गुरुवार, ९ जानेवारी, २०२५

आरोग्याची शिदोरी!

माझ्या रोज सकाळच्या फेरफटक्याच्या वाटेवर एके ठिकाणी, पोहे, उपमा, साबुदाणा खिचडी, इडली-वडा, ब्रेड पकोडे, मॅगी, आप्पे, भजी आणि चहा-कॉफी  वगैरे विकणाऱ्या चार-सहा गाड्या मला दिसतात. त्या  विक्रेत्यांकडे केक, बिस्किटे, क्रीमरोल्स, डोनट्स असे पदार्थही विकायला असतात.  एके दिवशी माझ्यासमोरच एक सुशिक्षित आणि चांगल्या घरातील वाटणारी बाई दुचाकीवरून आपल्या शाळकरी मुलीला घेऊन त्यातल्या एका गाडीजवळ थांबली. तिने मुलीच्या दप्तरातून दोन रिकामे डबे काढले आणि त्या खाद्यपदार्थ विक्रेत्याकडे दिले. एका डब्यात केक आणि क्रीमरोल व दुसऱ्या डब्यामध्ये साबुदाणा वडा घेऊन, त्या बाईने ते डबे आपल्या मुलीच्या दप्तरात घातले. गाडीवाल्याला पैसे देऊन, ती बाई  फर्र्कन  मुलीच्या शाळेच्या दिशेने निघून गेली. असे दृश्य मला हल्ली वरचेवर दिसायला लागले आहे. शालेय मुलांना घरचे ताजे आणि सात्विक अन्न न देता बाहेरचे उघड्यावरचे अन्न देणाऱ्या आयांचे प्रमाण हल्ली फारच वाढले आहे.  

आमच्या लहानपणी आम्ही छोट्या सुट्टीसाठी एक आणि मोठ्या सुट्टीसाठी दुसरा असे दोन डबे घेऊन शाळेत  जायचो. झाडाखाली कोंडाळे करून  एकमेकींच्या डब्यातले पदार्थ चाखत, हसत-खेळत आम्ही  वर्गमैत्रिणी डबे खायचो. त्याकाळी सर्वसाधारणपणे सगळ्यांच्याच डब्यांमधे  घरी केलेली पोळी-भाकरी व भाजी/चटणी/ लोणचे असायचे. जरा लाडावलेल्या मुलांच्या किंवा श्रीमंत घरच्या मुलांच्या डब्यामधे तूप-साखर-पोळी किंवा तूप-गूळ-पोळी असायची. डब्यामधे काय आणायचे याबाबत आमच्या शाळेमधे तरी काही नियम नव्हते. माझा मोठा भाऊ जयंत चौथीपर्यंत सोलापुरातल्या, अवंतिकाबाई केळकरांच्या 'बालविकास' शाळेमधे जायचा. त्या शाळेत मात्र, सर्व विद्यार्थ्यांनी डब्यांमधे पोळी-भाजीच आणली पाहिजे असा कडक नियम  होता. एकदा माझ्या आईने जयंताला  डब्यामधे 'वरणफळं' दिली होती. "बाई, जयंताने डब्यात पोळी-भाजी आणलेली नाही" अशी तक्रार इतर मुलांनी  केळकरबाईंकडे केली. पण  'वरणफळं' म्हणजे पोळी-वरणाचा प्रकार असल्याने बाईंनी ती तक्रार ऐकून घेतली नाही. एकूण काय तर, त्या काळी घरी केलेले साधे, सकस आणि ताजे पदार्थ मुलाच्या डब्यात देण्याचीच पद्धत होती.  

गेल्या वर्षी, जुलैचा महिनाभर आम्ही ऑस्ट्रेलियामध्ये आमच्या मुलीच्या घरी गेलो होतो. आमची पाच वर्षाची नात, सोमवार ते शुक्रवार सकाळी नऊ ते दुपारी तीन वाजेपर्यंत शाळेत जाते. नातीचे शाळेचे डबे, पाण्याची बाटली, आणि त्या दोघांचे चे स्वतःचे जेवणाचे डबे  भरण्यासाठी  मुलीची आणि जावयाची सकाळी लगबग चालू व्हायची. नातीचा डबा भरताना काही मार्गदर्शक तत्वे किंवा Guidelines मात्र पाळल्या जायच्या. घरातल्या फ्रिजवर ऑस्ट्रेलियन सरकारने तयार केलेला एक मार्गदर्शक तक्ता (आकृती क्रमांक-१) लावलेला होता. शाळेच्या डब्यामधे आरोग्यपूर्ण आहार कसा द्यावा, हे त्यामध्ये दाखवलेले होते. तो तक्ता मला फारच आवडला. मी एक बालरोगतज्ज्ञ आहे. बालकांना काय आहार द्यावा याबाबत त्यांच्या पालकांचे समुपदेशन मी नेहमी करते.  आहारामधे ताजी फळे-भाज्या, प्रथिने भरपूर असावीत हे मी त्यांना सांगत असते. पण प्रत्यक्षात मुलांना संतुलित आहार कसा द्यावा हे चित्ररूपाने  सांगण्याची कल्पना मला खूपच आवडली.  

मुलांना संतुलित आहार देण्यासंबंधीचा मार्गदर्शक तक्ता (आकृती क्रमांक-१) 

नातीला शाळेच्या डब्यामधे एकूण तीन प्रकारचे पदार्थ द्यावे लागत - एक फळाचा डबा , एक स्नॅक्सचा किंवा चमचमीत खाण्याचा डबा आणि एक जेवणाचा डबा. डब्यात रोज एक फळ नेणे आवश्यक होते.  नातीने न खाल्लेले किंवा अर्धवट खाल्लेले फळ डब्यामधून एकदाही परत आणले नाही, हे बघून मला जरा कुतूहल वाटले. नातीशी झालेल्या गप्पांमधून कळले की पहिल्या छोट्या सुट्टीमधे सगळ्या मुलांना आधी आपापल्या डब्यातले फळ संपवावे लागते. प्रत्येक विद्यार्थ्याने फळ खाऊन संपवले आहे की नाही हे वर्गशिक्षिका बघतात. त्यानंतरच मुलांना स्नॅक्स खायची परवानगी मिळते. शाळेच्या शिस्तीमधे सर्व मुलांना सारखेच नियम लागू असल्यामुळे आपोआपच सगळी मुले ताजी फळे खायला शिकतात, हे विशेष.

शाळांमधल्या कॅन्टीनमध्ये काय विकले जावे आणि काय विकले जाऊ नये याबाबतही ऑस्ट्रेलियन सरकारने  काही  मार्गदर्शक सूचना शाळांना दिलेल्या आहेत. त्यामध्ये स्वच्छता, सकस आणि ताजे अन्न विक्री अशा अनेक बाबींचा विचार केलेला आहे. लहान मुलांना स्थूलत्व येऊ नये या हेतूने दिल्या गेलेल्या अनेक सूचनांचे शाळांमध्ये काटेकोरपणे पालन होते. स्थूलत्व हा कुपोषणाचा एक प्रकार आहे. आज संपूर्ण जगभरातील अनेक देशांमधे स्थूलत्व ही मोठीच आरोग्य समस्या आहे. प्रौढावस्थेमधे भेडसावणाऱ्या स्थूलत्वाची सुरुवात बालपणीच होत असते. लहानपणापासून आरोग्यपूर्ण आहाराच्या सवयी लावणे, आणि त्यायोगे लहान मुलांमधील स्थूलत्व रोखणे, हे प्रौढपणीच्या स्थूलत्वाला आळा घालण्याच्या दृष्टीने अत्यावश्यक प्रतिबंधात्मक पाऊल आहे. ऑस्ट्रेलियात संपूर्ण देशपातळीवर संतुलित आहाराचे महत्व शालेय मुलांच्या मनावर  बिंबवले जाते हे अतिशय कौतुकास्पद आणि अनुकरणीय आहे. Preventive  and Social Medicine  हा एक विषय वैद्यकीय अभ्यासक्रमात असतो. समाजाचे स्वास्थ्य बिघडू नये यासाठी वेगवेगळ्या पातळ्यांवर (आकृती-क्रमांक-२) रोगप्रतिबंध कसा करावा हे त्यामध्ये शिकवले जाते. त्यापैकी Primordial prevention ही पहिली आणि अत्यंत महत्वाची पातळी आहे. शालेय मुलांना आहारबाबत योग्य शिक्षण देऊन आणि पालकांना आहाराबाबत मार्गदर्शक तक्ते पुरवून,  ऑस्ट्रेलियामध्ये  Primordial prevention  उत्तम प्रकारे साध्य केले जात आहे. 
 
Levels of prevention(आकृती-क्रमांक-२) 

आमच्या ऑस्ट्रेलियामधल्या वास्तव्याच्या काळात काही दिवस नातीच्या शाळेला सुट्टी होती. माझ्या मुलीला आणि जावयाला मात्र कामावर जावे लागत होते. सुट्टीच्या पहिल्याच दिवशी मी नातीला उसळ आणि गरम पोळी करून वाढली. फ्रिजमधे ठेवलेली, दह्यातली कोशिंबीर काढून मी तिला वाढणारच होते, पण त्याआधीच ती म्हणाली, "आज्जी, या जेवणात ग्लो-फूड (Glow food) नाहीये. मला काहीतरी ग्लो-फूड पण हवेय." मला तिचे बोलणे नीट समजले नाही असे मी म्हणताच तिने माझी शिकवणी घेतली. प्रत्येक जेवणामधे, गो-फूड (Go food) म्हणजे धान्यापासून बनलेले शरीराला ऊर्जा देणारे पदार्थ, ग्रो-फूड (Grow food) म्हणजे हाडा-मासाची  वाढ करणारे प्रथिनयुक्त  पदार्थ, आणि ग्लो-फूड (glow food) म्हणजे आवश्यक जीवनसत्वे आणि खनिजे देऊन कांती उजळवणारे पदार्थ हवेत (आकृती-क्रमांक-३). शाळेत शिक्षकांकडून मिळालेली ही शिकवण , तिच्या मनात रुजलेली दिसली. तिचे बोलणे ऐकेल्यानंतर मी फ्रिजमधली कोशिंबीर काढून तिला दिली. 'ग्लो फूड' मिळताच नातबाईंच्या चेहऱ्यावर 'ग्लो' आला! 
   

आरोग्ययपूर्ण आहारासंबंधीच्या सूचना (
आकृती-क्रमांक-३)

शाळेत डबा आणताना पर्यावरणाचेही आरोग्य सुरक्षित राहील, अशाप्रकारे खाद्यपदार्थ आणावेत, अशा सूचनाही मुलांना दिलेल्या होत्या. पर्यावरण स्वच्छ आणि सुरक्षित ठेवण्यामुळे आपले आरोग्य चांगले राहते, हा संदेशही कोवळ्या वयामधेच मुलांच्या मनावर तिथे बिंबवला जात आहे. ऑस्ट्रेलियामधून परत आल्यानंतर मी माझ्या बालरुग्णाच्या पालकांना आरोग्यपूर्ण आहाराबाबतचे तक्ते  दाखवून, संतुलित, ताजा आणि सकस आहार कसा द्यावा याबाबत प्रबोधन करू लागले. 

आज आपला देश दोन मुख्य प्रकारच्या कुपोषणाने ग्रस्त आहे. एक म्हणजे, अस्वास्थ्यकारक, असंतुलित व आवश्यकतेपेक्षा अधिक आहार घेणाऱ्या लोकांमध्ये येणारे स्थूलत्व; आणि दुसरे म्हणजे, पोषक आणि पुरेसा आहार न मिळाल्यामुळे काही लोकांचे होणारे कुपोषण. या दोन्ही समस्यांशी एकाचवेळी झुंजणाऱ्या आपल्या देशामधे, Go food, Grow food आणि Glow food यांचे योग्य महत्त्व मुलांच्या आणि पालकांच्या मनावर बिंबवण्याची गरज आहे.  कुपोषण-निवारणासाठी अभिनव मार्गांचा वापर करून सर्व पातळ्यांवर  प्रयत्न होऊ शकतात हे  माझ्या   नातीच्या शाळेतली 'आरोग्याची शिदोरी' मला सांगून गेली.      

रविवार, २९ डिसेंबर, २०२४

काय अधिक वाईट? अ‍ॅलोपॅथी की अ‍ॅपॅथी?

अ‍ॅलोपॅथी किंवा आधुनिक वैद्यकीय शास्त्र मुख्यत्वेकरून पाश्चात्य देशांमधे विकसित झाल्यामुळे या शास्त्राबद्दल भारतीयांच्या मनामधे अजूनही अढी आहे. खूप लोक असा आरडाओरडा करत असतात की अ‍ॅलोपॅथीचे डॉक्टर्स अनावश्यक तपासण्या करायला सांगतात व अनेक दुष्परिणाम असलेली औषधे देतात. अ‍ॅलोपॅथीक व्यावसायिकांनी केलेल्या औषधयोजनेबाबत अनेक रुग्णांच्या मनात अविश्वास असतो. शिवाय, हल्ली बरेच लोक 'गूगल डॉक्टर्स' झालेले असतात. त्यामुळे, अमुक औषध का लिहिले आहे? त्याऐवजी तमुक औषध का नाही दिले? इतकाच डोस का दिला? आम्ही हे औषध पाच दिवसांच्या ऐवजी दोनच दिवस दिले तर काय बिघडेल? असल्या प्रश्नांच्या सरबत्तीलाही आम्हा अ‍ॅलोपॅथीच्या डॉक्टरांना तोंड द्यावे लागते.

प्राचीन काळच्या ग्रीक भाषेत 'Allos' म्हणजे 'विरुद्ध' आणि 'पॅथॉस' म्हणजे 'त्रास' किंवा 'आजार' असे शब्द रूढ होते. त्यातूनच, 'रोगाविरुद्ध औषधयोजना करणारी पॅथी' म्हणजे अ‍ॅलोपॅथी, असा शब्द वापरात आला. भारतीय समाजात असाही एक गैरसमज प्रचलित आहे की, आजाराचे किंवा रोगाचे मूळ न समजून घेता औषधयोजना करणारी पॅथी म्हणजे अ‍ॅलोपॅथी. तो गैरसमज पसरवण्यामधे इतर पॅथीच्या व्यावसायिकांसह अनेक सामान्यजन  हिरीरीने पुढे असतात. दुर्दैवाने, तो गैरसमज दूर करण्यासाठी अ‍ॅलोपॅथीचे बहुतांश डॉक्टर्स काहीच प्रयत्न करत नाहीत. किंबहुना, 'लोकांच्या मनात काही का समज-गैरसमज असेना, आपल्याला काही देणे घेणे नाही' अशी बेफिकीर वृत्ती त्यांच्यामधे दिसून येते. प्रत्यक्षात, अ‍ॅलोपॅथीच्या अभ्यासक्रमात काही विशिष्ट असे टप्पे विद्यार्थ्यांना शिकवले जातात. रोग्याला होणाऱ्या त्रासाचे नेमके तपशील जाणून घेणे (History taking), सखोल तपासणी करणे (examination),  चाचण्या करणे (Investigations), अंतिम रोगनिदान (final diagnosis) करणे व त्यावर आधारित औषधयोजना करणे (treatment) असे ते टप्पे आहेत. यापैकी, अंतिम रोगनिदान (final diagnosis) या टप्प्याला सगळ्यात जास्त महत्त्व आहे. 

अ‍ॅलोपॅथीव्यतिरिक्त, आयुर्वेद, युनानी, होमियोपॅथी, नेचरोपॅथी, सिद्ध, योग, सोवा रिग्पा असे इतर वैद्यकीय अभ्यासक्रमदेखील भारतात अस्तित्वात आहेत. या सर्व प्राचीन वैद्यक पद्धतींचे ज्ञान संशोधनाद्वारे अधिक प्रगत करण्याच्या व त्याचा प्रसार करण्याच्या उद्देशाने, केंद्र सरकारचा एक स्वतंत्र विभाग १९९५पासून कार्यरत होता. २०१४ साली त्याच विभागाचे रूपांतर आयुष मंत्रालयात करण्यात आले. परंतु, प्रत्यक्षांत मात्र 'आयुष' पद्धतींमध्ये मोडणारे बहुतांश वैद्यकीय व्यावसायिक अ‍ॅलोपॅथीचीच औषधे सरसकटपणे वापरताना आढळतात.   

अ‍ॅलोपॅथीमधील औषधयोजनेचे वेगवेगळे प्रकार आहेत. त्यापैकी एक म्हणजे symptomatic medicines, किंवा लक्षणांवर इलाज करणारी औषधे. उदाहरणार्थ, रुग्णाला कोणत्याही कारणाने ताप आल्यास, Antipyretic गटाच्या औषधांपैकी पॅरासिटॅमॉल हे औषध वापरले जाते. तसेच, वेगवेगळ्या रोगप्रतिबंधक लसीदेखील अ‍ॅलोपॅथीमधे वापरल्या जातात. त्याशिवाय, प्रतिजैविके, जीवनसत्वे, संप्रेरके, झटका येण्यावरची औषधे, नैराश्यावरची औषधे, रक्तदाब कमी करणारी औषधे, कर्करोगावरील औषधे, क्षयरोगासाठी औषधे, असे औषधांचे असंख्य प्रकार अ‍ॅलोपॅथीमध्ये आहेत. औषधांचा सुयोग्य वापर कसा करावा, हे अ‍ॅलोपॅथीच्या अभ्यासक्रमामधे फार चांगल्या पद्धतीने शिकवले जाते. प्रत्येक औषधाचा डोस किती द्यायचा, दिवसातून किती वेळा ते औषध द्यायचे, किती दिवस द्यायचे, तोंडावाटे द्यायचे का इंजेक्शनद्वारे द्यायचे, त्या औषधांचे नेमके परिणाम व दुष्परिणाम काय होऊ शकतात,  हे सर्व आम्हाला आमच्या अभ्यासक्रमाच्या दुसऱ्या वर्षात शिकवले जाते. अनेक औषधांचे पर्याय उपलब्ध असले तरीही अनावश्यक औषधे वापरू नयेत व आवश्यक औषधेदेखील जरुरीपुरती व माफक प्रमाणातच वापरावीत, हेच आमच्या शिक्षणाचे सार असते. MBBS व इंटर्नशिप संपेपर्यंत पुढील दोन-तीन वर्षे ही शिकवण आमच्याकडून घोटवून घेतली गेल्यामुळे ती पक्की व्हायला मदत होते. माझे गुरु, व सोलापूरच्या वाडिया हॉस्पिटलमधील सुप्रसिद्ध फिजिशियन, कै. डॉ. राम गोडबोले सर, आम्हा विद्यार्थ्यांना नेहमी सांगत, "औषधे लिहिणे कोणत्याही डॉक्टरला सहजी शक्य असते. परंतु, कमीतकमी औषधे वापरून रोग बरा करणे यातच तुमचे खरे कौशल्य आहे." माझ्या गुरूंची शिकवण माझ्या मनावर इतकी बिंबली आहे की, माझ्या बालरुग्णांच्या पालकांसोबतचा माझा पुष्कळसा वेळ, 'औषधे का घ्यायची नाहीत', याबाबतचे समुपदेशन करण्यात जातो. 

दुर्दैवाने, आज वैद्यकीय व्यवसायाचे बाजारीकरण झाले आहे, आणि ते होण्यामध्ये औषधकंपन्या, सरकार, वैद्यकीय व्यावसायिक आणि सामान्य जनता या सर्वांचा समान वाटा आहे. औषधकंपन्या भरमसाठ नफेखोरी करतात, डॉक्टर्सना अनेक प्रलोभने देऊन महागडी औषधे लिहायला उद्द्युक्त करतात, व काही औषधांच्या उपयुक्ततेबाबत खोटे संशोधन अहवालदेखील खुशाल प्रसिद्ध करतात. भारत सरकारने शैक्षणिक धोरणात केलेल्या बदलांमुळे वैद्यकीय शिक्षणाचे खाजगीकरण झाले आणि त्यामध्येही नफेखोरी बळावली. लाखो-करोडो रुपये भरून शिक्षण घेतलेले अनेक डॉक्टर्स, त्यांच्या शिक्षणासाठी मोजलेले पैसे वाट्टेल त्या मार्गाने रुग्णांकडून वसूल करायला मागे-पुढे बघत नाहीत. बाजारातल्या जीवघेण्या व्यावसायिक स्पर्धेमुळे जवळपास सर्वच डॉक्टर गैरमार्ग अवलंबू लागतात. अनेक डॉक्टर्स सर्रास 'कट-प्रॅक्टिस' करतात. अशा डॉक्टरांना, औषधविक्रेते, पॅथॉलॉजी लॅब, एक्स रे, सी.टी. स्कॅन, एम.आर.आय., इको, वगैरे तपासण्या करणारी डायग्नोस्टिक सेंटर्स, रुग्ण पाठवल्याबद्दल 'रेफरल फी' देणारी हॉस्पिटल्स, या सर्वांकडून राजरोसपणे ३० ते ४० टक्के 'कट' मिळतो. जनरल प्रॅक्टिशनरपासून ते सुपरस्पेशालिस्टपर्यंत सगळे या 'कट प्रॅक्टिस'च्या साखळीत ओवले जातात. सरकारी वैद्यकीय सेवांवर विश्वास नसल्याने, अनेक सामान्य नागरिक खाजगी डॉक्टर्सकडे जाणे पसंत करतात. त्यापैकी एखाद्या डॉक्टरने जर जेनेरिक औषधे लिहून दिली तर त्या औषधांवर बरेच रुग्ण विश्वास ठेवत नाहीत. कित्येकदा स्वतः रुग्णच डॉक्टरांकडून महागड्या औषधांची मागणी करतात. इतकेच नव्हे तर, जे डॉक्टर्स महागडी औषधे किंवा तपासण्या लिहून देत नाहीत अशा डॉक्टरांच्या दर्जाबाबतच अनेक रुग्ण शंका घेतात. बनावट औषधे, आरोग्यविमा अशा इतरही अनेक गोष्टी वैद्यकीय क्षेत्राच्या बाजारीकरणामधे समाविष्ट आहेत. सर्वच 'पॅथी'चे व्यवसायिक या बाजारीकरणात सामील असले तरी अ‍ॅलोपॅथीच्या व्यावसायिकांचेच नाव अधिक प्रमाणात बद्दू केले जाते हेही खरेच.  

पाच-सहा वर्षांपूर्वी एका आयुर्वेद डॉक्टरबाईंनी, एका व्यवसायामधे भागीदार होण्याची ऑफर मला दिली होती. त्या बाईंच्या ओळखीतल्या काही आयुर्वेदतज्ज्ञांची एक 'औषधकंपनी' होती. अ‍ॅलोपॅथीची जेनेरिक औषधे  स्वस्तात विकत घेऊन, त्यावर स्वतःचे लेबल लावून ती कंपनी भरमसाठ दराने बाजारात विकत होती! त्या कंपनीचीच औषधे लिहिण्यासाठी विविध आयुर्वेदतज्ज्ञांना उद्दयुक्त करणे, इतकेच त्या बाईंचे काम होते. त्यांनी गटवलेल्या आयुर्वेदतज्ज्ञांमुळे त्या कंपनीला मिळणाऱ्या नफ्याच्या प्रमाणात या बाईंना दरमहा लाखों रुपयांचे कमिशन मिळत होते. या साखळीतील आयुर्वेदतज्ज्ञांनाही, त्यांनी औषधकंपनीला मिळवून दिलेल्या नफ्याच्या प्रमाणात, सोन्याच्या नाण्यापासून अमेरिकावारीपर्यंत वेगवेगळी बक्षिसे दिली जात होती. त्या बोगस कंपनीला त्यांचा व्यवसाय अ‍ॅलोपॅथी व्यावसायिकांपर्यंत पोहोचवायचा असल्याने, 'मार्केटिंग'चे काम करण्यासाठी मी त्या कंपनीची भागीदार व्हावे अशी त्या बाईंची मला ऑफर होती. त्या आयुर्वेदाचार्य बाईंनी दिलेली ती 'लाखमोलाची' संधी मी अर्थातच धुडकावून लावली. 

गावोगावी अनेक बनावट वैद्यकीय व्यावसायिक (Quacks) आपापली 'दुकाने' थाटून बसलेले असतात. मनाला वाटेल ती अ‍ॅलोपॅथीची औषधे हे लोक लिहीत असतात. काही 'आयुष' डॉक्टर्सबद्दलही अशा धक्कादायक गोष्टी ऐकिवात आहेत. उदाहरणार्थ, अ‍ॅलोपॅथीची औषधे लिहिण्याची परवानगी आयुर्वेद डॉक्टर्सना आहे, पण युनानी आणि नेचरोपॅथी डॉक्टर्सना नाही. मग त्यापैकी काहीजण अ‍ॅलोपॅथीच्या गोळ्या कुटून आपल्या रुग्णांना पुडीत बांधून देतात. स्वतःला वैद्यकीय व्यावसायिक म्हणणाऱ्या एखाद्या व्यक्तीची नेमकी डिग्री काय आहे, किंबहुना त्याच्याजवळ काही डिग्री आहे की नाही, हेही न बघता, त्याने लिहून दिलेली अ‍ॅलोपॅथीची औषधे अनेकजण बिनदिक्कतपणे घेतात. गंमत म्हणजे, त्यातलेच काहीजण अ‍ॅलोपॅथीच्या औषधांना नावे ठेवण्यात मात्र पुढे असतात. कोणतेही वैद्यकीय शिक्षण न घेतलेले अनेक लोकदेखील अगदी अधिकारवाणीने अ‍ॅलोपॅथीच्या औषधांची माहिती सांगताना किंवा इतरांना औषधे सुचवताना आढळतात. अनेक घरांमधून विविध अ‍ॅलोपॅथिक औषधे ठेवलेली असतात, व त्यातली मनाला येईल ती औषधे घेतली जातात (SelfMedication). "पोट दुखण्यावरची गोळी द्या, जुलाबावरचे औषध द्या, झोपेची गोळी हवी आहे," अशा मागण्या केमिस्टच्या दुकानात सर्रास केल्या जातात. फार्मसीच्या अभ्यासक्रमाशी काहीही संबंध नसलेले दुकानातले नोकरदेखील 'मागणी तशी पुरवठा' या तत्वावर, त्यांना योग्य वाटतील ती अ‍ॅलोपॅथीची औषधे गिर्हाईकांना देतही असतात. 

'रुग्णांना अ‍ॅलोपॅथीची औषधे देण्यासाठी होमिओपॅथीच्या डॉक्टरांना परवानगी' या मथळ्याची बातमी कालच्या वर्तमानपत्रामध्ये वाचल्यानंतर मला एक घटना आठवली. पूर्वी एका व्हाट्सएप ग्रुपवर, कुठल्याश्या संदर्भात मी असे लिहिले होते की, "कोणत्याही पॅथीच्या औषधांचे थोडेफार दुष्परिणाम असतातच". ते वाचून होमिओपॅथीच्या एक डॉक्टरबाई माझ्यावर तुटून पडल्या होत्या. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे, अ‍ॅलोपॅथीच्या औषधांचे खूप 'साईड इफेक्टस' असतात, पण होमिओपॅथीची औषधे मात्र निर्धोक असतात. त्यांचे म्हणणे खरे असेल, किंवा नसेलही. पण मग, होमिओपॅथीचे व्यावसायिक अ‍ॅलोपॅथीची औषधे का लिहितात? होमिओपॅथीच्या डॉक्टर्सना अ‍ॅलोपॅथीची औषधे लिहण्याची कायदेशीर मुभा मिळावी यासाठी त्यांची प्रचंड धडपड का चालू आहे? हे प्रश्न माझ्या मनात आलेच. माझ्या प्रश्नांची उत्तरे देण्याचे त्या बाईंनी शिताफीने टाळले आणि इतकेच म्हणाल्या, की 'सर्टिफिकेट कोर्स इन मॉडर्न  फार्माकॉलॉजी' (CCMP ) हा महाराष्ट्र शासनमान्य अभ्रासक्रम पूर्ण केलेल्या होमिओपॅथी व्यावसायिकांना अ‍ॅलोपॅथीची औषधे लिहिण्याची कायदेशीर परवानगी आहे. म्हणजे, "अ‍ॅलोपॅथीच्या औषधांचे दुष्परिणाम होतात" असे एकीकडे म्हणायचे, अ‍ॅलोपॅथीची नाचक्की करायची, आणि दुसरीकडे अ‍ॅलोपॅथीची औषधे लिहायची कायदेशीर परवानगी मिळवण्यासाठी धडपडायचे, हा दुटप्पीपणा मला खटकला. रोग्यांमध्ये जी लक्षणे दिसत असतील, तीच लक्षणे निर्माण करणारी औषधयोजना करणे, म्हणजेच, “Like cures like” हे होमिओपॅथीचे पायाभूत तत्व आहे. असे असताना, होमिओपॅथीच्या डॉक्टर्सना त्यांच्या शिक्षणाच्या संपूर्णपणे विरुद्ध असलेली औषधयोजना करण्याची कायदेशीर परवानगी देणे, हा एक विनोदच म्हणावा लागेल. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठामार्फत हा कोर्स गेली काही वर्षे शिकवला जात आहे. परंतु, तो कोर्स पूर्ण न केलेले होमिओपॅथीचे अनेक डॉक्टर्सदेखील राजरोसपणे अ‍ॅलोपॅथीची औषधे लिहीत आहेत, तो भाग निराळा. 


रुग्णांचे यथायोग्य उपचार आणि सामान्यजनांचे परिपूर्ण स्वास्थ्य हेच देशाच्या आरोग्यसेवेचे ध्येय असावे यात दुमत नाही. अमुक 'पॅथी' चांगली किंवा तमुक 'पॅथी' वाईट, या वादात शक्यतो कोणीच पडू नये. परंतु, एक अ‍ॅलोपॅथी व्यावसायिक या नात्याने मला प्रकर्षाने असे जाणवते की, सामान्य नागरिकांपासून ते सरकारपर्यंत सर्वच स्तरांवर, आरोग्यविषयक अ‍ॅपॅथी (Apathy) किंवा जे औदासीन्य आज दिसते आहे ते अतिशय चिंताजनक आहे. 


सोमवार, १३ मे, २०२४

आरोग्यम धनसंपदा- भाग-१

'विज्ञानधारा' या मासिकाच्या मे महिन्याच्या अंकामध्ये प्रसिद्ध झालेला लेख. 

उत्तम आरोग्य ही आपल्या धनाइतकीच महत्वाची संपदा आहे, हे सर्वश्रुत आहे. कुठलेही कष्ट न करता, बसल्या ठिकाणी कोणालाही पैसे मिळत नाहीत. तसेच आरोग्य-संपदाही बसल्या जागी मिळत नाही. ती  मिळवण्यासाठी माणसाला धडपड करावीच लागते. 

समाजातल्या काही व्यक्ती गर्भश्रीमंत असतात. त्यामुळे त्यांना वडिलोपार्जित धनदौलत जन्मापासूनच उपलब्ध असते. असे असूनही, वारसाहक्काने आलेली संपत्ती टिकवण्यासाठी त्यांना काहीतरी काम-धंदा करावाच लागतो. तसे न केल्यास त्या संपत्तीचाही हळूहळू ऱ्हास होत जातो, हे आपल्याला माहीत आहे. तीच गोष्ट आरोग्य-संपदेच्या बाबतीतही लागू आहे. 

काही व्यक्ती जन्मतःच निरोगी, सदृढ जन्मतात. त्यांना ती 'आरोग्य-संपदा' त्यांच्या आई-वडिलांकडून म्हणा किंवा अनुवंशिकतेने मिळालेली असते. एखाद्या व्यक्तीमध्ये जन्मजात प्रबळ असलेल्या  प्रतिकार शक्तीला आधुनिक वैद्यकीय भाषेमधे Innate Immunity असे संबोधले जाते. पण अशा व्यक्तींमधेही  ती आरोग्य-संपदा जन्मभर टिकून राहू शकत नाही. त्या आरोग्यसंपत्तीचा ऱ्हास होऊ नये म्हणून त्या-त्या व्यक्तीला सतत प्रयत्नशील राहावेच लागते. त्याचप्रमाणे, आपल्यापैकी कित्येक जणांना अनुवंशिकतेने काही आजार येतात. त्यामध्ये मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग असे अनेक आजार सामील आहेत. पण अशा व्यक्तींनी योग्य काळजी घेतल्यास ते या आजारांना आपल्यापासून दूर ठेवू शकतात, हेही आपल्याला माहिती असले पाहिजे. 

आपल्या समाजामध्ये आरोग्याबाबत बरीच जागरूकता होणे आवश्यक आहे. एकंदरीत पुष्कळसे गैरसमज जनमानसामध्ये प्रचलित असल्याचे दिसून येते. एक विधान आपण सरसकट ऐकतो, "जुन्या पिढीतल्या लोकांचा आहार उत्तम होता, त्या वेळी भाजी-पाला-धान्य हे सगळे खाद्यपदार्थ रसायनमुक्त किंवा सेंद्रिय होते, आणि त्यामुळेच त्या पिढीतल्या लोकांची तब्येत उत्तम राहायची". मात्र, या विधानाची योग्यायोग्यता आपण शास्त्रीय निकषांवर तपासून पहिली तर समजेल की ते बहुतांशी गैरसमजुतीवर आधारित आहे. केवळ चांगल्या खाण्या-पिण्यावर जर आपले आरोग्य अवलंबून असते तर आपल्या आधीच्या पिढ्यांमधील सर्वच व्यक्ती दीर्घायुषी आणि निरोगी राहिल्या असत्या. पण तसे झालेले नाही. सध्या आपल्याला चांगले, रसायनमुक्त असे अन्नधान्य मिळत नाही, ही बाब खरी आहे. त्यामुळे, आपल्या पिढीतल्या बऱ्याच जणांना काही ठराविक आजार होणे अटळच आहे, असे आपण गृहीत धरून चालतो आणि मनोमन हार मानतो. पण ही समजूतदेखील चुकीची आहे. 

आरोग्याबाबत कोणकोणते समज-गैरसमज प्रचलित आहेत, सध्या आपल्यापुढे असलेल्या आरोग्यविषयक समस्या कोणत्या, आणि निरोगी राहण्यासाठी वैयक्तिक पातळीवर काय-काय करता येईल, या विषयांवर मी या लेखमालेद्वारे प्रकाश टाकणार आहे.

   

गेल्या काही वर्षांत भारतीयांचे सरासरी आयुर्मान किती होते, यावर जर आपण धावती नजर टाकली तर अगदी धक्कादायक आकडेवारी समोर येते. एकोणिसाव्या शतकाच्या सुरुवातीला भारतीयांचे सरासरी आयुर्मान जेमतेम २५ वर्षे होते. भारताला स्वातंत्र्य मिळाले त्या वर्षी, म्हणजे १९४७ साली भारतीयांचे सरासरी आयुर्मान जरासे वाढून ३१ वर्षे झालेले होते. साधारण १९८० च्या आसपास भारतीयांचे सरासरी आयुर्मान हे ५५ वर्षांच्या आसपास होते. तर आज, म्हणजे २०२४ साली भारतीयांचे सरासरी आयुर्मान ७० वर्षांपर्यंत पोहोचलेले आहे. "जुन्या पिढीतल्या लोकांचा आहार उत्तम असल्यामुळे त्या लोकांची तब्येत उत्तम राहायची", किंवा "जुनी माणसे सध्याच्या पिढीतील माणसांपेक्षा जास्त निरोगी जीवन जगत होती", ही विधाने  किती अयोग्य आहेत, हे या आकडेवारीवरून आपल्याला कळून येईल.  

भारताला स्वात्रंत्र्य मिळाले, तेंव्हा देशवासीयांच्या आरोग्याची स्थिती कशी होती? त्यामध्ये काय-काय सुधारणा होत गेल्या?  या अनुषंगाने थोडा अभ्यास केला तर आपल्याला अनेक गोष्टी उमगतील. पूर्वीच्या काळी, पाच वर्षांखालील मुलांचा मृत्युदर आजच्या तुलनेत अधिक होता. त्यातही विशेष करून नवजात शिशूंचा मृत्युदर खूपच जास्त होता. जन्मतः होणारे जंतुसंसर्ग, साथीचे रोग, मलेरिया, अतिसारामुळे शरीरातील पाणी कमी होणे (dehydration), कुपोषण, श्वासनलिका व फुफुसांचे रोग, इत्यादी आजारांमुळे अनेक मुलांना व तरुणांना जीव गमवावा लागे.

त्याकाळी बालविवाह प्रतिबंधक कायदा असूनदेखील बहुतांशी बालविवाहच होत असत. कुटुंब-नियोजनाची संकल्पना समाजामध्ये रुजली नसल्याने, अनेक अल्पवयीन मुली गरोदर राहत. संततिनियमनाबाबत उपाययोजना केल्या जात नसल्यामुळे दोन बाळंतपणामध्ये फारसे अंतर नसे. कोवळ्या वयाच्या मातांना वरचेवर मुले होत. ती अशक्त निपजत आणि माताही कुपोषित होत जात. त्यांना पुरेशा वैद्यकीय सोयीही उपलब्ध नसत. त्यांची वैद्यकीय तपासणी अथवा रक्त-लघवी तपासणी, रक्तदाब मोजणे अशा कुठल्याच तपासण्या सरसकट केल्या जात नसत. गर्भारपणामधे महिलांना धनुर्वाताची इंजेक्शन्स मिळत नसत. अल्ट्रासाउंडची सोय तर त्या काळी उपलब्धच नव्हती.त्यामुळे प्रसुतीपूर्व अचूक रोगनिदानहोत नसे. बरीचशी बाळंतपणे घरच्याघरीच करण्याची पद्धत होती. ती बाळंतपणे करणाऱ्या सुईणी अशिक्षित-किंवा अर्धशिक्षित असत. त्यांना बाळंतपण करण्यासाठी कुठल्याही प्रकारचे प्रशिक्षण दिले गेलेले नसे. त्यामुळे अनेक स्त्रियांचा मृत्यू गर्भारपणात किंवा बाळंतपणामध्ये होई. बरेचदा बाळंतपणाच्या दरम्यान बालके गुदमरून मृत्युमुखी पडत. धनुर्वात, घटसर्प, डांग्या खोकला, गोवर अशा आजारांना प्रतिबंध करण्यासाठी लहान मुलांचे लसीकरण करण्याचा कार्यक्रम राबवला जात नसे. परिणामतः, अशा आजारांमुळेही अनेक बालके मृत्युमुखी पडत.  

गेल्या शंभर वर्षांमधे वैद्यकीय शास्त्रामध्ये अनेक नवनवीन शोध लागले. त्यामुळे वैद्यकीय संकल्पना बदलत गेल्या. एक अगदी गंमतीदार उदाहरण सांगायचे झाले तर मलेरियाचे सांगता येईल. जवळपास १९व्या शतकाच्या शेवटपर्यंत मलेरियाचा आजार दूषित हवेमुळे पसरतो असा समज होता. त्यामुळेच, या आजाराला Mal'aria ( दूषित हवा)  असे नाव पडले होते. अनेक वर्षे मलेरियावर नियंत्रण मिळवणे शक्य होत नव्हते. ब्रिटिश अधिपत्याखाली असलेल्या भारतामध्ये रोनॉल्ड रॉस नावाचा ब्रिटिश आर्मीमधील डॉक्टर एकोणिसाव्या शतकाच्या अखेरच्या वर्षांत कार्यरत होता. मलेरियाचा प्रसार कसा होतो? हे शोधून काढण्याचा त्याने जणू ध्यासच घेतला होता. मलेरियाचा प्रसार हा दूषित हवेमुळे होत नसून तो ऍनॉफिलीस जातीच्या डासांच्या मादीकरवी होतो, असा शोध अथक प्रयत्नांती त्याने लावला. या शोधामुळेच विसाव्या शतकाच्या सुरुवातीला, १९०२ साली Physiology विषयातील नोबेल पुरस्कार देऊन त्याला सन्मानित करण्यात आले. रोनॉल्ड रॉसच्या शोधकार्यामुळे मलेरियाच्या आजारावरची औषधे, इतर उपाय,व आजार नियंत्रित करण्याच्या पद्धती, याबाबतचे संशोधन शक्य झाले. तसेच मलेरियाचा प्रतिबंध करणे आणि मलेरियामुळे मोठ्या प्रमाणावर होत असलेल्या मृत्यूचे प्रमाण कमी करणे शक्य झाले. मलेरियाबाबतचे इतके मोठे संशोधन मुख्यत्वे भारतभूमीवर झाले, ही बाब लक्षणीय आहे.

गेल्या शतकामधे आपल्या देशात अतिसार किंवा उलट्या-जुलाब होऊन मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या कमालीची जास्त होती. पूर्वीच्या काळी उलट्या-जुलाब होत असलेल्या रुग्णांना तोंडावाटे अन्न आणि पाणी न देण्याची अथवा 'लंघन' करवण्याची एक चुकीची पद्धत रूढ होती. त्यामुळे कित्येक रुग्ण शरीरातले पाणी कमी होऊन मृत्यमुखी पडत. काही रुग्ण कुपोषित होऊन अशक्त होत. अशक्तपणामुळे पुन्हा-पुन्हा आजारी पडत. दूषित पाण्यातून किंवा अन्नामधून कॉलरा वा इतर प्रकारच्या गॅस्ट्रोची लागण सरसकटपणे होत असे. अशा संसर्गजन्य रोगांची साथ झपाट्याने आसपासच्या परिसरात पसरून, एकाच वेळी आसपासच्या चार-सहा खेडयांमधल्या सर्व गावकऱ्यांना लागण  होत असे. 

कॉलरावर लागू पडू शकणाऱ्या औषधांचा त्या काळी अभाव होता. तसेच, डॉक्टर्स आणि परिचारिकांची संख्याही कमी होती. सामान्यतः गॅस्ट्रोच्या रुग्णांना दिवसातून अनेकदा मोठमोठया जुलाब-उलट्या होतात. एका वेळेस जवळपास पाव ते अर्धा बादली जुलाब अथवा उलटी होते व दिवसभरात सतत उलट्या-जुलाब होत राहतात. त्यामुळे अशा रुग्णाच्या शरीरामध्ये शुष्कता येते. अशावेळी त्या रुग्णांना सलाईन चढवणे अत्यावश्यक असते. पण अशा अशक्त रुग्णांची शीर सापडणेच दुरापास्त होऊन बसते. 

अशा सर्वच समस्यांमुळे पूर्वीच्या काळी कॉलराच्या साथीत शेकडो लोक पटापट मृत्युमुखी पडत असत. म्हणूनच कॉलरा या रोगाला 'पटकी' असे नाव दिले गेले होते. 

या समस्यांवर उपाय म्हणून तोंडावाटे ग्लुकोजमिश्रित सलाईन देऊन रुग्णाचे जीव वाचवता येतील का? असा विचार शास्त्रज्ञांनी सुरु केला. अमेरिकन आर्मीमधील डॉक्टर फिलिप्स यांनी सर्वप्रथम १९६४ साली, तोंडावाटे जलसंजीवनी देऊन दोन रुग्णाचे प्राण वाचवले. त्यानंतर ढाका येथील कॉलरा संशोधन प्रयोगशाळा आणि कोलकातामधील  संसर्गजन्य रोगांसाठीच्या रुग्णालयामधे महत्वाचे संशोधन झाले. तेथे कार्यरत असलेल्या डॉक्टरांनी जलसंजीवनीतील क्षार आणि साखर या घटकांचे प्रमाण ठरवण्यासाठी मोठे योगदान दिले. १९७१ मध्ये बांगला देशाच्या स्वातंत्र्यासाठी  मुक्तिवाहिनीचा लढा चालू होता. त्यावेळी, प्रसिद्ध बालरोगतज्ज्ञ डॉ. दिलीप महालनोबीस यांनी बंगाली निर्वासितांच्या छावणीमधे पसरलेल्या कॉलरासाथीचे नियंत्रण यशस्वीपणे करून दाखवले. त्यांनी रुग्णांना जलसंजीवनी दिल्यामुळे, त्या साथीत मृत्युमुखी पडणाऱ्या रुग्णाची संख्या बरीचशी आटोक्यात ठेवता आली. त्यांच्या या योगदानासाठी भारत सरकारने डॉ. महालनोबीस यांना मरणोपरांत 'पद्मविभूषण' सन्मानाने गौरवले. जलसंजीवनीचा शोध, हा विसाव्या शतकातील सर्वात महत्त्वाचा शोध मानला जातो. आज जलसंजीवनी घरोघरी पोहोचल्यामुळे, गॅस्ट्रो झाल्यानंतर शरीरात येणारी शुष्कता किंवा dehydration होऊन मृत्यू होण्याचे प्रमाण नगण्य झाले आहे. 

विसाव्या शतकात आधुनिक वैद्यकीय शास्त्रामध्ये लागलेल्या अशा नवनवीन शोधांमुळे अनेक जुन्या वैद्यकीय संकल्पना बदलल्या आणि कित्येक संकल्पना नव्याने मांडल्या गेल्या. स्वच्छ पेयजलाची सोय, अन्नसुरक्षा व अन्नाची स्वच्छता, सार्वत्रिक मोफत लसीकरण, जलसंजीवनीचा योग्य वापर, साथीच्या रोगांचे निवारण, आणि वैद्यकीय सोयी-सुविधांची उपलब्धता, अशा अनेक  गोष्टींमुळे जगभरातल्या माणसांचे आयुर्मान वाढत गेले. गर्भवती माता आणि बालसंगोपनाबाबतच्या वैद्यकीय सोयी आणि सुविधा भारतामध्ये मोठ्या प्रमाणावर आणि मोफत उपलब्ध झाल्या. अशा प्रकारे सुधारत जाणाऱ्या परिस्थितीमुळेच आज २०२४ साली भारतीयांचे सरासरी आयुर्मान ७० वर्षांपर्यंत पोहोचलेले आहे. तरी अजूनही भारतीयांचे सरासरी आयुर्मान इतर अनेक देशांच्या तुलनेत बरेच कमी आहे. जपान, मोनॅको, सिंगापूर, हॉंगकॉंग, इटली, साऊथ कोरिया, स्वित्झर्लंड अशा अनेक देशातील नागरिकांचे सरासरी आयुर्मान जवळपास ८५ वर्षे आहे. पण पुढील काही वर्षांमध्ये आपल्या देशातील जनतेचे सरासरी आयुर्मान ८० वर्षांच्या वर जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 

देशातील नागरिकांचे सरासरी आयुर्मान वाढत असले तरीही त्याबरोबरच वैद्यकीय समस्याही वाढत जातात, हेही आपण लक्षात घेतले पाहिजे. विशेषतः ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्याच्या समस्या खूप मोठ्या प्रमाणामधे वाढत जातात. वैद्यकीय सोयी-सुविधासाठी लागणारा खर्च, औषधांचा खर्च, स्वास्थ्य विमा, जेष्ठ नागरिकांची राहण्याची व्यवस्था, वृद्धाश्रम, वैद्यकीय सहाय्यक, इत्यादी अनेक समस्या आजही आहेत. त्या समस्या कमी असाव्या असे वाटत असेल तर, देशातील नागरिकांचे सरासरी आयुर्मान वाढावे, आणि अधिकांश नागरिक निरोगी राहावेत, यावर विचार आणि त्यासाठी प्रयत्न होणे अत्यावश्यक आहे. सरकारी वैद्यकीय सेवांचा भर या गोष्टीवर काही प्रमाणात असतो. पण खाजगी क्षेत्रामधल्या वैद्यकीय व्यावसायिकांना त्यावर लक्ष द्यायला पुरेसा वेळ असतोच असे नाही. म्हणूनच, 'माझे आरोग्य ही माझी जबाबदारी आहे' असाच विचार आपल्यापैकी प्रत्येकाने केला पाहिजे. 'आयुष्याच्या अंतापर्यंत आपण निरोगी आणि सशक्त कसे राहू' याबाबतचा विचार वैयक्तिक पातळीवर होणे आवश्यक आहे.  

आरोग्य या शब्दाची व्याख्या आणि व्याप्ती आपण पुढील काही लेखांमधे समजावून घेणार आहोत. त्याचप्रमाणे, निरोगी कसे राहता येईल याबाबत चर्चा करणार आहोत. चुकीच्या जीवनशैलीमुळे होणाऱ्या आजारांविषयी तसेच असंसर्गजन्य आजारांविषयी माहिती घेऊन, ते आजार कसे टाळता येतील, हेही आपण पुढील लेखांमधून समजावून घेणार आहोत.   



रविवार, १२ मे, २०२४

मधुमेहींनो, आंबा खा.. पण जरा जपून!

'मधुमेहींनी आंबा खावा की न खावा?' या विषयावरचा एक लेख मी नुकताच माझ्या ब्लॉगवर प्रसिद्ध केला आणि  समाजमाध्यमांमध्येही प्रसृत केला होता. त्या लेखावर बऱ्याच उलट सुलट, आणि काही गमतीदार प्रतिक्रिया आल्या. त्या प्रतिक्रिया आणि त्यावरचे माझे विचार वाचकांपर्यत पोहोचवावेत असे मला वाटते. 



मधुमेहींनी दिवसभरात एखादा आंबा खायला हरकत नाही, असे त्या लेखामध्ये मी सांगितले आहे. त्याचबरोबर, शक्यतो तो आमरस-पोळी अशा स्वरूपात न खाता, दोन जेवणांच्या मधल्या वेळेत खावा असे सांगितले. रक्तातली साखर प्रमाणाबाहेर वाढू न देण्यासाठी मधुमेहींनी असे पथ्य पाळणे आवश्यक आहे, असे मी सुचवले होते . 

काही सुज्ञ आणि सजग मधुमेहींनी व इतर वाचकांनी मी लिहिलेली कारणमीमांसा समजून घेतली. 'दिवसभरामधे एखादा आंबा खायला हरकत नाही', हे वाचून काही मधुमेहींनी माझे आभारही मानले. तर, "आंब्याच्या दिवसांमध्ये, दिवसभरात आम्ही काय फक्त एकच आंबा खायचा का? हे असले काही आम्ही काही मानणार नाही", असे काही मधुमेहींनी अगदी स्पष्टपणे सांगितले. एका मित्राला तर माझा लेख वाचून फारच वाईट वाटले. त्याने लिहिलंय,

"मधुमेहींनी दिवसभरामधे एखादा आंबा खायला हरकत नसते, असे आधी कळले असते तर माझ्या दिवंगत वडिलांना आंबा खायला देता आला असता. मधुमेहींनी आंबा खायचाच नाही अशा समजुतीने, मधुमेहाचे निदान झाल्यावर आम्ही त्यांना कधीही आंबा खाऊच दिला नाही"

पुण्यातील सुप्रसिद्ध बालरोगतज्ज्ञ डॉ. राजीव जोशी हे स्वतः मधुमेहग्रस्त आहेत. माझा लेख वाचून त्यांनी मधुमेहींना मार्गदर्शक ठरावी अशी एक प्रतिक्रिया दिली आहे, ती  खालीलप्रमाणे: -

"छान माहितीपूर्ण लेख. डॉ. अभय बंग यांनी, "एक चमचा श्रीखंड खाऊन चव घ्या आणि मग एक चमचा श्रीखंड खाऊन थांबा", असे सांगितले आहे. एका बाजूने अर्धी फोड खाऊन चव घ्या आणि दुसर्‍या बाजूने उरलेली अर्थी फोड घेऊन थांबा...याप्रमाणे, मी एक फोड आंबा खाऊन थांबतो.. ग्लायसेमिक इंडेक्स आणि ग्लायसेमिक लोड यांचा हिशोब करत बसावा लागत नाही आणि दिवसात कितीही वेळा अशा पद्धतीने आंबा खाल्ला तरी रक्तशर्करा वाढत नाही..!!"

डॉक्टर राजीव जोशींचे म्हणणे खरे आहे. सतत ग्लायसेमिक इंडेक्स आणि ग्लायसेमिक लोडचा हिशोब करत जेवणखाण करणे, कोणालाही  शक्य नाही. त्यामुळे मधुमेहींनी आंबा किंवा कोणताही गोड पदार्थ समोर आल्यास, डॉक्टर राजीव जोशींचा सल्ला मानावा, हे योग्य! मधुमेही रुग्णांनी जर योग्य आहार घेतला, नियमित व्यायाम केला, वजन आणि ताणतणावावर नियंत्रण ठेवले तर आजार बळावत जात नाही, असेही  ते स्वानुभवावरून सांगतात.  

"मधुमेहींनी आंबा खाल्लेले चालते, असे असतानाही ऍलोपॅथिक डॉक्टर्स आम्हाला आंबा खायला उगाच का मनाई करतात?" असा रास्त प्रश्न अनेक मधुमेहींना पडला आणि त्यांनी त्याबाबत नाराजीही व्यक्त केली. 

या प्रश्नाचे उत्तर सोलापूरस्थित, प्रसिद्ध फिजिशियन डॉक्टर दिलीप आपटे सरांनी दिलेल्या प्रतिक्रियेमध्ये आहे. आपटे सर गेली तीस वर्षांहून अधिक काळ सोलापुरात वैद्यकीय व्यवसाय करतात. योग्य निदान आणि त्यानुसार कमीतकमी औषधयोजना करणारे डॉक्टर, अशी त्यांची ख्याती आहे. डॉक्टर दिलीप आपटे सरांनी दिलेले उत्तर अतिशय बोलके आणि समर्पक आहे. 

"सोलापुरातील लोकांचा असा युक्तिवाद आहे की आंबा वर्षातून एकदाच येतो म्हणून आपण तो खायलाच हवा. कितीही सांगितले तरी त्यांच्यामधे काहीही फरक पडत नाही. ते वर्षातले दोन महिने दररोज आंबा खातात. त्यातून सोलापुरात आमरसामधे साखर घालायची पद्धतही आहे. माझे अनेक मधुमेही रुग्ण, असा साखरमिश्रित आमरस अगदी मुक्तपणे खातात. भरपूर आमरस खाल्ल्यामुळे त्यांची भूकही वाढते, त्यामुळे त्या आमरसाबरोबर एक-दोन जास्तीच्या पोळ्या खाल्ल्या जातात. अशा रीतीने, त्यांच्या जेवणातल्या एकूण कॅलरीज भरपूर  वाढतात. तसेच उन्हाळ्याच्या काळात सोलापूरमधे तापमान फारच जास्त असल्यामुळे, लोक फारसा व्यायामही करत नाहीत, आणि जास्तीच्या खाण्यामुळे पोटामध्ये गेलेल्या जास्तीच्या कॅलरीज जाळल्याही जात नाहीत. या कारणामुळे, आंब्याच्या दिवसांमधे, माझ्याकडे येणाऱ्या बहुतेक मधुमेही रुग्णांची रक्तातील साखर वाढते. माझा वैयक्तिक अनुभव आहे की जूनमध्ये माझ्या बहुतेक मधुमेही रुग्णांची BSL वाढलेली असते आणि मला पुढील ३ महिन्यांसाठी त्यांची औषधे वाढवावी लागतात. या कारणामुळे मी वैयक्तिकरित्या त्यांना आंबा बंद करण्यास सांगतो किंवा फार-फारतर दिवसभरामध्ये एक-दोन फोडी खा असा सल्ला देतो."

इतर शहरातल्याही वैद्यकीय व्यावसायिकांना थोड्याफार फरकाने असाच अनुभव येत असावा. 

इथे एक मात्र म्हणावेसे वाटते. एखादा आंबा खाल्ल्यानंतर ज्या मधुमेहींना मनावर ताबा ठेवणे शक्य होणार नसेल त्यांनी आंब्यापासून दूरच राहिलेले बरे. प्रत्येक मधुमेही रुग्णाने आपापल्या नेहमीच्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार पथ्य पाळलेले योग्य होईल.  

काही रुग्णांना वाटते, "साखर वाढली तर वाढू दे ना. काय फरक पडतोय? फारतर काय होईल? डॉक्टर अजून एक एक गोळी किंवा फारतर इन्सुलिन वाढवून देतील." पण केलेल्या कुपथ्यामुळे औषध वाढत जाणे, याचा शरीराला दुहेरी त्रास असतो, हे त्यांच्या लक्षांतच येत नाही. 

मधुमेहींची रक्तशर्करा वाढली की, त्यांच्या नकळत त्यांच्या शरीरातील अनेक अवयवांवर घातक परिणाम होत असतो. तसेच गोळ्या किंवा इंजेक्शन वाढले की त्याचेही काही दुष्परिणाम त्यांच्या शरीरावर होत असतात . दुर्दैवाने, अशा दुष्परिणामांची ठोस लक्षणे त्या-त्या वेळी ठळकपणे दिसत नाहीत नाहीत. ती जेंव्हा लक्षात येतात तेंव्हा फार उशीर झालेला असू शकतो. आणि म्हणूनच मधुमेह या रोगाला 'सायलेंट किलर' असे नाव पडलेले आहे

काही मधुमेही रुग्ण तर, ऍलोपॅथीच्या डॉक्टरांनी दिलेला योग्य सल्ला न मानता, आपल्या मनाला येईल तसे वागतात. सांगितलेले पथ्यही पाळत नाहीत, नियमित व्यायाम करत नाहीत. मग त्यांचे औषध वाढवावे लागते. त्याउप्पर, हे रुग्ण असा कांगावाही करतात की, 'ऍलोपॅथीचे डॉक्टर्स उगीचच आमच्या औषधांचा डोस वाढवत नेतात!'  

अशा नाराज झालेल्या रुग्णांना, "डायबेटीस रिव्हर्सल" या नावाखाली केलेल्या आकर्षक जाहिरातबाजीचा मोह न पडला तरच नवल! त्या तथाकथित 'फायदेशीर' व्यवसायाबद्दल पुढे कधीतरी लिहीन!   

                                                                                       डॉ. स्वाती बापट [एम.बी.बी.एस., एम. डी. (बालरोग)] 



शुक्रवार, १० मे, २०२४

मधुमेहींनी आंबा खावा की नाही?


मधुमेहींनी आंबा खावा की नाही? याबाबत बरेच उलटसुलट मतप्रवाह ऐकायला मिळतात. मधुमेहींनी शक्यतो आंबा खाऊच नये, असा सल्ला काही डॉक्टर्स देतात. तो सल्ला अर्थातच कुठल्याही मधुमेही रुग्णाच्या कानाला गोड वाटत नाही. याउलट, 'मधुमेहींनी रोज एक आंबा खावा', हा कदाचित मधुमेहींच्या कानाला गोड लागेल असा सल्ला अनेक 'सुप्रसिद्ध' (?) आहारतज्ज्ञ देतात. यापैकी कोणाचे सांगणे बरोबर आहे? आपण आंबा खावा की नाही? असा संभ्रम मधुमेहींच्या मनांमध्ये निर्माण होतो. 

"मधुमेहींनी आंबा खावा की न खावा? खाल्ला तर एका दिवसात किती खावा? खाताना तो कसा - म्हणजे फोडी करून नुसता आंबाच खावा की आमरस काढून पोळीबरोबर अथवा पुरीबरोबर खावा?" हा संभ्रम दूर करण्यासाठी, आपण या प्रश्नांची उत्तरे शास्त्रीय निकष लावून शोधूया. त्याचप्रमाणे, एक आंबा खाणार असू तर तो किती मोठा अथवा किती वजनाचा असावा याबाबतही जाणून घेऊया. 
 
हे सर्व नीट समजण्यासाठी आधी आपल्याला ग्लायसेमिक इंडेक्स (GI) आणि ग्लायसेमिक लोड (GL), या दोन संकल्पनांची माहिती आवश्यक आहे. 

एखादा खाद्यपदार्थ खाल्ल्यानंतर, आपल्या रक्तातील साखर किती वेगाने वाढू शकते हे त्या-त्या पदार्थाच्या ग्लायसेमिक इंडेक्सवर ठरते. त्यामुळे, ग्लायसेमिक इंडेक्स हाच निकष समोर ठेवून खाद्यपदार्थांचे खालीलप्रमाणे वर्गीकरण करण्यात आलेले आहे:-

कमी ग्लायसेमिक इंडेक्स (low GI ) = ५५ पेक्षा कमी 
मध्यम ग्लायसेमिक इंडेक्स (medium GI ) = ५५-६९
जास्त ग्लायसेमिक इंडेक्स (high GI ) = ७० पेक्षा जास्त 

सर्वसाधारणतः, जास्त ग्लायसेमिक इंडेक्स असलेले पदार्थ मधुमेहींनी टाळावेत व शक्यतो low GI चे पदार्थ खावेत, असे आम्ही सांगतो. पिकलेल्या आंब्याचा ग्लायसेमिक इंडेक्स सुमारे ५५ असतो. त्यामुळे फक्त ग्लायसेमिक इंडेक्स या निकषाचाच विचार केला तर मधुमेहींनी आंबा खावा का?  याचे उत्तर 'हो' असेच येऊ शकेल. परंतु, एखाद्या पदार्थामुळे रक्तातली साखर किती वाढेल हे फक्त ग्लायसेमिक इंडेक्सवर ठरत नाही. त्याकरता ग्लायसेमिक लोड (GL)चा विचारदेखील करणे जरुरीचे आहे. 

ग्लायसेमिक इंडेक्स बरोबरच, त्या-त्या पदार्थामध्ये असलेल्या कर्बोदकांचे प्रमाण अथवा टक्केवारी आणि तो पदार्थ आपण किती प्रमाणात खात आहोत, यावर त्याचे ग्लायसेमिक लोड (GL) ठरते. म्हणजेच, कमी ग्लायसेमिक इंडेक्स असलेला एखादा पदार्थ तुम्ही खूप जास्त प्रमाणात खाल्ला तर त्या एकाच खाण्यातले ग्लायसेमिक लोड खूप जास्त होणार आहे. म्हणजेच तुमच्या शरीरात एकाच वेळेस खूप जास्त साखर जाणार आहे व त्यामुळे रक्तातल्या साखरेची पातळी अचानक वर जाणार आहे. त्याउलट, खूप जास्त ग्लायसेमिक इंडेक्स असलेला एखादा पदार्थ जर अतिशय अल्प प्रमाणातच खाल्ला, तर त्याचे ग्लायसेमिक लोड मात्र कमी असेल, आणि रक्तातली साखरही अचानक वाढणार नाही. 

ग्लायसेमिक लोड किती असावे याबाबतचा तक्ता खालीलप्रमाणे आहे:- 

कमी ग्लायसेमिक लोड (low GL) = १० पेक्षा कमी 
मध्यम ग्लायसेमिक लोड (medium GI) = १०-२०
जास्त ग्लायसेमिक लोड (high GI) = २० पेक्षा जास्त

मधुमेहींनी एका वेळेच्या (नाश्ता/ जेवण/मधल्या वेळेचे खाणे) आहारात शक्यतो १० किंवा १० पेक्षा कमी ग्लायसेमिक लोड खाणे हे सगळ्यात योग्य होय. तसेच, एका वेळेच्या आहारामध्ये २० पेक्षा जास्त ग्लायसेमिक लोड असू नये, हेही निश्चित. परंतु, दिवसभरात, जरी आपण १०-२० च्या दरम्यान ग्लायसेमिक लोड असलेले खाणे ५ वेळा खाल्ले, (सकाळची न्याहारी, सकाळचे मधल्या वेळेचे खाणे, दुपारचे जेवण, संध्याकाळचे मधल्या वेळेचे खाणे आणि रात्रीचे जेवण) तरी दिवसभराचे ग्लायसेमिक लोड १०० च्या आतच राहील व रक्तातील साखर सुनियंत्रित राहू शकेल. असे सातत्याने केल्यास, मधुमेहींच्या रक्तातील साखर कायम नियंत्रित राहू शकते व ग्लायकोसायलेटेड हेमोग्लोबिन (HbA1C) कमी राहते.  

सर्वसाधारणपणे मध्यम आकाराच्या एका आंब्याचे वजन सुमारे २०० ग्रॅम्स असते आणि त्यामधील रसाचे किंवा गराचे वजन सुमारे १२० ग्रॅम्स भरते. जर १०० ग्राम रस किंवा गर घेतला तर त्यात १५ ग्रॅम्स कर्बोदके किंवा साखर असते. म्हणजेच, १२० ग्रॅम रसामध्ये जवळपास १८ ग्रॅम साखर असणार आहे. 

एका २०० ग्रॅम वजनाच्या आंब्याचे ग्लायसेमिक लोड आपण काढूया. त्यासाठीचे गणिती सूत्र खालीलप्रमाणे आहे:-

ग्लायसेमिक लोड = ग्लायसेमिक इंडेक्स x  कार्बोहायड्रेटचे प्रमाण ÷ १००

आंब्याचा ग्लायसेमिक लोड = ५५ x १८ ÷ १०० = ९.९  असे उत्तर येते.

म्हणजेच एका खाण्याच्या वेळेस मधुमेहींना, मध्यम आकाराचा (२०० ग्राम वजनाचा) एखादा आंबा खायला हरकत नाही. 

पण हा आंबा इतर जेवणाबरोबर किंवा पोळी/पुरीबरोबर खाता येईल का? मधुमेहींनी जर आमरस पोळी/पुरी खाल्ली तर काय होईल?  याबाबतही कोष्टक मांडून आपण समजून घेऊया.  

गव्हाचा ग्लायसेमिक इंडेक्स ७२ असतो. गव्हाच्या पिठाच्या मध्यम आकाराच्या पोळीमधे साधारणतः १८ ग्रॅम कार्बोहायड्रेट असतात. त्यामुळे अशा एका पोळीचे ग्लायसेमिक लोड खालील प्रमाणे होते:-

७२ x १८ ÷ १०० = १२.९६... म्हणजे जवळपास १३. 

म्हणजेच एका मध्यम आकाराच्या आंब्याचा रस आणि एक मध्यम आकाराची पोळी मिळून, ९.९ + १३ = २२.९ इतके ग्लायसेमिक लोड होईल. म्हणजेच २० पेक्षा जास्त लोड होईल, आणि त्या मधुमेही रुग्णाच्या रक्तातली साखर प्रमाणाबाहेर वाढेल.   

त्यामुळे, जर आमरस-पोळी खायची असेल तर एका मध्यम आकाराच्या आंब्याचा रस आणि मध्यम आकाराची अर्धी पोळी खायला हरकत नाही. पण मग त्या जेवणामध्ये भात आणि कर्बोदके देणारे इतर पदार्थ (भात, भजी, पॅटिस,वडे  बटाटा किंवा पिष्टमय भाज्या) अजिबात असायला नकोत. कारण, जर ते पदार्थदेखील असले तर त्या पदार्थांतून मिळणारे ग्लायसेमिक लोड आणि आमरस-पोळीचे ग्लायसेमिक लोड मिळून, एकूण लोड खूपच जास्त होईल आणि त्यानंतर दोन तासांनी रक्तातली साखर तपासली, तर ती खूपच जास्त येईल. 

आंब्यामध्ये तंतुमय पदार्थ, जीवनसत्वे, आणि इतर बरेच आरोग्यदायी घटक असतात. शिवाय, आंबा हा फक्त आंब्याच्या दिवसातच मिळणार आहे. म्हणून या दिवसात आंबा खायला हरकत नाही, पण तो खाण्यामागचे सगळे शास्त्र समजून घेऊनच, मधुमेहींनी आंब्याचा रसास्वाद घ्यावा इतकेच. 

डॉ. स्वाती बापट [एम.बी.बी.एस., एम. डी. (बालरोग)] 

रविवार, २५ जून, २०२३

मधुमेहींसाठी आहाराची तत्वे

मधुमेहींसाठी आहाराची तत्वे:-

१. आपल्या रोजच्या आहारातलेच खाद्यपदार्थ खायचे आहेत. कुठलेही फॅन्सी पदार्थ /पावडरी खाण्याची गरज नसते.   डायबेटिसवर कारले/जांभळाच्या बिया व मेथ्या/मेथी अशा पदार्थाने पूर्णपणे नियंत्रण ठेवता येईल याची खात्री नसते. त्यामुळे संपूर्ण आहारावर नियंत्रण ठेवणे आवश्यक असते. 

२. मैदा/आंबवलेले पदार्थ/साखर/गूळ/गोडपदार्थ रक्तातील साखरेची पातळी भराभरा वाढवतात. म्हणून ते शक्यतो टाळायचे, किंवा अगदी कमी प्रमाणात खायचे. 

३.ज्वारी/बाजरी/गहू/तांदूळ/नाचणी/वरीचे तांदूळ/मका/राजगिरा/ओट्स् वगैरे धान्ये आणि तृणधान्ये आपल्या शरीराला कार्बोदके देतात. 'एकाच वजनाची'  धान्ये/तृणधान्ये घेऊन त्याचे पदार्थ खाल्ल्यास  रक्तातील साखर कमीजास्त प्रमाणात वाढते. पण त्यात फार तफावत नसते. अर्थात भातामुळे जरा जास्त वाढेल आणि ज्वारी बाजरी मुळे जरा कमी वाढेल. भाकरी किंवा चपाती खाल्ल्यानंतर रक्तातील साखर सर्वसाधारणपणे सारख्याच प्रमाणात वाढणार आहे. भाकरीचे वजन चपातीच्या वजनापेक्षा जास्त असते. रोज पोळी-भाकरीचे  वजन करून जेवणे शक्य नसते. त्यामुळे एका चपातीच्या ऐवजी अर्धी भाकरी खावी. भात पूर्णपणे वर्ज्य करायची गरज नाही. सर्वसाधारणपणे हातसडीच्या बासमती तांदुळाचा, छोटी वाटी भात खायला हरकत नाही. प्रत्येक जेवणात पोळी/भाकरी/भात याचे  प्रमाण कमी असावे. तसेच गोड पूर्णतः वर्ज्य करण्याची आवश्यकता नाही. पण ते वाटीभर खाण्याऐवजी चमचा-दोन चमचे खावे.

३. मधुमेहींना साखरेच्या ऐवजी गूळ/मध/कृत्रिम स्वीट्नर्स असे पर्याय सुचवले जातात. यामधील कृत्रिम स्वीट्नर्स पूर्णपणे टाळावेत. एकाच वजनाची साखर, गूळ  किंवा शुद्ध मध घेतले तर, यापैकी गुळामुळे रक्तातील साखर जास्त प्रमाणात वाढते तर शुद्ध मधामुळे कमी प्रमाणात वाढते. त्यामुळे साखरेच्या ऐवजी गूळ खाल्ला तरी चालतो हा एक 'गोड' गैरसमज आहे. साखर कमीतकमी खावी. आणि साखरेला पर्याय म्हणून शुद्ध मध वापरावा, गूळ वापरू नये.

४. 'शुगर फ्री' अशी मिठाई /आईस्क्रीम विकली जातात. ती अतिशय फसवी जहिरातबाजी असते. यामधे गोडी आणण्यासाठी अंजीर, खजूर, जरदाळू, बेदाणे यांचा वापर केला जातो. हे सगळे पदार्थ रक्तातील साखर वाढवतातच. काहीवेळा अशा गोड पदार्थांमधे कृत्रिम स्वीट्नर्स असतात. ते तर मुळीच खाऊ नयेत.

५. प्रत्येक वेळेस जेवताना/खाताना, त्या आहारामधे प्रथिने असतील तर रक्तातील साखर कमी वेगाने वाढते व साखरेच्या प्रमाणावर नियंत्रण राहते. त्यासाठी शाकाहारी व्यक्तींनी दूध/दही/ पनीर/चीझ/सोयाबीन/कडधान्ये खावीत. मांसाहारी व्यक्तींना अंडी/मासे/मटण हे पर्यायही उपलब्ध आहेत.

६. प्रत्येक जेवणात/नाष्ट्यामधे भरपूर तंतूमय पदार्थ असावेत. यासाठी काकडी, गाजर, टोमॅटो, मुळा, कोबी अशा कच्च्या भाज्या, कमी गोडीची फळे, आणि मोड आलेली कडधान्ये खावीत.

७. आहारात तेलकट, तुपकट, तळलेले पदार्थ कमीतकमी ठेवावेत. यासाठी दरमहिना दरडोई अर्धा किलोपेक्षा जास्त तेल वापरू नये. साजूक तूप/लोणी दिवसभरात चमचा-दोन चमचे खायला हरकत नाही. बाहेरील पाकीटबंद तळलेले पदार्थ/बिस्किटे शक्यतो घरी आणूच नयेत. त्यामधे तूप-तेल खूप जास्त असते आणि त्यांचा दर्जा चांगला असेल याची खात्री नसते. 

८. सूर्यफूल/शेंगदाणा/करडई/सरकी/मोहरी यापैकी, कुठलेही एक तेल आदलून-बदलून वापरावे. आहारात जवस, तीळ, कारळे, मोहरी व शेंगदाणे यांचा वापर करावा. तसेच रोज मूठभर म्हणजे २० ग्रॅम  'ट्री नटस्' (अक्रोड, बदाम पिस्ता, पाईननट्स) खावेत. 

९. दिवसातून एक किंवा दोन वेळेस भरपेट न खाता, तेवढेच अन्न थोडे-थोडे करून दिवसातून चार ते पाच वेळा खाल्ले तर रक्तातील साखरेवर चांगले नियंत्रण राहते हे जगन्मान्य आहे. मधुमेहींनी काहीही न खाता उपाशी राहणे योग्य नाही. बटाटा, साबुदाणा कमी प्रमाणात खावा. बटाट्यापेक्षा रताळ्यामधे तंतू जास्त असल्याने ते खाणे जास्त चांगले. 

१०. मधुमेहींच्या आहाराबाबतची ही मार्गदर्शक सूत्रे आहेत. तुम्ही घेत असलेली औषधे, तुम्हाला असलेल्या इतर व्याधी याचा विचार करून तुमचा आहार कसा असावा ते तुमचे डॉक्टर योग्य सांगू शकतात, हे लक्षात घ्यावे. 

 
तळटीप:- मी स्वतः जेस्टेशनल डायबेटिक (गर्भारपणात होणारा डायबेटिस) होते. म्हणजेच मी आज प्री-डायबेटिक आहे. पण
गेली एकतीस वर्षे, गोळ्या औषधांशिवाय मी मधुमेहावर नियंत्रण ठेवलेले आहे. अर्थात याला व्यायामाची जोड आहेच. व्यायामाबद्दल पुढे कधीतरी लिहीन.

डॉ. स्वाती बापट (MBBS, MD, बालरोगतज्ज्ञ)

शनिवार, ५ जून, २०२१

काढा डोळ्यावरची पट्टी!

सहा-सात वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. एका संध्याकाळी, माझ्या क्लिनिकमध्ये आलेले सर्व पेशन्ट तपासून झाल्यामुळे,  मी अगदी घरी जाण्याच्या तयारीत होते. तितक्यातच, माझे एक जुने पेशंट आले असल्याचे माझ्या सेक्रेटरीने मला सांगितले. मला गडबड असली तरीही क्लिनिकपर्यंत पोहोचलेल्या पेशंटला परत पाठवणे मला योग्य वाटत नव्हते. माझ्या क्लिनिकमध्ये, प्रत्येक पेशंटला एक नोंदणी क्रमांक दिलेला असतो. त्या क्रमांकाच्या कार्डावर मी त्या पेशंटच्या नोंदी (Medical notes ) लिहून ठेवते. या उशिरा आलेल्या पेशंटचे कार्ड शोधण्यात आणखी वेळ जाईल, असा विचार करून, मी सेक्रेटरीला सांगितले की आलेल्या पेशंटला तिने त्वरित माझ्या केबिनमध्ये पाठवावे आणि त्यांचे कार्ड शोधून ते नंतर आणून द्यावे. 

माझ्या केबिनचे दार उघडून माझी पेशन्ट वैष्णवी आणि तिचे पालक आत आले.  जवळजवळ दोन-अडीच वर्षांनंतर वैष्णवी माझ्याकडे आली होती. तिला पाहताच मी अगदी सहजपणे म्हणाले, "अरे वा, वैष्णवी मोठी झाली की! चटकन मी ओळखलंच नाही तिला." [गोपनीयतेच्या हेतूने माझ्या त्या पेशंट मुलीचे मी नाव बदलले आहे] 

माझे ते वाक्य ऐकल्या-ऐकल्या, वैष्णवीची आई घळाघळा रडायलाच लागली. माझ्या बोलण्यात काही चूक तर झाली नाही ना असे मला वाटू लागले. मी वैष्णवीच्या वडिलांना, वैष्णवीला घेऊन बाहेर जायला सांगितले. वैष्णवीची आई आता चक्क ओक्साबोक्शी रडू लागली. मग मात्र हा काहीतरी गंभीर प्रकार असणार याची मला जाणीव झाली.  या मुलीचं लैंगिक शोषण झाले आहे की काय? किंवा तिला काही मानसिक आजार वगैरे झाला आहे की काय? अशा अनेक शंका माझ्या मनात यायला लागल्या. 

वैष्णवीच्या आईला बऱ्याच प्रयत्नानंतर मी शांत केले. 

"नेमकं काय झालंय, हे आता जरा मला सांगाल का ? तुम्ही इतक्या का रडता आहात?" असे मी विचारले.  

वैष्णवीच्या आईने सांगायला सुरुवात केली. "डॉक्टर तुम्हाला आठवतंय का? अगदी दोन-अडीच वर्षांपूर्वीपर्यंत आम्ही वैष्णवीला घेऊन तुमच्याकडे यायचो."

"हो, चांगलं आठवतंय." हे बोलणे सुरु असतानाच माझ्या सेक्रेटरीने मला वैष्णवीचे कार्डही आणून दिले होते. त्या कार्डावरील नोंदी बघत मी म्हणाले, "वैष्णवी आता जवळपास साडेसात वर्षांची झाली आहे. साधारण अडीच वर्षांपूर्वी मी तिला DPT चा बूस्टर डोस दिलेला आहे. त्यानंतर तुम्ही आजच आला आहात."

"हो डॉक्टर.  वैष्णवी त्यावेळी अगदीच बारीक दिसायची. तुम्हाला आठवतंय का? त्यावेळी तिचं वजन फारच कमी वाढायचं याची आम्हाला सतत काळजी होती."

"हो आठवतंय ना. 'तिचं वजन वाढण्यासाठी काहीतरी औषध द्या', अशी गळ तुम्ही सतत घालत होता, हेही मला चांगलंच आठवतंय " 

"पण तुम्ही कधीच वजन वाढायचं औषध दिले नाहीत."

"नाहीच दिलं. आणि त्याला ठोस कारणही होतं. एकतर तिचं वजन तेंव्हादेखील व्यवस्थित वाढत होतं. तिचे वजन व उंची नॉर्मल रेंजमध्ये आहे, हे मी तुम्हाला सांगत होते. तिच्या वजन आणि उंचीच्या आलेखावर (growth charts) मी तुम्हांला प्रत्येक वेळेला ते दाखवतही होते. वजन वाढण्यासाठी तिला कुठल्याही औषधाची गरज नाही असेही मी तुम्हाला सांगत आले होते. शिवाय, अशा औषधांचे काही विपरीत परिणामही (side effects) असू शकतात, हे माहिती असल्यामुळे मी स्वतः ती औषधे माझ्या पेशंट्ससाठी कधीच वापरतच नाही."

"हो. डॉक्टर. तुम्ही प्रत्येक वेळी निक्षून सांगत होता. पण आमचंच जरा चुकलं" 

"बरं. पण आता त्याचं काय? आता तिला काय होतंय?" 

"सांगते डॉक्टर. वैष्णवी बारकुडीच होती,आणि तुम्ही तर वजन वाढवण्याच्या औषधांची गरजच नाही असाच सल्ला देत होतात. मात्र, आमचे नातेवाईक, शेजार-पाजारचे, येणारे-जाणारे, सारखे आम्हाला म्हणायचे, 'तुमची वैष्णवी खूपच अशक्त आहे. तिचे वजन वाढण्यासाठी तिला काहीतरी टॉनिक देत जा'. सतत सगळ्यांनी असं  सांगितल्यामुळे आम्हालाही वाटलं की दुसऱ्या कोणाचं तरी औषध करावं. माझ्या शेजारपाजारच्या बायकांनी पुण्याजवळच्या एका वैद्यकीय केंद्राच्या मुख्य डॉक्टरांचे नाव सांगितले. त्या डॉक्टरांची औषधे खूप गुणकारी आहेत असेही त्यांनी संगितले. मग मलाही वाटलं की आपण त्यांचं औषध करून बघावं"

"मग? दिलंत का त्यांचं औषध?"

"हो ना. गेले वर्षभर वैष्णवीला त्यांचेच औषध चालू होते."

"बरं. मग?" 

"आम्ही ज्या डॉक्टरांचे नाव ऐकून गेलो होतो ते स्वतः कधी भेटलेच नाहीत. त्या दवाखान्यात काम करणाऱ्या एका डॉक्टरांनी वैष्णवीला तपासले, नाडीपरीक्षा केली, आणि एक महिन्याच्या औषधाच्या पुड्या दिल्या. एक वर्षभर, रोज एक पुडी न चुकता घ्यायची, असे त्यांनी आम्हाला बजावून सांगितले. एकेक महिन्याच्या पुड्या आम्ही तीन-तीन हजार रुपयांना विकत घ्यायचो. न चुकता, आम्ही ती रोजची एक पुडी वैष्णवीला वर्षभर देत राहिलो. ते औषध चालू केल्यावर वैष्णवी भरपूर जेवू-खाऊ लागली आणि तिचे वजनही वाढायला लागले."

"वजन वाढलं असेल तर ठीक आहे. पण प्रॉब्लेम काय झाला? माझ्याकडे का आला आहात?" 

वैष्णवीची आई मूळ मुद्द्याकडे येत नसल्याने आता माझा संयम संपत चालला होता. 

"सांगते ना. मागच्या दोन-एक महिन्यात मला जरा काळजी वाटायला लागली. मला काहीतरी वेगळंच वाटायला लागलं." असं म्हणत पुन्हा त्या बाईंना रडू यायला लागले. 

"अहो रडू नका. शांत व्हा बरं, आणि तिला काय झालंय ते मला नीट सांगा"

"वेगळं म्हणजे... अहो डॉक्टर, ती अजून आठ वर्षांचीही झालेली नाही. पण आत्ताच केवढी मोठी दिसायला लागली आहे. तिची छाती भराभर वाढतेय. काखेत केस यायला सुरुवात झाली आहे. तिला दोन-चार महिन्यातच पाळी येईल की काय, अशी मला भीती वाटतेय."

"अरे बापरे! पण मग तुम्ही ज्यांच्याकडून औषध घेत होतात त्यांना हे सांगितलंय का?'

"हो, डॉक्टर. खरंतर आम्ही आत्ता त्यांच्याकडेच गेलो होतो. तिथून डायरेक्ट तुमच्याकडेच येतोय." 

"बरं. मग त्यांचा सल्ला काय आहे?" 

"डॉक्टर, आम्ही नुसती शंका त्यांना बोलून दाखवली की, 'तुमच्या औषधांमुळे तर असं होत नसेल ना? तर त्यांनी एकदम आरडा-ओरडाच सुरु केला. आम्हाला काय वाट्टेल ते बोलून अक्षरशः तिथून हाकलून लावले."

"आता ते जाऊ द्या. मला आधी एक सांगा की त्यांच्या पुडीतल्या औषधांव्यतिरिक्त गेल्या वर्षभरांत तुम्ही वैष्णवीला इतर काही औषधे देत होतात का? "

"नाही. त्या डॉक्टरांनी आम्हाला बजावून सांगितले होते की, इतर कुठल्याही पॅथीची कुठलीही औषधे घ्यायची नाहीत,त्यांनी दिलेली रोजची पुडी कुठल्याही परिस्थितीत चुकवायची नाही आणि सांगितलेले कडक पथ्य पाळायचे. आम्ही पण त्यांचे म्हणणे तंतोतंत पाळले."  

"बरं. मी आधी वैष्णवीला तपासते आणि तुम्हाला आलेली शंका खरी आहे की नाही याची खात्री करून घेते." असे म्हणून मी वैष्णवीला तपासणीसाठी आत बोलावले. 

दुर्दैवाने, तिची आई म्हणत होती ते खरेच होते. वैष्णवीच्या स्तनांची वाढ, आणि तिच्या काखेत व गुप्तांगावर आलेल्या केसांची वाढ बघता (Sexual Maturity Rating), लवकरच वैष्णवीला पाळी येणार, याची मला खात्री पटली. चेहऱ्यावर अगदी निरागस, बालसुलभ भाव असलेल्या वैष्णवीची ती अवस्था बघून मलाही गलबलून आले.

मी वैष्णवीला बाहेर वेटिंग रूममध्ये बसून पुस्तक वाचायला सांगितले. ती बाहेर गेल्यानंतर, अगदी शांत आवाजात, मी वैष्णवीच्या आई-वडिलांना समजावून सांगितले, 

"हे पहा, ही Precocious Puberty, किंवा अकाली पौगंडावस्थेची केस आहे. आपल्याला वैष्णवीच्या काही तपासण्या करून, ती या अवस्थेच्या नेमक्या कुठल्या स्टेजला आहे हे बघावे लागेल. त्याचप्रमाणे, असे कशामुळे झाले असेल, याचाही शोध आपल्याला घ्यावा लागेल. अशा केसेसमध्ये बरेचदा काही कारण सापडत नाही. पण कधीकधी मेंदूत किंवा शरीरात इतरत्र होणाऱ्या गाठीमुळे (tumor) असे होऊ शकते. तसे काही निघालेच, तर त्या गाठीचा इलाज करावा लागतो. शरीरातील ग्रंथींच्या तज्ज्ञांच्या, म्हणजेच Paediatric Endocrinologist च्या सल्ल्याप्रमाणेच पुढील तपासण्या आणि उपचार तुम्ही घेतले तर जास्त योग्य होईल. मात्र, हे सगळे तातडीने करावे लागेल. मी तुम्हाला तशी चिठ्ठी लिहून देते". 

त्यांना मी पुण्यातल्या एका Paediatric Endocrinologist कडे जाण्याचा रेफरन्स लिहून दिला. त्या डॉक्टरांच्या सल्ल्याप्रमाणे, वैष्णवीच्या MRI, X-Ray आणि रक्ताच्या अनेक तपासण्या केल्या गेल्या. सुदैवाने, वैष्णवीच्या मेंदूत गाठ वगैरे काही निघाली नाही. पण तिला हे असे का झाले असावे, याचे कारणही सापडू शकले नाही. वैष्णवीला पाळी लवकर सुरु होऊ नये, यासाठी,  आठ ते दहा हजार रुपये किंमतीच्या एक विशिष्ठ औषधाचे इंजेक्शन, तिला  दर महिन्याला द्यायला सुरुवात केली. त्या नंतर, तिच्या स्तनांची व इतरही लैंगिक अवयवांची अवाजवी वाढ थांबली.  दर तीन-चार महिन्यांनी, पुढील उपचारांची दिशा ठरवण्यासाठी अनेक रक्त-तपासण्याही कराव्या लागल्या. वैष्णवी बारा वर्षांची झाल्यावर त्या डॉक्टरांनी ती इंजेक्शन्स बंद केली. त्यानंतर सात-आठ महिन्यांत वैष्णवीला मासिक पाळी सुरु झाली. 

त्या सर्व दिव्यातून पार पडल्यानंतर प्रथमच, वैष्णवीच्या पालकांनी काही दिवसांपूर्वी तिला माझ्याकडे काही किरकोळ कारणासाठी आणले होते.

आता जवळजवळ चौदा वर्षांची होत आलेली वैष्णवी अगदी छान उंच झालेली दिसत होती. वैष्णवीची तपासणी झाल्यावर, तिच्या आईने जाता-जाता मला एक प्रश्न केला, "मॅडम, मागे जो प्रकार घडला तो सगळा त्या पुडयांमधल्या औषधांमुळेच  झाला असेल ना? "

"मी तसे खात्रीशीरपणे म्हणू शकणार नाही. त्या पुड्यांमध्ये जे औषध होते त्याचे रासायनिक पृथःकरण जर तुम्ही करून घेतले असते तर तुमच्या प्रश्नाचे उत्तर कदाचित तुम्हाला मिळाले असते."  असे उत्तर मी दिले.  

त्यावर वैष्णवीच्या आई अतिशय पोटतिडिकीने म्हणाल्या, "आम्ही शेवटचे जेंव्हा त्यांच्याकडे गेलो होतो तेंव्हा, त्या महिन्याच्या आमच्या पुड्याही संपलेल्या होत्या. गेल्या-गेल्या आम्ही त्यांना विचारले की, 'तुम्ही देत असलेल्या औषधांमुळे हे असे शारीरिक बदल होत आहेत का?' त्या प्रश्नावर ते काहीतरी सारवासारवीची उत्तरे देऊ लागले. पण तो प्रश्न आम्ही आधी विचारला हीच आमची चूक झाली. कारण, जसे नंतर आम्ही त्यांना म्हटले की, 'वैष्णवीला तुम्ही देत होतात त्या औषधाच्या पुड्या संपल्या आहेत. आता आम्हाला आणखी हव्यात'. तशी त्यांना शंका आली असावी, की आम्ही त्यांची तक्रार करू, किंवा त्यांना कोर्टात खेचू. त्यानंतर मात्र ते आमच्यावर कमालीचे भडकले आणि त्यांचा आरडा-ओरडा सुरु झाला. 'आमची औषधे आम्ही नैसर्गिक वनौषधींपासून तयार करतो. आमच्या औषधांचे काहीही साईड इफेक्ट्स असूच शकत नाहीत. तुमचा विश्वास नाही, तर आमच्याकडे येताच कशाला?' असे म्हणून, त्यांनी आम्हाला तेथून चक्क हाकलूनच लावले. खरंतर मला त्यांचा खूप राग आला होता पण आम्ही मुकाट्याने तिथून निघून आलो."

"त्या पुड्यांपायी आम्ही वर्षभरात ३५-४० हजार खर्च केलेच होते. त्यानंतर, वैष्णवीचे झालेले नुकसान भरून काढता-काढता अक्षरशः आमच्या नाकी नऊ आले. गेल्या चार वर्षांत दिलेली इंजेक्शन्स आणि केलेल्या सर्व टेस्ट्स यांवर आमचे आणखी चार-पाच लाख रुपये खर्च झाले. आजदेखील माझा अगदी संताप-संताप होतो. असं वाटतं की, या फसव्या लोकांना शिक्षा व्हायला हवी. पण, त्या पुडीतल्या औषधाचे नाव आम्हाला माहिती नाही, आणि आमच्याकडे त्या औषधाचा नमुनाही नाही. त्यामुळे त्यांच्याविरुद्ध आमच्याकडे काही पुरावाच नाही. आणि जरी काही पुरावा आमच्याकडे असता तरी, वैष्णवीच्या ट्रीटमेंटचा खर्च केल्यानंतर परत कोर्टाचा खर्च करण्याची आर्थिक ताकदच आमच्यात उरली नसती. त्यामुळे आमचा राग गिळून टाकून, आम्ही कसेबसे स्वतःच्या मनाचे 'आत्मसंतुलन' बिघडू नये, एव्हढाच प्रयत्न करत राहतो." 

वैष्णवीच्या आईचा होणारा तळतळाट मला कळत असला तरीही वैद्यकीय व्यवसायाच्या नीतिमत्तेनुसार (Medical  Ethics) इतर कोणा वैद्यकीय व्यवसायिकांबाबत मी काहीही बोलणे उचित नव्हते.  

एलोपॅथी व्यावसायिकांना  ऍलोपॅथीच्या औषधांचे परिणाम (Effects), दुष्परिणाम (side effets) आणि अगदी टोकाचे दुष्परिणाम (adverse effects) याबाबत माहिती असते. त्या माहितीवर आधारित, कुठले औषध कुठल्या व्याधींसाठी, किती प्रमाणात आणि किती काळ वापरायचे, हेदेखील त्यांना कळते. तसेच, त्या औषधांचे दुष्परिणाम आणि अगदी टोकाचे दुष्परिणाम या बाबतची माहिती सर्वांसाठी खुली असते आणि सहजी मिळू शकते. त्यामुळे, इच्छुक पेशन्ट्स त्याबाबत ऍलोपॅथी व्यावसायिकांना जाब विचारू शकतात. आणि तो त्यांचा हक्क आहे.


दुर्दैवाने, ऍलोपॅथीच्या औषधांच्या उपयुक्ततेबाबत फारसे बोलले जात नाही. मात्र, त्यांच्या दुष्परिणामांची चर्चाच समाजात सातत्याने होत असते. वैष्णवीच्या केसच्या अनुभवानंतर, माझ्या पेशंट्सच्या पालकांना मी काही गोष्टी नीट समजावून सांगते, "तुम्ही ऍलोपॅथी सोडून इतर कुठल्याही पॅथीचे औषध तुमच्या मुलांना देणार असाल तर त्या औषधांची लेखी चिट्ठी अवश्य घेत जा. त्या औषधाचे नाव काय आहे, त्यात काय घटक वापरले आहेत, हे जाणून घेणे आवश्यक आहे आणि तो तुमचा हक्कही आहे. तसेच त्या औषधाचे तुमच्या मुलांच्या शरीरावर काही दुष्परिणाम तर होत नाहीत ना, याबाबत जागरूक राहा. तसे काही दिसून आल्यास संबंधित वैद्यकीय व्यावसायिकाला त्यासंबंधी विचारणा करणे हाही तुमचा हक्कच आहे. ऍलोपॅथी सोडून इतर पॅथीच्या औषधांचे दुष्परिणाम (side effects)  नसतात, असा अंधविश्वास ठेऊ नका. कोणत्याही पॅथीची औषधे घेणार असाल तरी ती डोळसपणे घ्या, इतकेच."

एलोपॅथीप्रमाणेच इतर पॅथींमध्येही अनेक गुणकारी औषधे असतील. मात्र विज्ञानाधिष्ठित चाचण्यांद्वारे ते सिद्ध होणे  आवश्यक आहे. त्या कठोर चाचण्यांना सामोरे जाण्याची मानसिकता सर्वच पॅथीच्या डॉक्टरांमध्ये असायला हवी. तसेच, एखाद्या औषधाचे दुष्परिणाम (side effects) किंवा अगदी टोकाचे दुष्परिणाम (adverse effects) दिसून आल्यास, ते मान्य करण्याचा मोकळेपणादेखील हवा. एखाद्या गुणकारी औषधाच्या परिणामापेक्षा त्याचे  टोकाचे दुष्परिणामच  (adverse effects) जास्त असतील तर, त्या औषधाच्या वापरावर कायद्याने बंदी यायला हवी. 

या लेखमालेतील आधीचे लेख खालील लिंक्सवर वाचावेत.  

Be Open ! 

रामदेव?.....जाना देव!