर, अशी त्यांची ख्याती आहे. डॉक्टर दिलीप आपटे सरांनी दिलेले उत्तर अतिशय बोलके आणि समर्पक आहे. 

"सोलापुरातील लोकांचा असा युक्तिवाद आहे की आंबा वर्षातून एकदाच येतो म्हणून आपण तो खायलाच हवा. कितीही सांगितले तरी त्यांच्यामधे काहीही फरक पडत नाही. ते वर्षातले दोन महिने दररोज आंबा खातात. त्यातून सोलापुरात आमरसामधे साखर घालायची पद्धतही आहे. माझे अनेक मधुमेही रुग्ण, असा साखरमिश्रित आमरस अगदी मुक्तपणे खातात. भरपूर आमरस खाल्ल्यामुळे त्यांची भूकही वाढते, त्यामुळे त्या आमरसाबरोबर एक-दोन जास्तीच्या पोळ्या खाल्ल्या जातात. अशा रीतीने, त्यांच्या जेवणातल्या एकूण कॅलरीज भरपूर  वाढतात. तसेच उन्हाळ्याच्या काळात सोलापूरमधे तापमान फारच जास्त असल्यामुळे, लोक फारसा व्यायामही करत नाहीत, आणि जास्तीच्या खाण्यामुळे पोटामध्ये गेलेल्या जास्तीच्या कॅलरीज जाळल्याही जात नाहीत. या कारणामुळे, आंब्याच्या दिवसांमधे, माझ्याकडे येणाऱ्या बहुतेक मधुमेही रुग्णांची रक्तातील साखर वाढते. माझा वैयक्तिक अनुभव आहे की जूनमध्ये माझ्या बहुतेक मधुमेही रुग्णांची BSL वाढलेली असते आणि मला पुढील ३ महिन्यांसाठी त्यांची औषधे वाढवावी लागतात. या कारणामुळे मी वैयक्तिकरित्या त्यांना आंबा बंद करण्यास सांगतो किंवा फार-फारतर दिवसभरामध्ये एक-दोन फोडी खा असा सल्ला देतो."

इतर शहरातल्याही वैद्यकीय व्यावसायिकांना थोड्याफार फरकाने असाच अनुभव येत असावा. 

इथे एक मात्र म्हणावेसे वाटते. एखादा आंबा खाल्ल्यानंतर ज्या मधुमेहींना मनावर ताबा ठेवणे शक्य होणार नसेल त्यांनी आंब्यापासून दूरच राहिलेले बरे. प्रत्येक मधुमेही रुग्णाने आपापल्या नेहमीच्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार पथ्य पाळलेले योग्य होईल.  

काही रुग्णांना वाटते, "साखर वाढली तर वाढू दे ना. काय फरक पडतोय? फारतर काय होईल? डॉक्टर अजून एक एक गोळी किंवा फारतर इन्सुलिन वाढवून देतील." पण केलेल्या कुपथ्यामुळे औषध वाढत जाणे, याचा शरीराला दुहेरी त्रास असतो, हे त्यांच्या लक्षांतच येत नाही. 

मधुमेहींची रक्तशर्करा वाढली की, त्यांच्या नकळत त्यांच्या शरीरातील अनेक अवयवांवर घातक परिणाम होत असतो. तसेच गोळ्या किंवा इंजेक्शन वाढले की त्याचेही काही दुष्परिणाम त्यांच्या शरीरावर होत असतात . दुर्दैवाने, अशा दुष्परिणामांची ठोस लक्षणे त्या-त्या वेळी ठळकपणे दिसत नाहीत नाहीत. ती जेंव्हा लक्षात येतात तेंव्हा फार उशीर झालेला असू शकतो. आणि म्हणूनच मधुमेह या रोगाला 'सायलेंट किलर' असे नाव पडलेले आहे

काही मधुमेही रुग्ण तर, ऍलोपॅथीच्या डॉक्टरांनी दिलेला योग्य सल्ला न मानता, आपल्या मनाला येईल तसे वागतात. सांगितलेले पथ्यही पाळत नाहीत, नियमित व्यायाम करत नाहीत. मग त्यांचे औषध वाढवावे लागते. त्याउप्पर, हे रुग्ण असा कांगावाही करतात की, 'ऍलोपॅथीचे डॉक्टर्स उगीचच आमच्या औषधांचा डोस वाढवत नेतात!'  

अशा नाराज झालेल्या रुग्णांना, "डायबेटीस रिव्हर्सल" या नावाखाली केलेल्या आकर्षक जाहिरातबाजीचा मोह न पडला तरच नवल! त्या तथाकथित 'फायदेशीर' व्यवसायाबद्दल पुढे कधीतरी लिहीन!   

                                                                                       डॉ. स्वाती बापट [एम.बी.बी.एस., एम. डी. (बालरोग)] 



शुक्रवार, १० मे, २०२४

मधुमेहींनी आंबा खावा की नाही?


मधुमेहींनी आंबा खावा की नाही? याबाबत बरेच उलटसुलट मतप्रवाह ऐकायला मिळतात. मधुमेहींनी शक्यतो आंबा खाऊच नये, असा सल्ला काही डॉक्टर्स देतात. तो सल्ला अर्थातच कुठल्याही मधुमेही रुग्णाच्या कानाला गोड वाटत नाही. याउलट, 'मधुमेहींनी रोज एक आंबा खावा', हा कदाचित मधुमेहींच्या कानाला गोड लागेल असा सल्ला अनेक 'सुप्रसिद्ध' (?) आहारतज्ज्ञ देतात. यापैकी कोणाचे सांगणे बरोबर आहे? आपण आंबा खावा की नाही? असा संभ्रम मधुमेहींच्या मनांमध्ये निर्माण होतो. 

"मधुमेहींनी आंबा खावा की न खावा? खाल्ला तर एका दिवसात किती खावा? खाताना तो कसा - म्हणजे फोडी करून नुसता आंबाच खावा की आमरस काढून पोळीबरोबर अथवा पुरीबरोबर खावा?" हा संभ्रम दूर करण्यासाठी, आपण या प्रश्नांची उत्तरे शास्त्रीय निकष लावून शोधूया. त्याचप्रमाणे, एक आंबा खाणार असू तर तो किती मोठा अथवा किती वजनाचा असावा याबाबतही जाणून घेऊया. 
 
हे सर्व नीट समजण्यासाठी आधी आपल्याला ग्लायसेमिक इंडेक्स (GI) आणि ग्लायसेमिक लोड (GL), या दोन संकल्पनांची माहिती आवश्यक आहे. 

एखादा खाद्यपदार्थ खाल्ल्यानंतर, आपल्या रक्तातील साखर किती वेगाने वाढू शकते हे त्या-त्या पदार्थाच्या ग्लायसेमिक इंडेक्सवर ठरते. त्यामुळे, ग्लायसेमिक इंडेक्स हाच निकष समोर ठेवून खाद्यपदार्थांचे खालीलप्रमाणे वर्गीकरण करण्यात आलेले आहे:-

कमी ग्लायसेमिक इंडेक्स (low GI ) = ५५ पेक्षा कमी 
मध्यम ग्लायसेमिक इंडेक्स (medium GI ) = ५५-६९
जास्त ग्लायसेमिक इंडेक्स (high GI ) = ७० पेक्षा जास्त 

सर्वसाधारणतः, जास्त ग्लायसेमिक इंडेक्स असलेले पदार्थ मधुमेहींनी टाळावेत व शक्यतो low GI चे पदार्थ खावेत, असे आम्ही सांगतो. पिकलेल्या आंब्याचा ग्लायसेमिक इंडेक्स सुमारे ५५ असतो. त्यामुळे फक्त ग्लायसेमिक इंडेक्स या निकषाचाच विचार केला तर मधुमेहींनी आंबा खावा का?  याचे उत्तर 'हो' असेच येऊ शकेल. परंतु, एखाद्या पदार्थामुळे रक्तातली साखर किती वाढेल हे फक्त ग्लायसेमिक इंडेक्सवर ठरत नाही. त्याकरता ग्लायसेमिक लोड (GL)चा विचारदेखील करणे जरुरीचे आहे. 

ग्लायसेमिक इंडेक्स बरोबरच, त्या-त्या पदार्थामध्ये असलेल्या कर्बोदकांचे प्रमाण अथवा टक्केवारी आणि तो पदार्थ आपण किती प्रमाणात खात आहोत, यावर त्याचे ग्लायसेमिक लोड (GL) ठरते. म्हणजेच, कमी ग्लायसेमिक इंडेक्स असलेला एखादा पदार्थ तुम्ही खूप जास्त प्रमाणात खाल्ला तर त्या एकाच खाण्यातले ग्लायसेमिक लोड खूप जास्त होणार आहे. म्हणजेच तुमच्या शरीरात एकाच वेळेस खूप जास्त साखर जाणार आहे व त्यामुळे रक्तातल्या साखरेची पातळी अचानक वर जाणार आहे. त्याउलट, खूप जास्त ग्लायसेमिक इंडेक्स असलेला एखादा पदार्थ जर अतिशय अल्प प्रमाणातच खाल्ला, तर त्याचे ग्लायसेमिक लोड मात्र कमी असेल, आणि रक्तातली साखरही अचानक वाढणार नाही. 

ग्लायसेमिक लोड किती असावे याबाबतचा तक्ता खालीलप्रमाणे आहे:- 

कमी ग्लायसेमिक लोड (low GL) = १० पेक्षा कमी 
मध्यम ग्लायसेमिक लोड (medium GI) = १०-२०
जास्त ग्लायसेमिक लोड (high GI) = २० पेक्षा जास्त

मधुमेहींनी एका वेळेच्या (नाश्ता/ जेवण/मधल्या वेळेचे खाणे) आहारात शक्यतो १० किंवा १० पेक्षा कमी ग्लायसेमिक लोड खाणे हे सगळ्यात योग्य होय. तसेच, एका वेळेच्या आहारामध्ये २० पेक्षा जास्त ग्लायसेमिक लोड असू नये, हेही निश्चित. परंतु, दिवसभरात, जरी आपण १०-२० च्या दरम्यान ग्लायसेमिक लोड असलेले खाणे ५ वेळा खाल्ले, (सकाळची न्याहारी, सकाळचे मधल्या वेळेचे खाणे, दुपारचे जेवण, संध्याकाळचे मधल्या वेळेचे खाणे आणि रात्रीचे जेवण) तरी दिवसभराचे ग्लायसेमिक लोड १०० च्या आतच राहील व रक्तातील साखर सुनियंत्रित राहू शकेल. असे सातत्याने केल्यास, मधुमेहींच्या रक्तातील साखर कायम नियंत्रित राहू शकते व ग्लायकोसायलेटेड हेमोग्लोबिन (HbA1C) कमी राहते.  

सर्वसाधारणपणे मध्यम आकाराच्या एका आंब्याचे वजन सुमारे २०० ग्रॅम्स असते आणि त्यामधील रसाचे किंवा गराचे वजन सुमारे १२० ग्रॅम्स भरते. जर १०० ग्राम रस किंवा गर घेतला तर त्यात १५ ग्रॅम्स कर्बोदके किंवा साखर असते. म्हणजेच, १२० ग्रॅम रसामध्ये जवळपास १८ ग्रॅम साखर असणार आहे. 

एका २०० ग्रॅम वजनाच्या आंब्याचे ग्लायसेमिक लोड आपण काढूया. त्यासाठीचे गणिती सूत्र खालीलप्रमाणे आहे:-

ग्लायसेमिक लोड = ग्लायसेमिक इंडेक्स x  कार्बोहायड्रेटचे प्रमाण ÷ १००

आंब्याचा ग्लायसेमिक लोड = ५५ x १८ ÷ १०० = ९.९  असे उत्तर येते.

म्हणजेच एका खाण्याच्या वेळेस मधुमेहींना, मध्यम आकाराचा (२०० ग्राम वजनाचा) एखादा आंबा खायला हरकत नाही. 

पण हा आंबा इतर जेवणाबरोबर किंवा पोळी/पुरीबरोबर खाता येईल का? मधुमेहींनी जर आमरस पोळी/पुरी खाल्ली तर काय होईल?  याबाबतही कोष्टक मांडून आपण समजून घेऊया.  

गव्हाचा ग्लायसेमिक इंडेक्स ७२ असतो. गव्हाच्या पिठाच्या मध्यम आकाराच्या पोळीमधे साधारणतः १८ ग्रॅम कार्बोहायड्रेट असतात. त्यामुळे अशा एका पोळीचे ग्लायसेमिक लोड खालील प्रमाणे होते:-

७२ x १८ ÷ १०० = १२.९६... म्हणजे जवळपास १३. 

म्हणजेच एका मध्यम आकाराच्या आंब्याचा रस आणि एक मध्यम आकाराची पोळी मिळून, ९.९ + १३ = २२.९ इतके ग्लायसेमिक लोड होईल. म्हणजेच २० पेक्षा जास्त लोड होईल, आणि त्या मधुमेही रुग्णाच्या रक्तातली साखर प्रमाणाबाहेर वाढेल.   

त्यामुळे, जर आमरस-पोळी खायची असेल तर एका मध्यम आकाराच्या आंब्याचा रस आणि मध्यम आकाराची अर्धी पोळी खायला हरकत नाही. पण मग त्या जेवणामध्ये भात आणि कर्बोदके देणारे इतर पदार्थ (भात, भजी, पॅटिस,वडे  बटाटा किंवा पिष्टमय भाज्या) अजिबात असायला नकोत. कारण, जर ते पदार्थदेखील असले तर त्या पदार्थांतून मिळणारे ग्लायसेमिक लोड आणि आमरस-पोळीचे ग्लायसेमिक लोड मिळून, एकूण लोड खूपच जास्त होईल आणि त्यानंतर दोन तासांनी रक्तातली साखर तपासली, तर ती खूपच जास्त येईल. 

आंब्यामध्ये तंतुमय पदार्थ, जीवनसत्वे, आणि इतर बरेच आरोग्यदायी घटक असतात. शिवाय, आंबा हा फक्त आंब्याच्या दिवसातच मिळणार आहे. म्हणून या दिवसात आंबा खायला हरकत नाही, पण तो खाण्यामागचे सगळे शास्त्र समजून घेऊनच, मधुमेहींनी आंब्याचा रसास्वाद घ्यावा इतकेच. 

डॉ. स्वाती बापट [एम.बी.बी.एस., एम. डी. (बालरोग)]