रविवार, २५ जून, २०२३

मधुमेहींसाठी आहाराची तत्वे

मधुमेहींसाठी आहाराची तत्वे:-

१. आपल्या रोजच्या आहारातलेच खाद्यपदार्थ खायचे आहेत. कुठलेही फॅन्सी पदार्थ /पावडरी खाण्याची गरज नसते.   डायबेटिसवर कारले/जांभळाच्या बिया व मेथ्या/मेथी अशा पदार्थाने पूर्णपणे नियंत्रण ठेवता येईल याची खात्री नसते. त्यामुळे संपूर्ण आहारावर नियंत्रण ठेवणे आवश्यक असते. 

२. मैदा/आंबवलेले पदार्थ/साखर/गूळ/गोडपदार्थ रक्तातील साखरेची पातळी भराभरा वाढवतात. म्हणून ते शक्यतो टाळायचे, किंवा अगदी कमी प्रमाणात खायचे. 

३.ज्वारी/बाजरी/गहू/तांदूळ/नाचणी/वरीचे तांदूळ/मका/राजगिरा/ओट्स् वगैरे धान्ये आणि तृणधान्ये आपल्या शरीराला कार्बोदके देतात. 'एकाच वजनाची'  धान्ये/तृणधान्ये घेऊन त्याचे पदार्थ खाल्ल्यास  रक्तातील साखर कमीजास्त प्रमाणात वाढते. पण त्यात फार तफावत नसते. अर्थात भातामुळे जरा जास्त वाढेल आणि ज्वारी बाजरी मुळे जरा कमी वाढेल. भाकरी किंवा चपाती खाल्ल्यानंतर रक्तातील साखर सर्वसाधारणपणे सारख्याच प्रमाणात वाढणार आहे. भाकरीचे वजन चपातीच्या वजनापेक्षा जास्त असते. रोज पोळी-भाकरीचे  वजन करून जेवणे शक्य नसते. त्यामुळे एका चपातीच्या ऐवजी अर्धी भाकरी खावी. भात पूर्णपणे वर्ज्य करायची गरज नाही. सर्वसाधारणपणे हातसडीच्या बासमती तांदुळाचा, छोटी वाटी भात खायला हरकत नाही. प्रत्येक जेवणात पोळी/भाकरी/भात याचे  प्रमाण कमी असावे. तसेच गोड पूर्णतः वर्ज्य करण्याची आवश्यकता नाही. पण ते वाटीभर खाण्याऐवजी चमचा-दोन चमचे खावे.

३. मधुमेहींना साखरेच्या ऐवजी गूळ/मध/कृत्रिम स्वीट्नर्स असे पर्याय सुचवले जातात. यामधील कृत्रिम स्वीट्नर्स पूर्णपणे टाळावेत. एकाच वजनाची साखर, गूळ  किंवा शुद्ध मध घेतले तर, यापैकी गुळामुळे रक्तातील साखर जास्त प्रमाणात वाढते तर शुद्ध मधामुळे कमी प्रमाणात वाढते. त्यामुळे साखरेच्या ऐवजी गूळ खाल्ला तरी चालतो हा एक 'गोड' गैरसमज आहे. साखर कमीतकमी खावी. आणि साखरेला पर्याय म्हणून शुद्ध मध वापरावा, गूळ वापरू नये.

४. 'शुगर फ्री' अशी मिठाई /आईस्क्रीम विकली जातात. ती अतिशय फसवी जहिरातबाजी असते. यामधे गोडी आणण्यासाठी अंजीर, खजूर, जरदाळू, बेदाणे यांचा वापर केला जातो. हे सगळे पदार्थ रक्तातील साखर वाढवतातच. काहीवेळा अशा गोड पदार्थांमधे कृत्रिम स्वीट्नर्स असतात. ते तर मुळीच खाऊ नयेत.

५. प्रत्येक वेळेस जेवताना/खाताना, त्या आहारामधे प्रथिने असतील तर रक्तातील साखर कमी वेगाने वाढते व साखरेच्या प्रमाणावर नियंत्रण राहते. त्यासाठी शाकाहारी व्यक्तींनी दूध/दही/ पनीर/चीझ/सोयाबीन/कडधान्ये खावीत. मांसाहारी व्यक्तींना अंडी/मासे/मटण हे पर्यायही उपलब्ध आहेत.

६. प्रत्येक जेवणात/नाष्ट्यामधे भरपूर तंतूमय पदार्थ असावेत. यासाठी काकडी, गाजर, टोमॅटो, मुळा, कोबी अशा कच्च्या भाज्या, कमी गोडीची फळे, आणि मोड आलेली कडधान्ये खावीत.

७. आहारात तेलकट, तुपकट, तळलेले पदार्थ कमीतकमी ठेवावेत. यासाठी दरमहिना दरडोई अर्धा किलोपेक्षा जास्त तेल वापरू नये. साजूक तूप/लोणी दिवसभरात चमचा-दोन चमचे खायला हरकत नाही. बाहेरील पाकीटबंद तळलेले पदार्थ/बिस्किटे शक्यतो घरी आणूच नयेत. त्यामधे तूप-तेल खूप जास्त असते आणि त्यांचा दर्जा चांगला असेल याची खात्री नसते. 

८. सूर्यफूल/शेंगदाणा/करडई/सरकी/मोहरी यापैकी, कुठलेही एक तेल आदलून-बदलून वापरावे. आहारात जवस, तीळ, कारळे, मोहरी व शेंगदाणे यांचा वापर करावा. तसेच रोज मूठभर म्हणजे २० ग्रॅम  'ट्री नटस्' (अक्रोड, बदाम पिस्ता, पाईननट्स) खावेत. 

९. दिवसातून एक किंवा दोन वेळेस भरपेट न खाता, तेवढेच अन्न थोडे-थोडे करून दिवसातून चार ते पाच वेळा खाल्ले तर रक्तातील साखरेवर चांगले नियंत्रण राहते हे जगन्मान्य आहे. मधुमेहींनी काहीही न खाता उपाशी राहणे योग्य नाही. बटाटा, साबुदाणा कमी प्रमाणात खावा. बटाट्यापेक्षा रताळ्यामधे तंतू जास्त असल्याने ते खाणे जास्त चांगले. 

१०. मधुमेहींच्या आहाराबाबतची ही मार्गदर्शक सूत्रे आहेत. तुम्ही घेत असलेली औषधे, तुम्हाला असलेल्या इतर व्याधी याचा विचार करून तुमचा आहार कसा असावा ते तुमचे डॉक्टर योग्य सांगू शकतात, हे लक्षात घ्यावे. 

 
तळटीप:- मी स्वतः जेस्टेशनल डायबेटिक (गर्भारपणात होणारा डायबेटिस) होते. म्हणजेच मी आज प्री-डायबेटिक आहे. पण
गेली एकतीस वर्षे, गोळ्या औषधांशिवाय मी मधुमेहावर नियंत्रण ठेवलेले आहे. अर्थात याला व्यायामाची जोड आहेच. व्यायामाबद्दल पुढे कधीतरी लिहीन.

डॉ. स्वाती बापट (MBBS, MD, बालरोगतज्ज्ञ)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा