रविवार, ३० मे, २०२१

Be open!

करोना महामारीमुळे सोशल मीडियावर अनेक वादांना तोंड फुटले. राजकीय, सामाजिक विषयांबरोबर आरोग्यसेवा आणि वेगवेगळ्या उपचारपद्धतीचा प्रश्न तर ऐरणीवरच आला. 

खरेतर, कुठल्याच पॅथीमध्ये करोनावर रामबाण इलाज नाही. हे वास्तव ऍलोपॅथी व्यावसायिकांनी प्रांजळपणे मान्य केले. Modern Medicine च्या Evidence-based practice या तत्वाप्रमाणे, जसजशी काही नवीन औषधे लागू पडण्याची शक्यता असल्याचे पुरावे समोर आले, तसतसे नवनवीन औषधे व उपचारपद्धती वापरण्यास सुरुवात झाली. त्यानंतरही, जेंव्हा-जेंव्हा ऍलोपॅथीची काही औषधे करोना उपचारांसाठी लागू पडत नाहीत हे सिद्ध झाले तेंव्हा त्या औषधांचा वापर बंद करण्याच्या सूचना जागतिक आरोग्य संघटनेने (World Health  Organization) केल्या. त्यानुसार सातत्याने बदल करत, जगभरातील ऍलोपॅथी व्यावसायिकांनी करोना रुग्णांचे जीव वाचवायची शिकस्त केली. 

जगभरात उद्भवलेल्या बिकट परिस्थितीत, इतर देशांमधील जनतेने modern medicine च्या डॉक्टरांच्या प्रयत्नांवर पूर्ण विश्वास ठेऊन, एकजुटीने त्यांना पाठिंबा दिला. भारतात मात्र इतर पॅथीच्या अनेक 'व्यावसायिकांनी' ही संधी साधून ऍलोपॅथीच्या उपचारपद्धतीची खिल्ली उडवणे सुरु केले. अनेक जणांनी, "प्रतिकारशक्ती वाढवणारी", किंवा "करोना न होऊ देणारी", आणि "करोना झालाच तरी त्यातून पूर्ण बरे करणारी", किंवा "करोनावरील एलोपॅथीच्या उपचारांमुळे शरीरावर झालेले दुष्परिणाम घालवणारी", अशी अनेक औषधे बाजारात आणली. एकीकडे ती औषधे खपवून आपली पोळी भाजून घेतलीच. पण, दुसरीकडे, "करोना लसीकरण करू नये, हॉस्पिटलमध्ये भरती झालात तर मृत्युमुखी पडण्याचीच शक्यता जास्त आहे", असे काही संदेश व्हिडीओ आणि लेखी पोस्टद्वारे सोशल मीडियामध्ये पाठवून सामान्य जनतेची दिशाभूल करायलाही मागेपुढे पहिले नाही. अशा पोस्टमधून अत्यंत चतुराईने स्वतःची जाहिरातबाजीही त्यांनी करून घेतली. आणि, या सगळ्या प्रकारात 'मिक्सोपॅथी' किंवा 'इंट्रीग्रेटेड मेडिसिन' वापरात असले पाहिजे अशीही चर्चा पुन्हा सुरु झाली. 

एका ग्रुपवरच्या चर्चेमध्ये, "मिक्सोपॅथीला' माझा विरोध आहे" हे मी स्पष्ट केले. त्यावर, उजव्या विचारसरणीच्या माझ्या एका स्नेह्याने, "Come on Swatee, be open. तुम्ही ऍलोपॅथीवाले ना, अजिबात open minded नसता. एक साधा विचार करून मला सांग, हजारो वर्षांपासून आपल्या देशात वापरामध्ये असलेली आयुर्वेदाची उपचारपद्धती चुकीची असूच कशी शकेल?"

"ती उपचारपद्धती चुकीची आहे असं माझे मत नाही. पण, त्या उपचारपद्धतीला अजूनही जगन्मान्यता लाभलेली नाही. Modern Medicine हे Evidence-based practice वर आधारित आहे. यामध्ये सखोल आणि व्यापक चाचण्या करून, तौलनिक संशोधन प्रकल्प राबवले जातात. चाचण्या आणि संशोधनातून समोर येणाऱ्या निष्कर्षांच्या कसोटीवर एखाद्या औषधामुळे होणारे फायदे आणि तोटे काय आहेत हे जोखले जाते. फायदे आणि तोटे यांचा एकत्रित विचार करून एखाद्या औषधाची उपयुक्तता किती आहे आणि अपाय किती प्रमाणात आहे बघितले जाते.  याच निकषांवर इतर कुठल्याही पॅथीच्या औषधांची उपयुक्तता सिद्ध झाली तर Modern Medicine, त्यातील गुणकारी घटक वापरून, औषधे तयार करून  वापर करते. We are quite open about it! मात्र, त्यातील काही औषधे त्यांच्या 'side effects मुळे, उपयुक्ततेपेक्षाही अधिक हानिकारक आहेत, असे सिद्ध झाले तर त्या औषधांचा समावेश Modern Medicine मध्ये होत नाही." 

"एखादी उपचारपद्धती व त्यातील औषधे भारतात हजारो वर्षांपासून वापरली जात आहेत, आणि नैसर्गिक वनस्पती पासून तयार केली जात असल्यामुळे त्यांचे काहीही 'side effects' नाहीत, हे केवळ बोलून भागणार नाही. व्यापक संशोधन आणि चाचण्यांचे निष्कर्ष दाखवणारे रिसर्च पेपर समोर ठेवून जगभरातील शास्त्रज्ञांना त्यावर विश्वास ठेवायला भाग पाडले पाहिजे. तसे होईपर्यंत सामान्य नागरिकांनीही आंधळेपणाने त्यांवर विश्वास ठेवणे त्यांच्या हिताचे नाही." 

"इतर कुठल्याही पॅथीतील औषधांपेक्षा आमच्या पॅथीत एखादे औषध जास्त चांगले आहे किंवा एखाद्या असाध्य रोगावर आमच्या पॅथीत रामबाण औषध आहे असा दावा करायला काहीच हरकत नाही. पण त्या दाव्याला जगन्मान्यता मिळवण्यासाठी त्या औषधातील घटक निस्संदिघ्नपणे जगासमोर आणायची तयारी हवी. तसेच संशोधनासाठी ते औषध उपलब्ध करून द्यायला हवे. हे करायला इतर पॅथीचे लोक तयार आहेत का?  Are they open for this idea? ते आधी बघ आणि मला सांग." असे मी माझ्या त्या स्नेह्याला सांगितले. 

तो विषय तिथेच थांबला. पण त्या चर्चेमुळे, अनेक वर्षांपूर्वी डॉ.राम गोडबोले सरांच्या हाताखाली मी काम करत असतानाचा एक अनुभव मला आठवला.  

एकदा, जेमतेम तिशीचा एक पेशन्ट गोडबोले सरांकडे तपासणीसाठी आला. त्याच्या अंगातील रक्त खूपच कमी झाल्यामुळे तो पांढराफटक पडला होता. म्हणजेच, त्याला Severe Anaemia झालेला दिसत होता. त्याला कमालीचा थकवाही आला होता. त्याला आणि त्याच्या नातेवाईकांना सरांनी काही प्रश्न विचारले. त्याच्या शरीराच्या एखाद्या भागातून, अंतर्गत अथवा बहिर्गत रक्तस्त्राव तर होत नसेल ना, हे जाणून घेण्याचा प्रयत्न सरांनी केला. त्याला तपासून झाल्यावर, त्याच्या आजाराचे नेमके निदान करण्यासाठी सरांनी काही चाचण्या लिहून दिल्या. 

त्या दिवशीचे सर्व ओपीडी पेशंट्स तपासून झाल्यावर सरांनी आपला मोर्चा हॉस्पिटलच्या प्रयोगशाळेकडे (Pathology Lab) कडे वळवला. त्या तरुणाच्या रक्ताचे बरेचसे रिपोर्ट्स तयार झाले होते. गोडबोले सरांनी स्वतः मायक्रोस्कोपखाली त्याच्या रक्ताची फिल्म बघितली आणि आम्हालाही बघायला सांगितली. त्या तरुणाला, एका प्रकारचा  रक्ताचा कॅन्सर झाला होता. त्यावेळी तरी त्या आजारावर ऍलोपॅथीमध्ये कुठलेही औषध नसल्याने आमच्या दृष्टीने तो असाध्य रोग होता. दोन-चार महिन्यातच त्या तरुणाचा मृत्यू होणे अटळ आहे असे दिसत होते.

दुसऱ्या दिवशी सर्व रिपोर्ट्स घेऊन त्या तरुणाचे नातेवाईक आले. सरांनी त्यांना त्या आजाराचे गंभीर स्वरूप समजावून सांगितले. ऍलोपॅथीमध्ये ते दुखणे बरे करण्यासाठी नेमके औषध त्याकाळी उपलब्ध नसल्याचेही स्पष्ट केले. हे ऐकताच, गळाठून गेलेल्या नातेवाईकांपैकी कोणीतरी विचारले, "आमच्या गावाकडे एक वैद्य आहेत. त्यांच्याकडे असाध्य रोगावर औषधे आहेत असे म्हणतात. त्यांचे औषध आम्ही केले तर चालेल का?"
 
गोडबोले सरांनी त्यांना सांगितले, "मी ऐकून आहे की इतर औषधपद्धतींमध्ये अनेक व्याधींवर गुणकारी औषधे आहेत. पण मला त्याबाबत सखोल ज्ञान नाही. मी मात्र या मुलाचा जीव वाचवायला असमर्थ आहे. या आजारावरचे औषध तुम्हांला इतरत्र कुठेही मिळत असेल तर तुम्ही निश्चित त्याचा विचार करा." त्या नातेवाईकांचे चेहरे पाहून सरांना आणि आम्हा सर्वांनाही खेद वाटला, पण कालांतराने आम्ही सगळेच त्या तरुणाला विसरून गेलो. 

काही महिन्यानंतर तो तरुण परत सरांना दाखवायला आला. तो अगदी व्यवस्थित व सशक्त दिसत होता. आम्ही सगळे आनंदित आणि आश्चर्यचकित झालो. त्या तरुणाच्या रक्ताची तपासणी करून त्याच्या आजाराबाबत शहानिशा करण्याचे सरांनी ठरवले. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, त्याच्या रक्तात त्या असाध्य रोगाचा मागमूसही दिसून आला नाही. आम्हा सर्वांनाच त्या वैद्यांच्या उपचारपद्धतीबद्दल आणि औषधांबद्दल कमालीचा आदर आणि कौतुक वाटले. सरांनी त्या वैद्यांसाठी एक पत्र लिहून त्या तरुणाजवळ दिले. त्या पत्रात सरांनी त्या वैद्यांचे आभार मानले होते. तसेच, त्यांनी कोणती औषधयोजना केली ते सांगावे व औषधांचे नमुने पाठवावे अशी विनंतीही केली होती. त्या औषधांवर संशोधन करून प्रसिद्ध केल्यास अशा प्रकारच्या सर्वच रुग्णांना जीवनदान मिळू शकेल, असेही सरांनी लिहिले होते. 

मोठ्या आतुरतेने आम्ही सगळेच त्या वैद्यबुवांच्या उत्तराची आणि औषधांच्या नमुन्याची वाट बघत होतो. काही दिवसांतच तो तरुण वैद्यबुवांचा निरोप घेऊन आला. वैद्यबुवांनी त्यांची उपचारपद्धती सांगण्यास आणि औषधांचे नमुने पाठवण्यास साफ नकार दिला होता. त्यानंतरही, सरांनी अनेक प्रकारे त्या वैद्यबुवांसोबत संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, पण त्यांना यश आले नाही. वैद्यबुवांनी पाळलेल्या त्या गुप्ततेचे कारण कळू शकले नाही, पण त्याबद्दल हळहळ मात्र आम्हाला वाटत राहिली. 

माझ्या स्नेह्याशी पुन्हा झालेल्या संभाषणात मी त्याला हा प्रसंग सांगितला. 
"आपल्या देशातील पारंपरिक औषधपद्धतीला जगन्मान्यता मिळावी असे मलाही वाटते. पण त्या पद्धतीमधील औषधे गुणकारी आहेत हे निर्विवादपणे सिद्ध झाल्याशिवाय ते शक्य होणार नाही. त्याकरिता, त्या पद्धतीमधील सर्व औषधे संशोधनासाठी उपलब्ध व्हायला हवीत ना? काही पारंपरिक औषधांची उपयुक्तता जगन्मान्य झालेली आहे. उदा: (https://www.ncbi.nlm.nih.gov/pmc/articles/PMC3560124/
तसेच, काही औषधे Modern Medicine च्या औषधांसोबत वापरल्याने रोगावर अधिक चांगला परिणाम होतो असेही संशोधनांती सिद्ध झालेले आहे. उदा: (https://pubmed.ncbi.nlm.nih.gov/23125511/). 
काही औषधे मात्र आरोग्याला हानिकारक आहेत, हे देखील संशोधनाद्वारे कळलेले आहे. उदा: (https://pubmed.ncbi.nlm.nih.gov/31641694/)"
 
एवढे सांगून मी माझ्या त्या स्नेह्याला स्पष्टपणे विचारले, "आम्ही ऍलोपॅथीवाले Open-minded नसतो, हे तुझे म्हणणे खोडून काढण्यासाठी यापेक्षा अधिक सबळ युक्तिवाद काय असू शकेल? We are quite open. But, are  the others open too?"

इतर पॅथीमधील काही व्यावसायिक आजही आपल्या उपचार व औषधांसंबंधी गुप्तता पाळत असल्याचे एक उदाहरण, काही वर्षांपूर्वी माझ्याच एका पेशंटमुळे माझ्यासमोर आले होते. त्याबद्दल मी लवकरच सांगेन. 

तोपर्यंत वाचकांनी अधिक शास्त्रोक्त माहितीसाठी खालील लिंक जरूर वाचावी. 

गुरुवार, २७ मे, २०२१

रामदेव?.....जाना देव!

ही  गोष्ट आहे १९८६ सालची. ऍलोपॅथी म्हणजेच मॉडर्न मेडिसिन मधील माझ्या गुरूंच्या, म्हणजेच सोलापूरच्या सुप्रसिद्ध डॉ. राम  गोडबोले सरांच्या हाताखाली, त्यावेळी शिकाऊ डॉक्टर म्हणून मी काम करत होते. 

सोलापूरमधील वाडिया धर्मादाय हॉस्पिटलमध्ये गोडबोले सर मानद फिजिशियन होते. रोज सकाळी ९-९.१५ पर्यंत सर हॉस्पिटलमध्ये पोहोचत असत. सर्वप्रथम, त्यांच्या नावावर भरती झालेले वॉर्डमधील सर्व रुग्ण ते तपासत. त्यानंतर, ओपीडीतले रुग्ण तपासायला सुरुवात करत. त्यांच्या रोजच्या ओपीडीला जवळपास तीस-पस्तीस पेशन्ट्स असायचे. प्रत्येक पेशंटला पुरेसा वेळ देऊन तपासण्याची त्यांची पद्धत होती. त्यांच्या हाताखाली एकावेळी आम्ही तीन चार शिकाऊ डॉक्टर्स काम करत असू. 

एक रुग्ण तपासून झाला की त्याच्या रोगाचे निदान काय व औषधयोजना कशी असावी, हे सर आम्हाला तोंडी सांगत असत. त्यानंतर सर पुढील रुग्णाला तपासायला सुरुवात करत. सरांच्या तोंडी सूचनांप्रमाणे औषधांची चिट्ठी लिहून द्यायचे काम आम्ही शिकाऊ डॉक्टर आळीपाळीने करत असू. लिहून दिलेली औषधे त्या-त्या रुग्णाने विकत आणून सरांना दाखवली पाहिजेत असा सरांचा आग्रह असे. आपल्या सूचनांप्रमाणे योग्य ती औषधे चिट्ठीत लिहिली गेली आहेत आणि केमिस्टनेही त्या चिट्ठीप्रमाणेच औषधे  पेशन्टला दिली आहेत याची खात्री सर करून घेत असत. तसेच, ती औषधे घेण्याबद्दलच्या सूचनाही सर स्वतःच पेशंटला देत असत.  

एके दिवशी एका रुग्णाने केमिस्टकडून आणलेली औषधे पाहताच सर जरा अस्वस्थ झालेले दिसले. सरांनी स्वतः त्या पेशंटकडे दिलगिरी व्यक्त करून सांगितले की एक औषध नजरचुकीने लिहिले गेले आहे. शिकाऊ डॉक्टरांनी लिहून दिलेली चिठ्ठी सरांनी स्वतःकडेच ठेऊन घेतली, आणि चुकीने लिहिलेले ते औषध वगळून, इतर सगळी औषधे स्वतः लिहून रुग्णाला नवीन चिट्ठी दिली. ती औषधे कशी घ्यायची ते समजावून सांगितले आणि त्या पेशंटची बोळवण केली. 

संपूर्ण ओपीडी संपल्यावर, इतर शिकाऊ डॉक्टर्सना जायला सांगून सरांनी मला एकटीलाच ओपीडीत थांबायला सांगितले. त्यानंतर, त्या रुग्णाला आधी दिलेली औषधांची ती चिट्ठी माझ्या हातात देत अगदी शांत आवाजात सरांनी मला विचारले, 

 "हे अक्षर तुझे आहे का?"

 सरानी समोर धरलेल्या कागदाकडे पाहत, ते अक्षर माझेच असल्याची कबुली मी दिली. 

"हे जे शेवटचे औषध लिहिले आहेस ते मी सांगितले नव्हते."

"हो. तुम्ही सांगितले नव्हते सर. पण, तो पेशन्ट म्हणाला की तो रोज ते औषध घेतो. त्याने विनंती केली म्हणून मी ते लिहिले. "

"औषधशास्त्र (Pharmacology) या विषयामध्ये या औषधाबद्दल तू काही शिकली आहेस का? "

"नाही सर. कारण, ते औषध ऍलोपॅथीचे नाहीये." 

"मग ही गोष्ट माहिती असूनदेखील तू ते औषध का लिहिलेस?  एक लक्षात ठेव, ज्या पॅथीचे आपण शिक्षणच घेतलेले नाही त्या पॅथीचे कुठलेही औषध लिहायचा कायदेशीर अधिकार आपल्याला नाही. शिवाय, तसे करणे अनैतिकही आहे. तसेच, एखाद्या ऍलोपॅथीच्या औषधाबद्दलही आपल्याला संपूर्ण आणि निश्चित माहिती नसल्यास, ते औषध कधीही लिहायचे नाही." 


इतर पॅथीचे औषध लिहून देण्यातले संभाव्य धोके सरांनी मला विस्ताराने सांगितले. ऍलोपॅथी शिकताना, फार्माकोलॉजी विषयामध्ये प्रत्येक औषधाचा तपशीलवार अभ्यास केला जातो. ते औषध कसे द्यायचे, कोणकोणत्या व्याधींसाठी वापरायचे, किती प्रमाणात, व किती काळ ते औषध घेतले तर ते उपयुक्त असते, कमी वा जास्त प्रमाणात, किंवा कमी वा जास्त काळ घेतले तर रुग्णाला काय धोका निर्माण होऊ शकतो,  त्या औषधाचे एकंदर परिणाम (effects) व दुष्परिणाम (side-effects) कोणते, त्या औषधांबरोबर इतर काही औषधे घेतल्यास, त्यामुळे त्यांचे होणारे  एकत्रित परिणाम (drug interactions), अशा सर्व बाबींचे सखोल अध्ययन केल्यामुळे, त्यांची पूर्ण जाण ऍलोपॅथी डॉक्टरला होते. मुख्य म्हणजे, ऍलोपॅथीच्या औषधांबाबतची माहिती संकलित स्वरूपात उपलब्ध असल्याने रुग्ण स्वतःदेखील ती वाचून जाणून घेऊ शकतो. त्याबाबत रुग्णाने ऍलोपॅथी डॉक्टरला काही विचारले तर त्याचे शंकानिरसन तो डॉक्टर करू शकतो. परंतु, इतर पॅथीच्या औषधांबाबत ऍलोपॅथी डॉक्टर अनभिज्ञ असतो. त्यामुळे इतर पॅथीचे औषध आपण लिहिणे हे न्यायवैद्यकीय (Medico-Legal) दृष्टीनेही अतिशय अयोग्य व धोकादायक आहे हे सरांनी मला समजावून दिले. 

कायद्याच्या नजरेतून, हाताखालच्या शिकाऊ डॉक्टरच्या चुकीची सर्व जबाबदारीही वरिष्ठ डॉक्टरांचीच असते (vicarious liability ) हेही त्यांनी मला अगदी शांतपणे समजावून सांगितले. ती औषधाची चिठ्ठी मी सरांच्या वतीने लिहिलेली असल्याने, मला संपूर्ण घटनेचे गांभीर्य समजले आणि, "यापुढे कधीही माझ्याकडून अशी चूक होणार नाही" अशी ग्वाही मी सरांना दिली. 

पुढील महिन्यात तोच पेशन्ट परत सरांकडे तपासणीला आला. यावेळीही औषधांची चिठ्ठी मीच लिहून दिली. त्या पेशंटच्या आग्रहाला बळी न पडता, तो नेहमी घेत असलेले ते दुसऱ्या पॅथीचे औषध चिठ्ठीत लिहिण्यास मी नकार दिला. तसेच, ते औषध सरांना विचारल्याशिवाय घेत जाऊ नका असेही मी त्या पेशंटला खडसावले. सरांना औषधे दाखवत असताना त्या पेशंटने विचारले, "डॉक्टर, अमुक-अमुक डॉक्टरांनी लिहिलेले तमुक-तमुक औषध मी नेहमी घेतो. तुम्ही दिलेल्या औषधांसोबतच त्या डॉक्टरांनी दिलेले ते औषध मी घेतले तर चालेल का?"  

या प्रश्नावर वर सर काय उत्तर देतात हे ऐकण्याची मला कमालीची उत्सुकता होती. 

सरानी अगदी शांतपणे सांगितले, "त्या औषधाबाबत मी काहीही बोलणार नाही. मी लिहून दिलेली सगळी औषधे  समजावून सांगितल्याप्रमाणे नियमित घ्या. त्याबरोबर इतर कोणी दिलेले कोणत्याही पॅथीचे औषध घ्यायचे किंवा नाही ते तुमचे तुम्हीच ठरवा."  

माझा अगदीच विरस झाला. मला वाटले होते की सर म्हणतील, "ते इतर पॅथीचे औषध अजिबात घेऊ नका. त्या औषधांचे काहीही दुष्परिणाम असू शकतात. मी दिलेल्या औषधांसोबत इतर पॅथीचे औषध घेतलेत तर तुमच्या नकळत त्या दोन्ही औषधांचा मिळून तुमच्या शरीरावर काहीतरी विपरीत परिणाम होऊ शकतो, हे लक्षात घ्या. तसे काही झालेच तर त्याची जबाबदारी माझी नाही." वगैरे ... 

पण, असे काहीच सरांनी त्या रुग्णाला सुनावले नाही. सरांनी मला जे सांगितले आणि त्या रुग्णाला जे सांगितले या दोन्ही गोष्टींमधील तफावत मला चांगलीच खटकली. 

एक प्रश्न लगेच माझ्या मनात आला. "सर, तुम्ही दिलेल्या औषधांसोबत ते दुसऱ्या पॅथीचे औषध पेशंटने घेऊ नये असे तुम्ही त्याला का सांगितले नाहीत?" पण, सरांना तो प्रश्न विचारायची हिंमत मला तेंव्हा झाली नाही. त्यामुळे हे दोन्ही प्रसंग आणि मला पडलेला तो रास्त प्रश्न माझ्या मनांतच घोळत राहिले.  

गोडबोले सर म्हणजे माझे सख्खे काकाच होते. हॉस्पिटलमध्ये जरी आमचे गुरु-शिष्या असे औपचारिक नाते असले तरी घरामध्ये आम्ही काका-पुतणीच होतो. त्यामुळे, एकदा आम्ही दोघेही घरी असताना मी संधी साधली आणि आप्पांना, म्हणजे डॉ. राम गोडबोले सरांना माझ्या मनातली शंका विचारलीच. 

"आप्पा, आपल्याच पॅथीची, पण आपण नीट न अभ्यासलेली औषधेही आपण कधीही लिहायची नाहीत हे तुम्ही मला सांगितले. तसेच, इतर पॅथीची औषधे लिहून देण्याचा कायदेशीर व नैतिक अधिकार आपल्याला नाही, हेही तुम्ही मला निक्षून सांगितले. वेगवेगळ्या औषधांचा परस्परसंबंध (drug  interactions), आणि त्यांचा रुग्णाच्या शरीरावर होणारा एकत्रित परिणाम (side effects due to drug interactions) कदाचित विपरीतही असू शकतो, हेही मला समजले. पण मग, तुम्ही तसे त्या पेशन्टला, समजावून का नाही सांगितलेत? आपल्या औषधासोबत ते दुसऱ्या पॅथीचे  औषध तो घेत राहिला आणि त्या औषधाचे काही घातक परिणाम झाले तर? किंवा तुम्ही दिलेल्या औषधांचा अपेक्षित परिणाम झालाच नाही, तर त्या गोष्टीला आपण जबाबदार राहणार नाही का? "

आप्पांनी  त्यांच्या नेहमीच्या पद्धतीने स्मितहास्य करत उत्तर दिले,

"स्वाती, फारच चांगला प्रश्न विचारलास. आपण लिहिलेल्या औषधांबरोबर, इतर पॅथीची औषधे पेशंटने चालू ठेवली आणि नेमका काही विपरीत परिणाम झालाच, तर त्याची जबाबदारी आपल्यावर नसते. कायद्याच्या दृष्टीने, केवळ आपण लिहून दिलेल्या चिठ्ठीमधील औषधांच्या परिणामांना आपण जबाबदार असतो. त्यामुळेच, पेशंट्सच्या केसपेपर्सवर, किंवा आपण लिहून दिलेल्या औषधाच्या चिठ्ठीवर, अथवा एखाद्या रिपोर्टवर, किंवा आपण दिलेल्या वैद्यकीय मतामध्ये (medical opinion) आपण जे लिहितो त्यात काही चूक होणार नाही, यासाठी आपल्याला दक्ष राहावे लागते. कारण, या सर्व लिखित गोष्टींचे उत्तरदायित्व सर्वस्वी आपल्यावर असते. इतर पॅथीची औषधे घेतल्यामुळे आपल्या पॅथीच्या औषधांचा अपेक्षित परिणाम पेशंटच्या शरीरावर न होणे असेही क्वचित घडू शकते. परंतु, त्याचीही  जबाबदारी आपल्यावर नसते."

आप्पांचा मुद्दा मला मनापासून पटला. परंतु, "दुसऱ्या पॅथीच्या डॉक्टरने लिहिलेले ते औषध बंद करायला तुम्ही त्या पेशंटला का नाही सांगितले? पेशंटच्या दृष्टीने ते हिताचे नव्हते का?" हा माझ्या मनातला प्रश्न अनुत्तरितच राहिल्यामुळे मी तो परत विचारलाच. 

"मला सांग स्वाती, स्वतःच्या हिताचा विचार स्वतः पेशंटनेच करायला नको का? इतर पॅथीच्या डॉक्टरांनी लिहिलेली औषधे बंद करा, असे सांगण्याचा नैतिक अधिकार आपल्याला नाही. त्याचप्रमाणे, आमची पॅथी व त्यातील तंत्रज्ञान इतर पॅथीपेक्षा सरस आहे,  किंवा इतर पॅथी प्रतिगामी आहेत, असेही बोलण्याचा नैतिक अधिकार आपल्याला नाही. जोपर्यंत, सर्व पॅथींचा तौलनिक अभ्यास होऊन, त्यांची योग्यायोग्यता जगन्मान्य होत नाही, तोपर्यंत आपण त्यावर भाष्य करायचे नाही. ते वैद्यकीय नीतिमत्तेच्या नियमांत (Medical Ethics) बसत नाही."  

"पण अप्पा, इतर अनेक पॅथीज् चे  लोक त्यांची औषधे "साईड इफेक्ट्स विरहित" असल्याचा दावा करतात. त्यांच्या काही औषधांमध्ये वापरलेले घटक व त्यांचे दुष्परिणाम कुठेही लिखित स्वरूपात नसतात. त्यातील काही  डॉक्टर्स बरेचदा स्वतःच औषधे बनवून त्याच्या पुड्या किंवा बाटल्या पेशंटला देतात. त्या औषधांमधील नेमके घटक कोणते, या बाबत पेशंट अनभिज्ञ असल्याने प्रकृतीवर होणारे परिणाम वा दुष्परिणाम काय असू शकतात हे पेशंटला समजत नाही. शिवाय, इतर पॅथीचे काही डॉक्टर्स अगदी कॉलरापासून ते कॅन्सरपर्यंत, प्रत्येक आजारावर त्यांच्याकडे रामबाण इलाज आहे असा दावा करतात. कहर म्हणजे, इतर पॅथीचे कितीतरी डॉक्टर्स  सर्रास ऍलोपॅथीची औषधे लिहून देतात. ऍलोपॅथीची अनेक अनावश्यक औषधे, बरेचदा चुकीच्या प्रमाणात दिली जातात, ऍलोपॅथीच्या औषधांच्या गोळ्याच कुटून चूर्ण म्हणून, किंवा पाण्यात विरघळवून त्याचे पातळ औषध करून पेशंट्सना दिली जातात. त्याउपर, "ऍलोपॅथीच्या औषधांचे अनेक दुष्परिणाम असल्यामुळे ऍलोपॅथीची औषधे घेऊ नका" असा अपप्रचारही सर्रास केला जातो. हे तरी कुठल्या नियमात आणि नीतिमत्तेत बसते?" 

"त्याचा विचार तू का करतेस? आपण स्वतः योग्य त्याच गोष्टी कराव्या. जे लोक कायद्याच्या चौकटीत न बसणारे काहीतरी करीत असतील त्यांनाच त्याची चाड व भीती असायला हवी ना? तीच बाब नीतिमत्तेची. त्याचाही सारासार विचार त्यांनीच करावा. आपण नव्हे."  

आपापल्या पॅथीप्रमाणे व्यवसाय करणाऱ्या प्रत्येक वैद्यकीय व्यावसायिकाची नैतिक आणि कायदेशीर जबाबदारी, दिलेल्या सल्ल्याचे उत्तरदायित्व आणि वैद्यकीय नीतिमत्ता पाळण्याची बुद्धी, याबाबत माझ्या गुरूंनी दिलेले ते धडे माझ्या मनावर ठसले. संस्कारक्षम वयात मिळालेला हा ज्ञानाचा डोस, माझ्या आजपर्यंच्या वैद्यकीय व्यावसायिक आयुष्यात मला पुरून उरला आहे. मला माहिती नसलेले औषध मी आजवर कोणालाही लिहून दिलेले नाही. तसेच इतर कुठल्याही पॅथीचे औषध मी कधीही लिहिले नाही. 

माझ्या एखाद्या पेशंटने, "तुमच्या औषधांबरोबर इतर कुठल्या पॅथीचे औषध घेतले तर चालेल का?" असे विचारले तर माझे उत्तर ठरलेले असते. "त्या पॅथीतील औषधांबाबत मी काहीही जाणत नाही. ते घ्यायचे की नाही हे तुमचे तुम्ही ठरवा" 

करोना महामारीच्या ऐन भरात, मृत्यूचे तांडव रोखण्यासाठी जीवाची बाजी लावून डॉक्टर झटत असताना, ऍलोपॅथीवर जाहीरपणे तोंडसुख घेणाऱ्या एका 'महान' व्यक्तीचे वक्तव्य एकून ऍलोपॅथीचा व्यवसाय करणाऱ्या अनेकांचा तिळपापड होणे स्वाभाविक होते. 

गोडबोले सर आज हयात असते, तर या खोडसाळ अपप्रचारावर त्यांची प्रतिक्रिया काय झाली असती? हा विचार माझ्या मनात आल्याशिवाय राहिला नाही. 

जरा विचार केल्यावर वाटले, की गोडबोले सर कदाचित म्हणाले असते... 

"प्रत्येक वैद्यकीय व्यावसायिकाने आपापल्या पॅथीच्या ज्ञानावर आधारित रुग्णसेवा करावी. ज्या पॅथीबद्दल आपल्याला ज्ञान नाही त्यावर भाष्य करायला जाऊ नये. ज्याने-त्याने आपापली व्यावसायिक नीतिमत्ता सांभाळावी. इतर कोणीही व्यक्ती, अगदी कितीही हीन पातळीवर जाऊन आपल्या पॅथीबाबत काहीही बोलली तरी, त्या वक्तव्यावर भाष्य न करता अशा व्यक्तींना अनुल्लेखाने मारावे."

तरीदेखील, पेशंट्सनी अशा प्रसंगी काय करावे हा प्रश्न उरणारच. त्यांनी एका उपचारपद्धतीवर विसंबून राहावे, की आंधळेपणाने दोन-तीन पॅथीचे उपचार एकत्रित करावे? 

यावरही कदाचित गोडबोले सर म्हणाले असते, "रुग्ण सूज्ञ असेल तर, त्याचा विश्वास असलेल्या एका पॅथीचेच औषधोपचार घेईल आणि कुठल्याच बिनबुडाच्या टीकेवर विश्वास ठेवणार नाही. "  

शुक्रवार, ९ एप्रिल, २०२१

अंजन!

सात वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. त्यावेळी माझ्या दोन्ही हाताना Carpal Tunnel Syndrome या दुखण्याने ग्रासले होते. हाताच्या नसांवर मनगटाच्या भागात दाब पडत असल्याने माझ्या दोन्ही हातांची बोटे कमालीची दुखायची, आणि बोटाना झिणझिण्या यायच्या. पुण्याच्या कमांड हॉस्पिटलमधील डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मनगटाच्या नसेवरचा दाब कमी करण्यासाठी एक छोटीशी शस्त्रक्रिया करण्याचे ठरले. शस्त्रक्रियेसाठी मला कमांड हॉस्पिटलच्या फॅमिली वॉर्डात (स्त्रिया व मुलांसाठीच्या) भरती करण्यात आले. तिथे एका मोठ्या लांबलचक बॅरॅकमध्ये अनेक स्पेशल रूम्स होत्या. प्रत्येक खोलीमध्ये दोन रुग्ण ठेवण्याची सोय होती. माझ्या खोलीत शेजारच्या खाटेवर कोणीही रुग्ण स्त्री नव्हती.

मला जनरल अनेस्थेशिया देऊन शस्त्रक्रिया केली गेली. शुद्ध आली तेंव्हा मी माझ्या खोलीत परत आलेले होते. शस्त्रक्रिया झालेल्या माझ्या डाव्या मनगटावर एक मोठा जड स्प्लिंट बांधलेला होता. हाताला कमालीचा ठणका जाणवत होता. जनरल अनेस्थेशिया देताना माझ्या घशातुन श्वासनलिकेत घातलेली नळी जरी काढली असली तरी माझा घसा खूप दुखत होता. हातपाय जड होऊन सगळे शरीर निष्प्राण वाटत होते. उजव्या हाताला सलाईन लावलेले असल्याने तो हात हालवता येत नव्हता व दुखतही होता. एकुणात काय, शस्त्रक्रिया जरी लहानशीच असली तरीही मला खूपच त्रास जाणवत होता.  

संध्याकाळचे जेवण सातपर्यंत उरकले. तोपर्यंत माझ्या उजव्या हाताला लावलेली सलाईनची नळीही काढली गेली होती. इतक्यातच, फॅमिली वॉर्डात एक नवीन ऍडमिशन आल्याचे कळले. ऍडमिट झालेल्या त्या बाईंना नेमके माझ्याच खोलीत शेजारच्या पलंगावर ठेवण्यात आले. माझ्या दिमतीला आनंद दिवसभर थांबला होता. आर्मी हॉस्पिटलच्या नियमाप्रमाणे रात्रीच्या वेळी त्याला तिथे थांबण्यास मनाई होती. पण खोलीत मी एकटीच रुग्ण असल्यामुळे, विशेष परवानगी घेऊन, रात्री उशिरापर्यंत तो माझ्यासोबत थांबणार होता. त्यामुळे मला जरा आधार वाटत होता. पण, खोलीत दुसरी स्त्री रुग्ण आल्यामुळे त्याला लगेचच घरी परतावे लागले. नेमकी माझ्याच खोलीत ही बाई का उपटली असे वाटून माझी मनोमन खूप चिडचिड झाली.

नवीन आलेल्या बाईचे व तिच्या सैन्याधिकारी नवऱ्याचे, तेथील नर्सिंग ऑफिसर आणि डॉक्टर्सबरोबर चाललेले बोलणे माझ्या कानावर पडल्याने तिच्याबाबत काही माहिती मला आपसूकच कळली. काही दिवसांपूर्वी अचानक त्या बाईंच्या दोन्ही डोळ्यांची दृष्टी गेली होती. पुढील  उपचारासाठी त्यांना गोव्याहून पुण्याला आणले होते. बाईंना मदत करायला  त्यांच्याबरोबर एका आयाही आली होती. पण आर्मी हॉस्पिटलच्या कडक सुरक्षा नियमानुसार, तिलाही या रुग्ण बाईंबरोबर राहता येणार नव्हते. पोलीस व्हेरिफिकेशन झालेल्या व इतर सुरक्षा तपासणी पार पडलेल्या काही ठराविक आयांचे दूरध्वनी क्रमांक नर्सिंग ऑफिसरने त्या अधिकाऱ्याला दिले. "यांच्यापैकी कोणालाही रात्रीच्या वेळी रुग्णसेवेसाठी बोलवून घ्या" असे सांगून नर्सिंग ऑफिसर निघून गेली. 

त्या अधिकाऱ्याने एकेक करून सगळ्या आयांशी संपर्क साधला. पण त्यापैकी एकही आया त्या रात्री येऊ शकत नव्हती. अचानक आलेले अंधत्व, प्रवासाचा शीण, नवीन जागा आणि कोणी मदतनीसही नाही, अशा अवस्थेत बायकोला सोडून जाणे त्या अधिकाऱ्याच्या जीवावर आले होते. नऊ-साडेनऊ होत आले होते. "रुग्णांना काही मदत लागली तर आम्ही ती करतोच" असे सांगून, रात्रपाळीच्या नर्सिंग ऑफिसरने त्या अधिकाऱ्याला  रात्री हॉस्पिटलमध्ये थांबता येणार नाही याची कल्पना दिली. त्यामुळे त्याला आता निघणे भागच होते. सगळी परिस्थिती बघून माझे मन हेलावले. आतून कितीही इच्छा झाली तरी, मला स्वतःलाच  इतका त्रास असताना मी या बाईंना कितपत मदत करू शकेन याबाबत मी साशंकच होते. तरीदेखील, "तुमच्या पत्नीला रात्रीतून काही मदत लागली तर मी करेन" असे आश्वासन मी त्या अधिकाऱ्याला दिले. तो निश्चिन्त होऊन निघून गेला. 

मध्यरात्री मला त्या बाईंची हाक ऐकू आली. त्यांना लघवी करायला जायचे होते. नर्सिंग ऑफिसरला बोलावण्यासाठी एक दोन वेळा बेल वाजवूनही कोणी न आल्याने, नाईलाजास्तव त्या बाईंनी मला हाक मारली होती. मी उठून त्यांना घेऊन गेले. सकाळी त्यांना ब्रश करायला व इतर आन्हिके उरकायलाही मदत केली. चहा दिला. मला वैद्यकीय ज्ञान असल्यामुळे त्या बाईंची दृष्टी  पुन्हा पूर्ववत होणार नाही याची मला कल्पना आलेली होती. त्यांच्या आजारासमोर माझे दुखणे मला अगदीच हलके वाटू लागले. पुढचे दोन दिवस मी त्यांना जमेल तशाप्रकारे मदत केली. 


या घटनेने माझ्या डोळ्यांत जणू अंजनच घातले. आपले दुखणे, आपल्या अडचणी, यांचा आपण फारच बाऊ करत असतो. प्रत्यक्षांत, आपल्यापेक्षाही जास्त कठीण प्रसंगातून अनेकजण जात असतात. त्यांच्याकडे डोळे उघडून पाहिले तरी आपला त्रास कमी होऊ शकतो. स्वतःला वाटते त्यापेक्षा खूप जास्त ताकद आपल्या शरीरात असते. पण मनाने जर खचून गेलो तर आपण शरीरानेही दुबळे बनतो. अशा प्रसंगी मनाने उभारी घेऊन, आपण इतरांना सहजी मदत करू शकतो.  

हीच शिकवण करोना महामारीच्या काळात मला पुन्हा मिळाली. अगदी स्वतः आजारी असतानाही, माझ्यापेक्षा जास्त आजारी असलेल्या काही आप्तांना मी थोडीफार मदत करू शकले. आजही आपल्या आसपास, घरोघरी करोनाचे रुग्ण आहेत. त्यांना जर आपण यथाशक्ति मदत केली तर आपल्या सकारात्मक ऊर्जेची लाट करोनाच्या लाटेवर निःसंशय मात करू शकेल असा मला विश्वास वाटतो.  

शुक्रवार, ५ मार्च, २०२१

कोव्हीड कमांडोज!

मी आणि आनंद काही दिवसांपूर्वी कोव्हीड न्यूमोनियातून बाहेर पडलो आहोत. आधी मला लागण झाली त्यामुळे मला दवाखान्यात भरती व्हावे लागले. माझ्यापाठोपाठ बरोबर तीन दिवसानी आनंदला ताप आला आणि दिवसेंदिवस तो ताप वाढत चालला होता. त्याची कोव्हीड टेस्टही पॉझिटिव्ह आली. त्यामुळे आता त्यालाही दवाखान्यात राहून उपचार घेणे आवश्यक झाले होते. पण आमच्या घरी, माझे ८८ वर्षे वयाचे वडीलही होते. आम्हाला लक्षणे सुरु झाल्यावर, माझ्या वडिलांना विलगीकरणाच्या दृष्टीने, आम्ही एका खोलीत बंद करून ठेवले होते. आम्हा दोघांशिवाय वडिलांची काळजी घेणारे, त्यांचे खाणे-पिणे बघणारे इतर कोणीच घरात नसल्याने,  मी घरी आल्याशिवाय आनंदला दवाखान्यात दाखल होता येत नव्हते. अशा परिस्थितीत माझा पाच दिवसांचा इंजेक्शन्सचा कोर्स पूर्ण झाल्यावर, डॉक्टरांना माझ्या घरातील अडचण सांगून, मला घरी सोडण्याची विनंती मी केली. सुदैवाने त्या डॉक्टरांनी ती विनंती मान्यही केली. मी घरी आल्यावर आनंद उपचारासाठी दवाखान्यात भरती झाला आणि ७-८ दिवसांच्या उपचारांनंतर तोही घरी परत आला. 

लक्षणे दिसू लागल्यापासून पुढील सुमारे १७ दिवस, कोव्हीड पेशंट त्याच्या श्वासातून कोव्हिडचे विषाणू बाहेर फेकत असतो. त्यामुळे, त्याच्या संपर्कात येणाऱ्या इतरांना लागण होऊ शकते. माझ्या वडिलांना लागण होऊ नये म्हणून, आनंदला लक्षणे सुरु झाल्यापासून १७ दिवसांनंतर, आमच्या घराचे निर्जंतुकीकरण करून घेणे आवश्यक झाले होते. पुणे महानगरपालिकेच्या विविध क्षेत्रीय कार्यालयातर्फे घर, जिने, लिफ्ट व आसपासच्या परिसरात निर्जंतुकीकरणासाठी फवारणी केली जाते, हे आम्ही ऐकून होतो. ढोले पाटील रस्ता क्षेत्रीय कार्यालयान्तर्गत, आमच्या प्रभागाचे सॅनिटरी इन्स्पेक्टर,श्री. निखिल शेडगे यांच्याशी संपर्क साधून आम्ही त्यांना तशी विनंती केली. श्री. शेडगे यांनी आम्हाला त्वरित श्री. सावंत यांचा दूरध्वनी क्रमांक दिला व त्यांच्यासोबत वेळ ठरवून घेण्यास सांगितले. श्री. सावंत यांच्याशी संपर्क साधून, दुसऱ्या दिवशी सकाळी घर निर्जंतुकीकरणासाठी माणसे पाठवावीत अशी विनंती आम्ही केली. "निश्चित पाठवतो" असे ते म्हणाले असले तरीही कोणी येईल की  नाही, या बाबतीत आम्ही थोडे साशंकच होतो. 

दुसऱ्या दिवशी सकाळी, साधारण ९.३०-१० वाजण्याच्या सुमारास, श्री. सावंत यांच्यातर्फे, श्री. मोरे यांचा फोन आला. ते आमच्या घराजवळ पोहोचले होते व घराचा नेमका पत्ता विचारीत होते. दहा मिनिटांतच श्री. मोरे आणि त्यांचे एक सहकारी घरात हजर झाले. योग्य प्रमाणात औषध व पाणी फवारणी यंत्रात घालणे आणि संपूर्ण घरात त्या मिश्रणाची फवारणी करण्याचे काम पुढील पंधरा-वीस मिनिटांत त्यांनी पूर्ण केले. दोघेही कसलीही कुरकुर न करता, शांतपणे ते काम करत होते. मला त्यांचे कौतुक तर वाटलेच, पण कोव्हीड रुग्ण असलेल्या घरात शिरून तिथे फवारणी करताना या लोकांना स्वतःच्या जीवाची भीती वाटत नसेल का? असा प्रश्नही पडला. 

काम संपवून, श्री. मोरे त्यांच्या सहकाऱ्याबरोबर परत निघाले असता, माझ्या मनातले प्रश्न मी त्यांना विचारले.

श्री. मोरे यांनी दिलेले उत्तर ऐकून मी थक्क झाले. 

"मॅडम, आता जवळजवळ वर्ष होत आले. सातत्याने आम्ही हे काम करतो आहोत. मागे एकदा एकाच चाळीत शंभरच्या वर कोव्हीड रुग्ण होते. तिथेही जाऊन आम्ही फवारणी केली होती. नाक आणि तोंड झाकले जाईल असा साधा कापडी मास्क आम्ही वापरतो. सोशल डिस्टंसिंग पाळतो. फवारणी करायला जातो तिथे इकडे-तिकडे कुठेही हात लागणार नाही याची दक्षता घेतो. आजपर्यंत तरी काही झाले नाही"

मला कौतुक वाटले. सहजच ताज हॉटेलवर झालेल्या हल्ल्याची, आणि धडाडीने तिथे घुसून, अतिरेक्यांचा नायनाट करणाऱ्या 'ब्लॅक कॅट' कमांडोजची आठवण झाली. मनात विचार आला, या फवारणी करणाऱ्यांना आपण 'कोव्हीड कमांडोज' असे का म्हणू नये? कोव्हीड पेशंट्सच्या घरात फिरणारे सूक्ष्म विषाणू अतिरेक्यांपेक्षा कमी नाहीत. त्यांच्याविरुद्ध मोहीम उघडून हे 'कोव्हीड कमांडोज' आपल्या जीवावर उदार होत दररोज कारवाई करत आहेत. 

आम्हा डॉक्टर्सना आणि सिस्टर्सना 'कोव्हीड वॉरियर्स' म्हटले जाते. आमचे भरपूर कौतुक होते आणि सन्मान केला जातो. या 'कोव्हीड कमांडोज'चेही तसेच कौतुक आणि तसाच सन्मान व्हायला हवा असे वाटून, मी मनोमन त्यांच्या कार्याला सलाम केला.


रविवार, ५ जुलै, २०२०

जिंकू किंवा मरू!

आज आपला देश दोन मोठ्या शत्रूंशी लढत आहे. करोना व्हायरसशी देशांतर्गत युद्ध चालू आहे आणि सीमेवर चिन्यांशी. युद्धात जिवावर उदार होऊन लढण्याशिवाय पर्यायच नसतो. मी एक डॉक्टर असल्याने, माझ्या अनेक सहकाऱ्यांसोबत मी करोनाविरुद्ध लढते आहे. करोना-युद्धभूमीवरील परिस्थिती किती भयाण आहे याची मला पूर्ण कल्पना आहे. आनंद सेवानिवृत्त सेनाधिकारी असल्याने, सीमेवर चालू असलेल्या लढ्यातील, नेमक्या परिस्थितीच्या बातम्या त्याला समजत असतात. सीमारेषेवरही निर्माण झालेली परिस्थिती बिकटच आहे. पण दोन्हीकडे आपले योध्ये अथक लढत देतच आहेत. रोज सकाळी मी मात्र एका वेगळ्याच प्रकारचे निधड्या छातीचे योद्धे बघते आहे. 

मी जवळजवळ रोज पहाटे, कमी रहदारी असलेल्या कॅंटोन्मेंटच्या रस्त्यांवर सायकलस्वारीला किंवा पायी फिरायला बाहेर पडते. भल्या पहाटे रस्त्यांवर खूपच कमी लोक असतात. माझ्या परतायच्या वेळेपर्यंत रस्त्यांवरची रहदारी जरी वाढली तरीही ती तशी कमीच असते. त्यामुळे या काळांत 'सोशल किंवा फिजिकल डिस्टंसिंग' पाळणे सहजी शक्य असते. तरीही, करोनाच्या भीतीने, नाका-तोंडावर घट्ट बसणारा मास्क घालूनच मी फिरते. रोज सकाळच्या माझ्या  फेरफटक्याच्या वेळी नेहमी भेटणाऱ्या, मास्कधारी मित्र-मैत्रिणींची ओळख पटल्यावर, मास्क खाली न करता त्यांच्याशी लांबूनच गप्पा मारते.  

सकाळी फिरायला बाहेर पडणाऱ्या ९० % लोकांची, 'करोना व्हायरस' अगदी आळशी असावा अशी पक्की समजूत आहे. किंवा दिवसभर धुमाकूळ घालून दमल्यावर, पुन्हा पहाटे-पहाटे बाहेर पडायला करोनाच्या अंगी त्राणच उरत नसावे, यावर अशा लोकांचा गाढ विश्वास असावा. त्यामुळे, या लोकांनी मास्क घातलेला नसतो. जोडी-जोडीने चालणे, घोळका करून गप्पा मारणे, एकमेकांना टाळ्या देत हास्य-विनोद करणे, हे सगळे मास्क न घालता आनंदात चालू असते. हे बघून कधीतरी माझा संयम सुटतो. मी जवळ-जवळ रोज कोणाला तरी विचारतेच, "तुम्ही मास्क का नाही घातलात?" त्यावर मात्र मला खूपच गमतीदार उत्तरे ऐकायला मिळतात. "खिशात आहे ना, रात्री धुवून वाळत घातला होता पण वाळलाच नाही, सकाळी पोलीस पकडत नाहीत, गाडीतच राहिला, मास्क असला की श्वासाला त्रास होतो", अशी अनेक उत्तरे आणि सबबी तयार असतात.

चार दिवसांपूर्वी, कॅंटोन्मेंटच्या एका रस्त्यावर, तरुण-तरुणींचा एक घोळका दिसला. त्यातल्या एकानेही मास्क घातला नव्हता. त्याबद्दल मी त्यांना लांबूनच हटकले. आम्ही नेमके आर्मीच्या एका ऑफिसच्या समोरच उभे होतो. त्या ऑफिसच्या दारावर आर्मीचे दोन सशस्त्र जवान पहारेकरी उभे होते. त्यांच्याकडे बोट दाखवत त्या घोळक्यातील एकजण मला म्हणाला, "वो गार्ड आप देख रही है ना मॅडम? अपनी सेनापर आपको भरोसा नहीं है क्या? ये अपने वीर जवान तो चिनीयोंको भून देते हैं तो करोना क्या चीज है? आर्मी एरियामें करोनाको ये घुसनेंही नहीं देंगे, मॅडम, आप बेफिक्र रहिये। इधर तो आप करोना से बिल्कूल डरोना।" त्याच्या त्या अत्यंत चटपटीत उत्तरावर सगळा घोळका, एकमेकांना टाळ्या देत खळखळून हसला. मी मात्र डोक्याला हात लावून घेतला. योगायोगाने, पुढच्याच दिवशी, असल्या लोकांच्या बंदोबस्तासाठी, आर्मीने या भागातल्या बऱ्याच रस्त्यांवर सकाळी सहा ते आठ या वेळात सशस्त्र सैनिक उभे केले आहेत. इथे फिरायला येणाऱ्या जाणाऱ्यांना मास्कशिवाय फिरण्यास मज्जाव केला आहे. 

भारताच्या इतिहासात अनेक युद्धे झाली. त्यातली बरीचशी युद्धे हरण्याची कारण म्हणजे आपल्याच शत्रूला जाऊन मिळालेले फितूर लोक! मास्क धारण न करणाऱ्या, 'सोशल किंवा फिजिकल डिस्टंसिंग' न पाळणाऱ्या अशा अनेक फितूर भारतीयांमुळे आपण करोना विरुद्धची लढाई हरणार तर नाही नां? अशा विचाराने आम्हा योध्यांचे मनोबल खचून जाते आहे, हे मात्र खरे!        
     
याच विषयावर RJ  संग्रामने लिहिलेला एक लेख खालील लिंकवर वाचा:- 

गुरुवार, १९ मार्च, २०२०

सोशल डिस्टंसिंग!

मी पुणे महानगरपालिकेच्या 'चंदूमामा सोनावणे हॉस्पिटल' मध्ये मानद बालरोगतज्ज्ञ म्हणूनही काम करते. आज बाह्यरुग्ण विभागात रूग्ण तपासत असताना, स्वतःबरोबर तीन-चार पोरे घेऊन आलेल्या एका बाईसोबत घडलेला माझा संवाद...

"किसको दिखाना है?"

तिने बकोटीला धरलेल्या एका पोराला पुढे केले. 

"क्या तकलीफ है?"

"थोडी सर्दी है। नाकमेंसे पानी आ रहा है."

"बुखार या खाँसी है?"

"नहीं। बुखार खाँसी कुछ नहीं है"

"आपके घरमें, पिछले हफ्ते दो हफ्ते  में बाहरसे कोई आया हैं क्या?"

"बाहरसे मतलब?"

"बाहर देशसे? दुबई, सौदी?"

"आप ऐसे क्यू पूछते है? हमारे घरमें कौन आयेगा?"

"अभी नयी बीमारी फैली है ना। इसीलिये हमें हर मरीजको पूछना पडता है।"

"हाँ, वो तो आपकी बात सही है। लेकिन हम बहुत गरीब लोग है। हम को खुद उमराह के लिये सौदी जाना है। हम सरकारी कोटे के वास्ते अपना नाम डालना चाहते है। लेकिन हमारा नाम आयेगा तो भी हम पैसे नहीं भर सकेंगे। इसीलिये हमने नामच नहीं डाला है।"

तिच्या बाळाला तपासून, त्याला फारसे काही झाले नसल्याचे मी तिला सांगते. 

"और किसको दिखाना है? "

" खाली इसकोच दिखाना था। बाकी बच्चे तो ठीक है।"

"फिर सब बच्चों को इधर ला के भीड क्यों करते हो? ऐसे भीड लगाने से ही ये नयी बीमारी ज्यादा फैलनेवाली है। सरकार बार बार बता रही है ना, कि बिनावजह घर से बाहर मत निकलो? जो बच्चा बीमार है उसके इलावा  बाकी बच्चोंको घरमें रख के आना था।"

"घरमें कैसे रखे? अब स्कूलको छुट्टी दी है ना। ये बच्चे शैतान है। बहुत सताते है। मेरी सास मेरे बच्चोंको संभालनेके लिये तैयार नहीं है। इनको बाहर खेलने के लिये भीं नहीं भेज सकते। बच्चे घरमें बोअर हो जाते है।इसलिये साथमें लेके आयी। इनको छोडे तो कहाँ छोडे?"

तिच्या प्रश्नाला माझ्याकडे उत्तर नसते. त्यामुळे मुकाट्याने मी तिला औषध लिहून देते. 

प्रत्येकी दोन-तीन पोरे घेऊन आलेल्या, सर्व जाती-धर्मांच्या अनेक बायका आणि त्यांची पोरं बाहेर गोंगाट करत असतात. बऱ्याच जणी रांगेत न थांबता, मोठा घोळका करून गप्पा मारत असतात. नाकावरचा मास्क खाली ओढून पोरं इकडे-तिकडे उड्या मारत सगळीकडे हात लावत असतात. 

ओपीडीमध्ये एका वेळी आम्ही तीन ते चार डॉक्टर्स प्रत्येकी एकेक मूल तपासत असतो. प्रत्येक मुलाबरोबर, दोन मोठी माणसे आत येतात, किंवा एखादी आई एकदम आपल्या तीन-चार पोरांना घेऊन आत घुसते. कितीही हुसकले तरीही आमच्या आसपास हे सगळे लोक गर्दी करतातच. आत आलेली चार-पाच वर्षांची पोरं आम्हाला खेटून उभी राहतात. काही पोरं, तोंडावर रुमाल न धरता, आमच्या अगदी जवळ उभी राहून खोकतात. केवळ पोरांना सुट्टी आहे म्हणून अनेक बारीक-सारीक तक्रारींसाठी लोक मुलांना घेऊन येत असतात. 

सोशल डिस्टंसिंगचे महत्त्व आम्हाला माहीत असले तरीदेखील, समोरच्यांनाही ते माहिती असणे आवश्यक असते. तेही आम्ही समजावून सांगतच असतो. पण कोणी काही करो अथवा ना करो, आमच्या कर्तव्याची जाण ठेवून, सोशीकपणे, आम्ही रुग्णसेवा देण्याचे आमचे काम करतच राहतो.



सोमवार, २४ डिसेंबर, २०१८

जीवघेणे प्रसंग!

एक डॉक्टर असल्याने, अत्यंत जीवघेण्या प्रसंगांतून बालरुग्णांना वाचवण्याची सवय मला आहेच. ज्यांच्या बाळांची मी डॉक्टर आहे त्या पालकांचेे आणि माझेे एक विश्वासाचे नाते निर्माण झालेले असते. तिथे डॉक्टर म्हणून माझी भूमिका सुस्पष्ट आणि निःसंदिग्ध असते. पण एखादा कौटुंबिक कार्यक्रम चालू असतांना किंवा प्रवास करीत असताना मी डॉक्टरच्या भूमिकेत नसते. अशा वेळी अचानक एखादी व्यक्ती अत्यवस्थ झाल्यास माझ्या आणि इतरांच्याही मनाची तयारी नसताना, मला अचानकच डॉक्टरच्या भूमिकेत शिरावेे लागतेे व ती भूमिका यशस्वी पणे निभावून न्यावी लागते. अशावेळी घडलेले काही प्रसंग... 

खूप वर्षांपूर्वी एका कौटुंबिक प्रसंगात एक वयोवृद्ध नातेवाईक भाषण करत होतेे. बोलता-बोलता भावनावेग अनावर होऊन त्यांच्या छातीत दुखायला लागले आणि घामेघूम होऊन ते अचानकच खाली कोसळले. त्यावेळी माझ्या लहानग्या मुलांना घेऊन मी हॉलच्या कुठल्यातरी कोपऱ्यात उभी होते. कोणीतरी पडलंय हे कळल्यावर मी धावत पुढे गेले. त्या वेळेपर्यंत उपस्थित मंडळी जसे सुचतील तसे काही-बाही उपाय करत होते. मी पटकन पेशंटच्या जवळ जाऊन नाडी तपासली, श्वसनाच्या वेगाचा अंदाज घेतला, आणि एकूण परिस्थिती बघता त्यांना त्वरित आयसीयू मध्ये हलवणे अत्यावश्यक आहे, हे माझ्या लक्षात आले. एक प्रशिक्षित वैद्यकीय व्यावसायिक या नात्याने सूत्रे हातात घेत पेशंटला आयसीयूमध्ये नेेण्याच्या दृष्टीने मी भराभरा हालचाली सुरु केल्या. तितक्यात कोणीतरी मला अशी विनंती केली की, मी निदान आणखी पाच-दहा मिनिटे तरी पेशन्टला तिथेच ठेवावे. झाले असे होते की मी तिथे पोहोचायच्या आधी कोणीतरी त्या रुग्णाला 'रेकी' द्यायला सुरुवात केली होती आणि ती पाच दहा मिनिटात संपणार होती. त्याक्षणी अनेक व्यक्तींचा रोष पत्करून मी ती विंनती अक्षरशः धुडकावत पुढच्या काही मिनिटांत पेशन्टला आयसीयू मध्ये दाखल केले आणि त्यांचा जीव वाचला.  

अलीकडे काही महिन्यांपूर्वी मी रेल्वेच्या एसी चेयर कार मधून प्रवास करत होते. अगदी पेंगाळलेली असताना  अचानकच दोन टीटीई माझ्या नावाचा पुकारा करत माझ्याजवळ आले. मला क्षणभर आश्चर्य आणि जरा भीतीही वाटली. कुठल्यातरी मागच्या डब्यात एक प्रवासी अत्यवस्थ झाला होता. आरक्षण सूची वाचून मी डॉक्टर आहे  हे कळल्यामुळे माझा शोध घेत ते दोघे माझ्यापर्यंत पोहोचले होते. परिस्थितीचे गांभीर्य लक्षांत आल्याबरोबर, धावत्या गाडीमधून, या डब्यातून त्या डब्यात अक्षरशः सुसाट पळत मी त्या अत्यव्यस्थ रुग्णाजवळ पोहोचले. माझ्या अपेक्षेप्रमाणेच रुग्णाभोवती बघ्यांचे कोंडाळे होते. सगळ्यांना खडसावत बाजूला सारून मोठ्या धीराने मी त्या प्रवाश्याला CPR ( हृदय आणि फुफुसांना शास्त्रीय पद्धतीने चलन देणे ) देणे सुरु केले आणि त्या रुग्णाचा जीव वाचला. एखाद्या रुग्णाला सुसज्ज आयसीयू मध्ये CPR देणे आणि भर गर्दीत एकाग्रचित्त होऊन CPR देणे, यात खूप फरक असतो. त्या दहा मिनिटांच्या काळात, तिथल्या काही सहप्रवाशानी सामंजस्य दाखवत मी सांगेन ते ऐकले आणि मी मागेन ती सर्व मदत केली. पण भोवती उभ्या असलेल्या काही बघ्यांनी अनेक अनावश्यक कॉमेंट्स केल्या. एक दोघांनी तर, "आता ही बाई काय दिवे लावणार?" अशाप्रकारची कुचेष्टा करायलाही कमी केले नाही. त्या दणकट शरीरयष्टीच्या पेशंटला CPR देऊन माझे हात चांगलेच भरून आले होते. पण त्याचे मला काहीच वाटले नाही. त्या खवचट कॉमेंट्स मात्र माझ्या जिव्हारी लागल्या.  

तिसरा प्रसंग मागच्या आठवड्यातला. एका कौटुंबिक कार्यक्रमात माझ्या आईला, अगदी माझ्या डोळ्यादेखतच भोवळ आली आणि ती ग्लानीत गेली. गेले वर्षभर माझ्या आईला hyponatremia किंवा रक्तातले सोडियमचे प्रमाण कमी होण्याचा त्रास सुरु आहे. तसे झाले की तिला भोवळ येते आणि  ग्लानीत जाऊन तिचे बोलणे असंबद्ध होते. अशावेेळी नेमकेे काय उपाय केल्याने ती सुधारते हे मला आता चांगलेच माहीत झालेले आहे. तरीही माझ्या आईला तशा अवस्थेत बघून मी चांगलीच धास्तावले होतेे. त्या दिवशीही आवश्यक त्या सर्व उपाययोजना मी त्वरित सुरु केल्या होत्या. पुढचा काही काळ मी आईला उपचार देत असतांना, आसपास उभ्या असलेल्या काही नातेवाईकांनी काढलेल्या भलत्या-सलत्या शंका व केलेल्या अनावश्यक सूचनांमुळे मी कमालीची  वैतागले होते. एक-दोन नातेवाईकांना तर, "बाजूला व्हा" असे अक्षरशः ओरडून सांगावे लागले. त्या क्षणी तसे करणे जरी योग्य असले तरीही आपल्या जवळच्या माणसांना दुखावताना, माझा मानसिक ताण खूपच वाढला. मिठाचे पाणी आईच्या पोटात गेल्या-गेल्या आईला तरतरी आली आणि ती हसून बोलायलाही लागली. 

माझ्यासारखे अनेक डॉक्टर्स अशा प्रसंगातून जात असतील. उपाययोजनेत काही सेकंदाचा उशीर झाला किंवा थोडीशी जरी चूक झाली तरी एखाद्या अत्यवस्थ रुग्णाचा जीव जाऊ शकतो. अर्थात, तसे होऊ नये यासाठी आम्हाला योग्य ते आणि पुरेसे प्रशिक्षण मिळालेले असते. अशा इमर्जन्सीमध्ये रुग्णाचा जीव वाचावा म्हणून आम्ही डॉक्टर्स कमालीची शर्थ करत असतो. आपल्या उपचारामुळे एखाद्या रुग्णाला जीवनदान मिळाले तर एखाद्या डॉक्टरच्या दृष्टीने ते अत्त्युच्च समाधान असते. पण ते उपचार करत असताना आमच्यावर कमालीचा मानसिक ताणही असतो. तो ताण सहन करण्याची ताकद आमच्यात असते. मात्र, आजूबाजूच्या व्यक्तींच्या दिशाहीन आणि अशास्त्रीय कृती, अनावश्यक सूचना आणि क्वचित येणाऱ्या खवचट कॉमेंट्स या सर्व गोष्टींमुळे आमच्या मनावर येणारा वाढीव ताण असह्य होतो. या वाढीव ताणामुळेच, आम्हा डॉक्टरांसाठी असे प्रसंग जणू जीवघेणे ठरतात याची जाणीव इतरांना कधी होईल का?

एखादी प्रशिक्षित डॉक्टर व्यक्ती जर इमर्जन्सीच्या वेळी नेमकी उपस्थित असेल तर उपचाराची संपूर्ण सूत्रे त्या डॉक्टरच्या हातात देणे हेच योग्य आहे. अशावेळी इतरांनी जर काहीही न बोलता समंजसपणे फक्त मदतनिसाची भूमिका पार पाडली, तर पेशंटला वाचवण्याचे आमचे प्रयत्न यशस्वी व्हायला मदत होईलच पण आमच्यावर बेतणारे हे जीवघेणे प्रसंगदेखील टळतील. नाही का?