शनिवार, ५ जून, २०२१

काढा डोळ्यावरची पट्टी!

सहा-सात वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. एका संध्याकाळी, माझ्या क्लिनिकमध्ये आलेले सर्व पेशन्ट तपासून झाल्यामुळे,  मी अगदी घरी जाण्याच्या तयारीत होते. तितक्यातच, माझे एक जुने पेशंट आले असल्याचे माझ्या सेक्रेटरीने मला सांगितले. मला गडबड असली तरीही क्लिनिकपर्यंत पोहोचलेल्या पेशंटला परत पाठवणे मला योग्य वाटत नव्हते. माझ्या क्लिनिकमध्ये, प्रत्येक पेशंटला एक नोंदणी क्रमांक दिलेला असतो. त्या क्रमांकाच्या कार्डावर मी त्या पेशंटच्या नोंदी (Medical notes ) लिहून ठेवते. या उशिरा आलेल्या पेशंटचे कार्ड शोधण्यात आणखी वेळ जाईल, असा विचार करून, मी सेक्रेटरीला सांगितले की आलेल्या पेशंटला तिने त्वरित माझ्या केबिनमध्ये पाठवावे आणि त्यांचे कार्ड शोधून ते नंतर आणून द्यावे. 

माझ्या केबिनचे दार उघडून माझी पेशन्ट वैष्णवी आणि तिचे पालक आत आले.  जवळजवळ दोन-अडीच वर्षांनंतर वैष्णवी माझ्याकडे आली होती. तिला पाहताच मी अगदी सहजपणे म्हणाले, "अरे वा, वैष्णवी मोठी झाली की! चटकन मी ओळखलंच नाही तिला." [गोपनीयतेच्या हेतूने माझ्या त्या पेशंट मुलीचे मी नाव बदलले आहे] 

माझे ते वाक्य ऐकल्या-ऐकल्या, वैष्णवीची आई घळाघळा रडायलाच लागली. माझ्या बोलण्यात काही चूक तर झाली नाही ना असे मला वाटू लागले. मी वैष्णवीच्या वडिलांना, वैष्णवीला घेऊन बाहेर जायला सांगितले. वैष्णवीची आई आता चक्क ओक्साबोक्शी रडू लागली. मग मात्र हा काहीतरी गंभीर प्रकार असणार याची मला जाणीव झाली.  या मुलीचं लैंगिक शोषण झाले आहे की काय? किंवा तिला काही मानसिक आजार वगैरे झाला आहे की काय? अशा अनेक शंका माझ्या मनात यायला लागल्या. 

वैष्णवीच्या आईला बऱ्याच प्रयत्नानंतर मी शांत केले. 

"नेमकं काय झालंय, हे आता जरा मला सांगाल का ? तुम्ही इतक्या का रडता आहात?" असे मी विचारले.  

वैष्णवीच्या आईने सांगायला सुरुवात केली. "डॉक्टर तुम्हाला आठवतंय का? अगदी दोन-अडीच वर्षांपूर्वीपर्यंत आम्ही वैष्णवीला घेऊन तुमच्याकडे यायचो."

"हो, चांगलं आठवतंय." हे बोलणे सुरु असतानाच माझ्या सेक्रेटरीने मला वैष्णवीचे कार्डही आणून दिले होते. त्या कार्डावरील नोंदी बघत मी म्हणाले, "वैष्णवी आता जवळपास साडेसात वर्षांची झाली आहे. साधारण अडीच वर्षांपूर्वी मी तिला DPT चा बूस्टर डोस दिलेला आहे. त्यानंतर तुम्ही आजच आला आहात."

"हो डॉक्टर.  वैष्णवी त्यावेळी अगदीच बारीक दिसायची. तुम्हाला आठवतंय का? त्यावेळी तिचं वजन फारच कमी वाढायचं याची आम्हाला सतत काळजी होती."

"हो आठवतंय ना. 'तिचं वजन वाढण्यासाठी काहीतरी औषध द्या', अशी गळ तुम्ही सतत घालत होता, हेही मला चांगलंच आठवतंय " 

"पण तुम्ही कधीच वजन वाढायचं औषध दिले नाहीत."

"नाहीच दिलं. आणि त्याला ठोस कारणही होतं. एकतर तिचं वजन तेंव्हादेखील व्यवस्थित वाढत होतं. तिचे वजन व उंची नॉर्मल रेंजमध्ये आहे, हे मी तुम्हाला सांगत होते. तिच्या वजन आणि उंचीच्या आलेखावर (growth charts) मी तुम्हांला प्रत्येक वेळेला ते दाखवतही होते. वजन वाढण्यासाठी तिला कुठल्याही औषधाची गरज नाही असेही मी तुम्हाला सांगत आले होते. शिवाय, अशा औषधांचे काही विपरीत परिणामही (side effects) असू शकतात, हे माहिती असल्यामुळे मी स्वतः ती औषधे माझ्या पेशंट्ससाठी कधीच वापरतच नाही."

"हो. डॉक्टर. तुम्ही प्रत्येक वेळी निक्षून सांगत होता. पण आमचंच जरा चुकलं" 

"बरं. पण आता त्याचं काय? आता तिला काय होतंय?" 

"सांगते डॉक्टर. वैष्णवी बारकुडीच होती,आणि तुम्ही तर वजन वाढवण्याच्या औषधांची गरजच नाही असाच सल्ला देत होतात. मात्र, आमचे नातेवाईक, शेजार-पाजारचे, येणारे-जाणारे, सारखे आम्हाला म्हणायचे, 'तुमची वैष्णवी खूपच अशक्त आहे. तिचे वजन वाढण्यासाठी तिला काहीतरी टॉनिक देत जा'. सतत सगळ्यांनी असं  सांगितल्यामुळे आम्हालाही वाटलं की दुसऱ्या कोणाचं तरी औषध करावं. माझ्या शेजारपाजारच्या बायकांनी पुण्याजवळच्या एका वैद्यकीय केंद्राच्या मुख्य डॉक्टरांचे नाव सांगितले. त्या डॉक्टरांची औषधे खूप गुणकारी आहेत असेही त्यांनी संगितले. मग मलाही वाटलं की आपण त्यांचं औषध करून बघावं"

"मग? दिलंत का त्यांचं औषध?"

"हो ना. गेले वर्षभर वैष्णवीला त्यांचेच औषध चालू होते."

"बरं. मग?" 

"आम्ही ज्या डॉक्टरांचे नाव ऐकून गेलो होतो ते स्वतः कधी भेटलेच नाहीत. त्या दवाखान्यात काम करणाऱ्या एका डॉक्टरांनी वैष्णवीला तपासले, नाडीपरीक्षा केली, आणि एक महिन्याच्या औषधाच्या पुड्या दिल्या. एक वर्षभर, रोज एक पुडी न चुकता घ्यायची, असे त्यांनी आम्हाला बजावून सांगितले. एकेक महिन्याच्या पुड्या आम्ही तीन-तीन हजार रुपयांना विकत घ्यायचो. न चुकता, आम्ही ती रोजची एक पुडी वैष्णवीला वर्षभर देत राहिलो. ते औषध चालू केल्यावर वैष्णवी भरपूर जेवू-खाऊ लागली आणि तिचे वजनही वाढायला लागले."

"वजन वाढलं असेल तर ठीक आहे. पण प्रॉब्लेम काय झाला? माझ्याकडे का आला आहात?" 

वैष्णवीची आई मूळ मुद्द्याकडे येत नसल्याने आता माझा संयम संपत चालला होता. 

"सांगते ना. मागच्या दोन-एक महिन्यात मला जरा काळजी वाटायला लागली. मला काहीतरी वेगळंच वाटायला लागलं." असं म्हणत पुन्हा त्या बाईंना रडू यायला लागले. 

"अहो रडू नका. शांत व्हा बरं, आणि तिला काय झालंय ते मला नीट सांगा"

"वेगळं म्हणजे... अहो डॉक्टर, ती अजून आठ वर्षांचीही झालेली नाही. पण आत्ताच केवढी मोठी दिसायला लागली आहे. तिची छाती भराभर वाढतेय. काखेत केस यायला सुरुवात झाली आहे. तिला दोन-चार महिन्यातच पाळी येईल की काय, अशी मला भीती वाटतेय."

"अरे बापरे! पण मग तुम्ही ज्यांच्याकडून औषध घेत होतात त्यांना हे सांगितलंय का?'

"हो, डॉक्टर. खरंतर आम्ही आत्ता त्यांच्याकडेच गेलो होतो. तिथून डायरेक्ट तुमच्याकडेच येतोय." 

"बरं. मग त्यांचा सल्ला काय आहे?" 

"डॉक्टर, आम्ही नुसती शंका त्यांना बोलून दाखवली की, 'तुमच्या औषधांमुळे तर असं होत नसेल ना? तर त्यांनी एकदम आरडा-ओरडाच सुरु केला. आम्हाला काय वाट्टेल ते बोलून अक्षरशः तिथून हाकलून लावले."

"आता ते जाऊ द्या. मला आधी एक सांगा की त्यांच्या पुडीतल्या औषधांव्यतिरिक्त गेल्या वर्षभरांत तुम्ही वैष्णवीला इतर काही औषधे देत होतात का? "

"नाही. त्या डॉक्टरांनी आम्हाला बजावून सांगितले होते की, इतर कुठल्याही पॅथीची कुठलीही औषधे घ्यायची नाहीत,त्यांनी दिलेली रोजची पुडी कुठल्याही परिस्थितीत चुकवायची नाही आणि सांगितलेले कडक पथ्य पाळायचे. आम्ही पण त्यांचे म्हणणे तंतोतंत पाळले."  

"बरं. मी आधी वैष्णवीला तपासते आणि तुम्हाला आलेली शंका खरी आहे की नाही याची खात्री करून घेते." असे म्हणून मी वैष्णवीला तपासणीसाठी आत बोलावले. 

दुर्दैवाने, तिची आई म्हणत होती ते खरेच होते. वैष्णवीच्या स्तनांची वाढ, आणि तिच्या काखेत व गुप्तांगावर आलेल्या केसांची वाढ बघता (Sexual Maturity Rating), लवकरच वैष्णवीला पाळी येणार, याची मला खात्री पटली. चेहऱ्यावर अगदी निरागस, बालसुलभ भाव असलेल्या वैष्णवीची ती अवस्था बघून मलाही गलबलून आले.

मी वैष्णवीला बाहेर वेटिंग रूममध्ये बसून पुस्तक वाचायला सांगितले. ती बाहेर गेल्यानंतर, अगदी शांत आवाजात, मी वैष्णवीच्या आई-वडिलांना समजावून सांगितले, 

"हे पहा, ही Precocious Puberty, किंवा अकाली पौगंडावस्थेची केस आहे. आपल्याला वैष्णवीच्या काही तपासण्या करून, ती या अवस्थेच्या नेमक्या कुठल्या स्टेजला आहे हे बघावे लागेल. त्याचप्रमाणे, असे कशामुळे झाले असेल, याचाही शोध आपल्याला घ्यावा लागेल. अशा केसेसमध्ये बरेचदा काही कारण सापडत नाही. पण कधीकधी मेंदूत किंवा शरीरात इतरत्र होणाऱ्या गाठीमुळे (tumor) असे होऊ शकते. तसे काही निघालेच, तर त्या गाठीचा इलाज करावा लागतो. शरीरातील ग्रंथींच्या तज्ज्ञांच्या, म्हणजेच Paediatric Endocrinologist च्या सल्ल्याप्रमाणेच पुढील तपासण्या आणि उपचार तुम्ही घेतले तर जास्त योग्य होईल. मात्र, हे सगळे तातडीने करावे लागेल. मी तुम्हाला तशी चिठ्ठी लिहून देते". 

त्यांना मी पुण्यातल्या एका Paediatric Endocrinologist कडे जाण्याचा रेफरन्स लिहून दिला. त्या डॉक्टरांच्या सल्ल्याप्रमाणे, वैष्णवीच्या MRI, X-Ray आणि रक्ताच्या अनेक तपासण्या केल्या गेल्या. सुदैवाने, वैष्णवीच्या मेंदूत गाठ वगैरे काही निघाली नाही. पण तिला हे असे का झाले असावे, याचे कारणही सापडू शकले नाही. वैष्णवीला पाळी लवकर सुरु होऊ नये, यासाठी,  आठ ते दहा हजार रुपये किंमतीच्या एक विशिष्ठ औषधाचे इंजेक्शन, तिला  दर महिन्याला द्यायला सुरुवात केली. त्या नंतर, तिच्या स्तनांची व इतरही लैंगिक अवयवांची अवाजवी वाढ थांबली.  दर तीन-चार महिन्यांनी, पुढील उपचारांची दिशा ठरवण्यासाठी अनेक रक्त-तपासण्याही कराव्या लागल्या. वैष्णवी बारा वर्षांची झाल्यावर त्या डॉक्टरांनी ती इंजेक्शन्स बंद केली. त्यानंतर सात-आठ महिन्यांत वैष्णवीला मासिक पाळी सुरु झाली. 

त्या सर्व दिव्यातून पार पडल्यानंतर प्रथमच, वैष्णवीच्या पालकांनी काही दिवसांपूर्वी तिला माझ्याकडे काही किरकोळ कारणासाठी आणले होते.

आता जवळजवळ चौदा वर्षांची होत आलेली वैष्णवी अगदी छान उंच झालेली दिसत होती. वैष्णवीची तपासणी झाल्यावर, तिच्या आईने जाता-जाता मला एक प्रश्न केला, "मॅडम, मागे जो प्रकार घडला तो सगळा त्या पुडयांमधल्या औषधांमुळेच  झाला असेल ना? "

"मी तसे खात्रीशीरपणे म्हणू शकणार नाही. त्या पुड्यांमध्ये जे औषध होते त्याचे रासायनिक पृथःकरण जर तुम्ही करून घेतले असते तर तुमच्या प्रश्नाचे उत्तर कदाचित तुम्हाला मिळाले असते."  असे उत्तर मी दिले.  

त्यावर वैष्णवीच्या आई अतिशय पोटतिडिकीने म्हणाल्या, "आम्ही शेवटचे जेंव्हा त्यांच्याकडे गेलो होतो तेंव्हा, त्या महिन्याच्या आमच्या पुड्याही संपलेल्या होत्या. गेल्या-गेल्या आम्ही त्यांना विचारले की, 'तुम्ही देत असलेल्या औषधांमुळे हे असे शारीरिक बदल होत आहेत का?' त्या प्रश्नावर ते काहीतरी सारवासारवीची उत्तरे देऊ लागले. पण तो प्रश्न आम्ही आधी विचारला हीच आमची चूक झाली. कारण, जसे नंतर आम्ही त्यांना म्हटले की, 'वैष्णवीला तुम्ही देत होतात त्या औषधाच्या पुड्या संपल्या आहेत. आता आम्हाला आणखी हव्यात'. तशी त्यांना शंका आली असावी, की आम्ही त्यांची तक्रार करू, किंवा त्यांना कोर्टात खेचू. त्यानंतर मात्र ते आमच्यावर कमालीचे भडकले आणि त्यांचा आरडा-ओरडा सुरु झाला. 'आमची औषधे आम्ही नैसर्गिक वनौषधींपासून तयार करतो. आमच्या औषधांचे काहीही साईड इफेक्ट्स असूच शकत नाहीत. तुमचा विश्वास नाही, तर आमच्याकडे येताच कशाला?' असे म्हणून, त्यांनी आम्हाला तेथून चक्क हाकलूनच लावले. खरंतर मला त्यांचा खूप राग आला होता पण आम्ही मुकाट्याने तिथून निघून आलो."

"त्या पुड्यांपायी आम्ही वर्षभरात ३५-४० हजार खर्च केलेच होते. त्यानंतर, वैष्णवीचे झालेले नुकसान भरून काढता-काढता अक्षरशः आमच्या नाकी नऊ आले. गेल्या चार वर्षांत दिलेली इंजेक्शन्स आणि केलेल्या सर्व टेस्ट्स यांवर आमचे आणखी चार-पाच लाख रुपये खर्च झाले. आजदेखील माझा अगदी संताप-संताप होतो. असं वाटतं की, या फसव्या लोकांना शिक्षा व्हायला हवी. पण, त्या पुडीतल्या औषधाचे नाव आम्हाला माहिती नाही, आणि आमच्याकडे त्या औषधाचा नमुनाही नाही. त्यामुळे त्यांच्याविरुद्ध आमच्याकडे काही पुरावाच नाही. आणि जरी काही पुरावा आमच्याकडे असता तरी, वैष्णवीच्या ट्रीटमेंटचा खर्च केल्यानंतर परत कोर्टाचा खर्च करण्याची आर्थिक ताकदच आमच्यात उरली नसती. त्यामुळे आमचा राग गिळून टाकून, आम्ही कसेबसे स्वतःच्या मनाचे 'आत्मसंतुलन' बिघडू नये, एव्हढाच प्रयत्न करत राहतो." 

वैष्णवीच्या आईचा होणारा तळतळाट मला कळत असला तरीही वैद्यकीय व्यवसायाच्या नीतिमत्तेनुसार (Medical  Ethics) इतर कोणा वैद्यकीय व्यवसायिकांबाबत मी काहीही बोलणे उचित नव्हते.  

एलोपॅथी व्यावसायिकांना  ऍलोपॅथीच्या औषधांचे परिणाम (Effects), दुष्परिणाम (side effets) आणि अगदी टोकाचे दुष्परिणाम (adverse effects) याबाबत माहिती असते. त्या माहितीवर आधारित, कुठले औषध कुठल्या व्याधींसाठी, किती प्रमाणात आणि किती काळ वापरायचे, हेदेखील त्यांना कळते. तसेच, त्या औषधांचे दुष्परिणाम आणि अगदी टोकाचे दुष्परिणाम या बाबतची माहिती सर्वांसाठी खुली असते आणि सहजी मिळू शकते. त्यामुळे, इच्छुक पेशन्ट्स त्याबाबत ऍलोपॅथी व्यावसायिकांना जाब विचारू शकतात. आणि तो त्यांचा हक्क आहे.


दुर्दैवाने, ऍलोपॅथीच्या औषधांच्या उपयुक्ततेबाबत फारसे बोलले जात नाही. मात्र, त्यांच्या दुष्परिणामांची चर्चाच समाजात सातत्याने होत असते. वैष्णवीच्या केसच्या अनुभवानंतर, माझ्या पेशंट्सच्या पालकांना मी काही गोष्टी नीट समजावून सांगते, "तुम्ही ऍलोपॅथी सोडून इतर कुठल्याही पॅथीचे औषध तुमच्या मुलांना देणार असाल तर त्या औषधांची लेखी चिट्ठी अवश्य घेत जा. त्या औषधाचे नाव काय आहे, त्यात काय घटक वापरले आहेत, हे जाणून घेणे आवश्यक आहे आणि तो तुमचा हक्कही आहे. तसेच त्या औषधाचे तुमच्या मुलांच्या शरीरावर काही दुष्परिणाम तर होत नाहीत ना, याबाबत जागरूक राहा. तसे काही दिसून आल्यास संबंधित वैद्यकीय व्यावसायिकाला त्यासंबंधी विचारणा करणे हाही तुमचा हक्कच आहे. ऍलोपॅथी सोडून इतर पॅथीच्या औषधांचे दुष्परिणाम (side effects)  नसतात, असा अंधविश्वास ठेऊ नका. कोणत्याही पॅथीची औषधे घेणार असाल तरी ती डोळसपणे घ्या, इतकेच."

एलोपॅथीप्रमाणेच इतर पॅथींमध्येही अनेक गुणकारी औषधे असतील. मात्र विज्ञानाधिष्ठित चाचण्यांद्वारे ते सिद्ध होणे  आवश्यक आहे. त्या कठोर चाचण्यांना सामोरे जाण्याची मानसिकता सर्वच पॅथीच्या डॉक्टरांमध्ये असायला हवी. तसेच, एखाद्या औषधाचे दुष्परिणाम (side effects) किंवा अगदी टोकाचे दुष्परिणाम (adverse effects) दिसून आल्यास, ते मान्य करण्याचा मोकळेपणादेखील हवा. एखाद्या गुणकारी औषधाच्या परिणामापेक्षा त्याचे  टोकाचे दुष्परिणामच  (adverse effects) जास्त असतील तर, त्या औषधाच्या वापरावर कायद्याने बंदी यायला हवी. 

या लेखमालेतील आधीचे लेख खालील लिंक्सवर वाचावेत.  

Be Open ! 

रामदेव?.....जाना देव!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा